टी२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ मायदेशात न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकांसाठी तयारीला लागला आहे. या मालिकेपासून भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड हा भारताच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळेल. अनेक शक्यता व चर्चांना पूर्णविराम देत द्रविड याने हे मानाचे पद स्वीकारले आहे. मात्र, द्रविडने या पदासाठी नकार दिला असता तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याचा पर्याय देखील तयार ठेवला होता.
या दिग्गजाशी झाली होती चर्चा
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) संचालकपद तसेच भारत अ संघाचे प्रशिक्षकपद भूषवत असलेल्या राहुल द्रविडने सुरुवातीला वरिष्ठ भारतीय संघाचे प्रशिक्षक पद सांभाळण्यास नकार दिला होता. आपण युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी इच्छुक असल्याचे त्याने स्पष्ट केले होते. मात्र, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली व बीसीसीआय सचिव जय शहा यांनी मध्यस्थी करत द्रविड याला राजी केले.
परंतु, द्रविडने अखेरपर्यंत या गोष्टीसाठी नकार दिला असता तर बीसीसीआयने त्याऐवजी दिग्गज भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याला हे पद देण्याचा निश्चय केला होता. आयपीएलचा १४ वा हंगाम संपन्न झाल्यानंतर सौरव गांगुली व जय शहा यांनी लक्ष्मण याच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी लक्ष्मण याने विचार करण्यासाठी वेळ मागितला होता. मात्र, एनसीए संचालकपद सांभाळण्यासाठी आपण अजिबात इच्छुक नसल्याचे लक्ष्मण याने स्पष्ट केले होते.
या कारणाने दिलेला नकार
एनसीए संचालकपद सांभाळण्यासाठी लक्ष्मण याने नकार देण्याचे मुख्य कारण म्हणजे तो हैदराबाद येथील रहिवासी असून एनसीए बेंगलोर येथे स्थित आहे. त्यामुळे, वातावरणात एकरूप होण्यासाठी वेळ लागेल असे म्हणत त्याने नकार दिलेला. तसेच शहा व गांगुली यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्याच्या मानधनाविषयी देखील विचारणा केली होती. सध्या लक्ष्मण आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा मार्गदर्शक म्हणून काम पाहतो.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/t20wc-final-ausvnz-live-australia-have-won-the-toss-and-have-opted-to-field/
ट्राॅफीच्या डाव्या बाजूला उभं राहिलं की जिंकतंय? पाहा काय सांगतो आयसीसी विश्वचषकाचा इतिहास