ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ फेब्रुवारीमध्ये 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेतील पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या सरफराज खान याला संधी मिळेल, अशी क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा होती, परंतु असे काहीच घडले नाही. निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
सरफराज खान (Sarfaraz Khan) याला संधी न मिळताच त्याच्या चाहत्यांनी बीसीसीआयवर ताशेरे ओढले. त्यांनी ईशान किशन (Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांंना संघात स्थान मिळू शकते, तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या सरफराजला का नाही? असा प्रश्न उपस्थित केला. सरफराज रणजी ट्रॉफी स्पर्धेत मागील 3 हंगामांपासून दमदार कामगिरी करत आहे. मागील 2 हंगामात त्याने प्रत्येक हंगामात 900 हून अधिक धावा केल्या आहेत. तसेच, चालू हंगामातही तो धावांचा पाऊस पाडत आहे. तरीही त्याला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी निवडले गेले नाही. अनेक आठवडे उलटून गेल्यानंतर आता निवड समितीच्या 5 सदस्यांपैकी एका सदस्याने सरफराजला न निवडण्यामागील कारणाचा खुलासा केला आहे.
निवडकर्ते श्रीधरन शरथ यांचा खुलासा
माध्यमांशी बोलताना निवडकर्ते श्रीधरन शरथ (Sridharan Sharath) यांनी या प्रकरणावर मौन सोडले. त्यांनी रोहित शर्मा, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांची प्रशंसा केला. ते म्हणाले की, “विराट अजूनही मॅचविनर आहे. चेतेश्वर पुजारा फलंदाजीत स्थिरता आणतो. रोहित हा एक शानदार कर्णधार आणि फलंदाज आहे. श्रेयस अय्यर सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. शुबमन गिल आणि केएल राहुल यांच्यात सर्वोत्तम फलंदाजी करण्याची क्षमता आहे.”
सरफराजवर बीसीसीआयची नजर
श्रीधरन यांनी संतुलन आणि संघ संयोजन ही सरफराजची निवड न होण्यामागील कारणे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “सरफराजवर बीसीसीआयची नजर आहे. वेळ आल्यानंतर त्याला त्याचा हक्क दिला जाईल. संघाची निवड करताना संतुलन आणि संयोजनावर लक्ष दिले जाते.”
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचू शकतो भारत
खरं तर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 2 सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. त्यात सरफराजला संधी देण्यात आली नाहीये. अशात म्हटले जात आहे की, पुढील 2 सामन्यात सरफराजला संधी दिली जाऊ शकते. भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका भारतासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. (bcci selector sridharan sharath explained why not select cricketer sarfraz khan in test team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! भारतीय महिलांचा विश्वचषकात दबदबा, न्यूझीलंडला नमवत मिळवले फायनलचे तिकीट
मनोरंजन क्षेत्रात एमएस धोनीची एन्ट्री, ‘असा’ आहे पहिल्या सिनेमाचा पोस्टर