भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे (Mohammed Shami) घोट्याच्या शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसन सुरू आहे. तो रणजी ट्रॉफीमध्ये त्याच्या घरच्या संघ बंगालसाठी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. अशा स्थितीत वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेपूर्वी (IND vs AUS Border Gavaskar Test Series) बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो खेळण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी अनुभवी गोलंदाजाच्या पुनरागमनाबद्दल मोठी अपडेट दिली आहे.
या वर्षाअखेरीस होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर मालिकेमध्ये वेगवान गोलंदाज शमीच्या सहभागाबाबतचा निर्णय राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) अहवालानंतर घेतला जाईल. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, शमी घोट्याच्या दुखापतीतून बरे होण्यात लक्षणीय प्रगती करत आहे. सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून सुरू होणाऱ्या देशांतर्गत हंगामात भाग घेण्यासाठी तो तयार असेल अशी अपेक्षा आहे. शमी सध्या एनसीएमध्ये पुनर्वसनाच्या अंतिम टप्प्यात आहे.
शाह म्हणाले की, “शस्त्रक्रियेनंतर शमीने गेल्या महिन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आणि आता तो हळूहळू त्याच्या गोलंदाजीचा भार वाढवत आहे. त्याला काहीच त्रास होत नाही. शमी ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका खेळणार की नाही हा त्याच्या फिटनेसचा मुद्दा आहे. त्यामुळे एनसीएच्या अहवालानंतर निर्णय घेतला जाईल.”
अलीकडेच, श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ रवाना होण्यापूर्वी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी शमीच्या प्रकृतीबाबत अपडेट देताना सांगितले होते की, शमीने नेट्समध्ये गोलंदाजी सुरू केली आहे. तो 21 सप्टेंबरपासून चेन्नईमध्ये बांगलादेशविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी पूर्णपणे सज्ज राहील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेश क्रिकेटमध्ये भूकंप, ‘या’ दिग्गजाने दिला आपल्या पदाचा राजीनामा
‘आधी 10 रुपये, आता संपूर्ण आयुष्याची कमाई…’, विनेश फोगटला भावाकडून रक्षाबंधनचे खास गिफ्ट
बाॅर्डर गावसकर ट्राॅफीपूर्वी ऑस्ट्रेलिया दिग्गजाने दिला भारताला इशारा…!