भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) नवा अध्यक्ष बनणार आहे. त्याला या अध्यक्षपदावर अधिकृतरित्या 23 ऑक्टोबरला नियुक्त केले जाईल. याबरोबरच बीसीसीआयच्या व्यवस्थापनामध्ये जय शहा, अरूण धूमल, महिम वर्मा, ब्रिजेश पटेल आणि जयदेव शहा यांचा समावेश असणार आहे.
अलीकडेच बीसीसीआयमध्ये माजी प्रशासकांच्या अनेक नातेवाईकांची नावे समाविष्ट झाली आहेत. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचा छोटा भाऊ अरुण धूमल बीसीसीआयचे खजिनदार बनणार आहे.
भारताचे गृहमंत्री आणि गु़जरात क्रिकेटचे माजी अध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जय शहा बीसीसीआयचा सचिव बनणार आहे.
तसेच बीसीसीआयच्या सहसचिवपदी सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष निरंजन शहा यांचा मुलगा जयदेव शहा असणार आहे. त्याचबरोबर निरंजन शहा यांचा पुतण्या हिमांशू शहा हा सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा सचिव आहे.
बीसीसीआयचे माजी प्रशासक एन श्रीनिवासन, निरंजन शहा, अनुराग ठाकूर, अमित शहा, परिमल नाथवानी आणि चिरायू अमिन असे अनेकजण आता बीसीसीआयचा भाग नाहीत. परंतु, येत्या 23 ऑक्टोबरपासून या माजी अधिकाऱ्यांचे नातेवाईक बीसीसीआयचे कामकाज पाहणार आहेत.
बीसीसीआय आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांची मुलगी रूपा गुरूनाथ तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनची नवीन अध्यक्ष आहे. तसेच बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष चिरायू अमिन यांचा मुलगा प्रणव अमिन हा बडोदा क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष आहे.
बीसीसीआयचे दिवंगत माजी सचिव जयवंत लेले यांचा मुलगा अजित लेले बडोदा क्रिकेट संघटनेचा सचिव आहे.
बीसीसीआय आणि आयसीसीचे दिवंगत माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचा मुलगा अभिषेक दालमिया बंगाल क्रिकेट संघटनेचा सचिव आहे.
The new team at. @bcci .. hopefully we can work well .. anurag thakur thank you for seeing this through @ianuragthakur pic.twitter.com/xvZyiczcGq
— Sourav Ganguly (@SGanguly99) October 14, 2019