मागील अनेक दिवसांपासून भारताचा सलामीवीर रोहित शर्मा त्याच्या दुखापतीमुळे चर्चेत आहे. त्याला इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामात हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. या दुखापतीमुळेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली नव्हती. मात्र काही दिवसानंतर तो आयपीएलमध्ये खेळताना दिसला. त्यातच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेआधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषदेत रोहितच्या दुखापतीबद्दल स्पष्ट काही माहित नसल्याचे सांगितल्याने या चर्चेला आणखी फाटे फुटले.
आता असे वृत्त समोर येत आहे की बीसीसीआयने रोहित, विराट आणि मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्यात कॉन्फरन्स कॉलद्वारे संवाद साधला. मुंबई मिरर मधील एका वृत्तानुसार, बीसीसीआयने रोहित, शास्त्री आणि विराट यांच्यातील गोंधळ निस्तरावा यासाठी विराटच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच कॉन्फरन्स कॉलची व्यवस्था केली.
या कॉन्फरन्स कॉलशी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) रोहितच्या फिटनेसवर काम करणाऱ्या काही महत्त्वाच्या व्यक्ती आणि मुख्य निवडकर्ता सुनील जोशी हे देखील जोडले गेले होते. या सर्वांनी म्हटले की रोहितच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सहभागाबद्दल अंतिम निर्णय त्याचा फिटनेस रिपोर्ट आल्यानंतर होईल. रोहितची फिटनेस चाचणी 11 डिसेंबरला आहे. सध्या तो एनसीमध्ये त्याच्या दुखापतीवर काम करत आहे.
रोहित पहिल्या दोन कसोटीला मुकणार –
रोहित जरी फिटनेस चाचणी पास झाला तरी तो पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. कारण ऑस्ट्रेलियामध्ये परदेशातून येणाऱ्या व्यक्तीला 14 दिवस क्वारंटाईन राहाणे अनिवार्य आहे. त्यानुसार जरी रोहित 11 डिसेंबरनंतर ऑस्ट्रेलियाला गेला तरी तो 14 दिवसांच्या क्वारंटाईनंतरच कसोटी मालिकेसाठी उपलब्ध राहाणार आहे. कसोटी मालिका 17 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. यानंतर दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून सुरु होईल.
रोहितच्या दुखापतीच्या प्रकरणात सुरुवातीपासूनच अस्पष्टता –
रोहितला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्यानंतर तो मुंबई इंडियन्सकडून 4 सामने खेळला नव्हता. याचदरम्यान भारतीय संघाची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहितला स्थान देण्यात आले नाही. मात्र त्यानंतर लगेचच रोहित मुंबई इंडियन्सकडून साखळी फेरीतील शेवटचा सामना आणि प्लेऑफचे सामने खेळला. त्यामुळे काही दिवसांनी रोहितला कसोटी संघात स्थान देण्यात आले. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाला जाईल, अशी सर्वांची अपेक्षा होती.
मात्र रोहित ऑस्ट्रेलियाला न जाता युएईतून थेट मुंबईला आला आणि तिथून तो बंगळुरुला एनसीएमध्ये गेला. त्यामुळे रोहितच्या दुखापतीच्या प्रकरणाचा गोंधळ आणखी वाढला. पण काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने दिलेल्या वृत्तानुसार रोहितचे वडील आजारी असल्याने रोहित युएईतून थेट मुंबई गेला असल्याचा खुलासा केला.
याचदरम्यान विराटने पत्रकार परिषदेत सांगितले की “निवड समितीच्या बैठकीपूर्वी आम्हाला ईमेलद्वारे कळवण्यात आले होते की, रोहित आगामी मालिकेसाठी उपलब्ध नाही. आयपीएलदरम्यान त्याला दुखापत झाली आहे आणि दुखापतीसंदर्भात त्याला माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियादौऱ्यावर अनुपलब्ध असेल.”
तसेच विराट असेही म्हणाला की “निवड समितीच्या बैठकीपूर्वी रोहित शर्माला सांगण्यात आले होते की त्याला मोठी दुखापत होऊ शकते आणि म्हणूनच त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले नाही. पण यानंतर रोहित शर्मा आयपीएलमध्ये खेळताना दिसला, अशा परिस्थितीत मला वाटले की आता तो आमच्याबरोबर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येईल. पण तसे झाले नाही. आम्हाला रोहित शर्माबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.”
यानंतर विराट आणि रोहित यांच्यात संवाद झाला नाही का याबाबतच्या चर्चांना उधान आल. अनेक दिग्गजांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या. आता हे प्रकरण काय वळण घेणार हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
करून दाखवलं! सेहवागच्या ‘त्या’ थट्टेला स्मिथचे सडेतोड उत्तर
‘या’ तारखेपासून भारतात सुरु होणार देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा? बीसीसीआयने लिहिलेल्या पत्रात उल्लेख
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाचे ‘हे’ दोन महत्त्वाचे शिलेदार तिसऱ्या वनडेतून आणि टी20 मालिकेतून बाहेर