ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारताच्या निराशाजनक कामगिरीबाबत बीसीसीआय आज आढावा बैठक घेणार आहे. ताज्या बातमीनुसार, ही बैठक आज (11 जानेवारी) संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात होणार आहे. या बैठकीला कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसह उपस्थित राहतील. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर, पहिला सामना जिंकूनही भारताला मालिकेत 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला. मालिकेदरम्यान संघ निवड, ड्रेसिंग रूममधील चॅट लीक, अश्विनची निवृत्ती यासह अनेक गोष्टी चर्चेत आल्या. कर्णधार, प्रशिक्षक आणि निवडकर्ता आज बीसीसीआयला त्यांचे उत्तर देतील.
मुंबईत होणाऱ्या या विशेष सर्वसाधारण सभेत (एसजीएम) देवजीत सैकिया जय शाह यांची जागा घेऊ शकतात आणि बीसीसीआयचे सचिव म्हणून पदभार स्वीकारू शकतात.
या बैठकीत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब फॉर्मपासून ते अश्विनच्या निवृत्तीपर्यंतच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. मालिकेच्या मध्यभागी अचानक निवृत्ती घेऊन अश्विनने सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याला असे वाटू लागले की आता त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान नाही. खरंतर, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत वॉशिंग्टन सुंदर अचानक संघात आला, तर पर्थ कसोटीतही त्याला जडेजा-अश्विन जोडीच्या पुढे खेळवण्यात आले होते.
सप्टेंबरमध्ये बांग्लादेशविरुद्धच्या विजयानंतर, भारताने पुढील आठ कसोटी सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये पराभव पत्करला, ज्यामध्ये न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर 0-3 असा क्लीन स्वीपचा समावेश होता. या दरम्यान भारतीय संघासाठी जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली पर्थमधील विजय हा एकमेव महत्त्वाचा क्षण होता. निवड समितीकडून रोहित आणि विराट कोहली यांच्या कसोटी क्रिकेटमधील फॉर्म आणि भविष्याबद्दल माध्यमांमध्ये सुरू असलेल्या गोंधळावरही चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
अश्या स्थितीत भारताला जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर पुढील कसोटी मालिका खेळायची आहे, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची निवड कोणत्या आधारावर होईल हे पाहणे बाकी आहे. हे दोन्ही दिग्गज खेळाडू बऱ्याच काळापासून रणजी ट्रॉफी खेळलेले नाहीत. या बैठकीदरम्यान वरिष्ठ खेळाडू देशांतर्गत क्रिकेट न खेळण्याबाबतही प्रश्न विचारले जाऊ शकतात.
हेही वाचा-
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे खेळणार नाही
या 3 खेळाडूंची चांदी.! वनडे मालिकानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही संधी मिळण्याची शक्यता
काय सांगता! कॅच पकडल्यानंतर चाहत्याला 90 लाख रुपयांचे बक्षिस, या स्पर्धेसमोर आयपीएलही फेल!