भारतीय संघाने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याला आज १० वर्षे पूर्ण झाली आहेत. २ एप्रिल २०११ रोजी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत करत २८ वर्षांनंतर विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता. या पराक्रमाला १० वर्षे झाली असल्याने, अनेकांनी त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अशातच माजी निवडकर्त्यांनी रोहित शर्माला त्या विश्वचषकासाठी भारतीय संघात का स्थान मिळाले नव्हते याबद्दल खुलासा केला आहे.
विश्वचषक २०११ विश्वचषकासाठी के श्रीकांत यांच्या अध्यतेखालील निवड समीतीने भारतीय संघाची निवड केली होती. या निवड समीतीमध्ये राजा वेंकट आणि सुरेंद्र भावे हे देखील होते.
आता या विश्वचषकाच्या १० वर्षांनंतर वेंकट यांनी रोहितला भारताच्या संघात २०११ विश्वचषकासाठी का स्थान मिळाले नव्हते, याचे कारण सांगितले आहे. मिड-़डेशी बोलताना वेंकट यांनी सांगितले की ‘विश्वचषकासाठी संघ निवडण्यासाठी आम्ही आधीच योजना आखल्या होत्या. संघात फारसा बदल होणार नव्हता. १४ खेळाडूंची निवड झाली होती. पण १५ व्या खेळाडूची जागा निवड समीतीला रोहितला द्यायची होती. मात्र संघव्यवस्थापनाला पियुष चावला संघात हवा होता.’
तसेच ते म्हणाले, ‘रोहितमध्ये प्रतिभा होती. त्यामुळे निवड समीतीला वाटत होते की तो चांगली निवड असेल, पण संघव्यवस्थापनाला पियुष चावला हवा असल्याने, आम्ही त्यासाठी तयार झालो.’
त्याचबरोबर सुरेंद्र भावे म्हणाले, ‘हो, हे खरे आहे की आम्हाला रोहितला संघात स्थान द्यायचे होते. पण त्यावेळी संघाला एका लेग स्पिनरची गरज होती. पियुष चावला यासाठी फिट होता आणि तो तळात थोडीफार फलंदाजीही करु शकत होता. तसेच त्याची गुगलीही भारतासाठी फायदेशीर ठरु शकणार होती. त्यामुळे आम्हाला संघव्यवस्थापनाचा निर्णय स्विकारावा लागला.’
रोहितला जरी २०११ विश्वचषकासाठी भारतीय संघात संधी मिळाली नसली, तरी त्याने नंतर रोहितने चांगली कामगिरी करत भारतीय संघातील स्थान पक्के केले. तसेच तो नंतर २०१५ आणि २०१९ या दोन वर्षात झालेल्या विश्वचषकात भारतीय संघाकडून खेळला आहे. सध्या विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. विश्वचषकात त्याने ६ शतक केले आहेत. ज्यातील ५ शतक त्याने २०१९ च्या विश्वचषकात ठोकले होते.
रोहितने २०११ विश्वचषकात जागा न मिळाल्याने व्यक्त केली होती निराशा
साल २०११ च्या विश्वचषकात रोहितचा भारतीय संघात समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे त्याने २०११ च्या विश्वचषकाआधी भारतीय संघात संधी न मिळाल्याने ट्विट करत नाराजी व्यक्त केली होती. रोहितने २०११ च्या विश्वचषकाआधी केलेल्या या ट्विटमध्ये म्हटले होते की ‘विश्वचषकासाठी संघात संधी न मिळल्याने खूप खूप निराश झालो आहे. येथून आता मला पुढे जायला हवे. पण खरंच हा मोठा धक्का होता.’
Really really disappointed of not being the part of the WC squad..I need to move on frm here..but honestly it was a big setback..any views!
— Rohit Sharma (@ImRo45) January 31, 2011
या विश्वचषकानंतर मात्र रोहितने शानदार कामगिरी करत तो एक उत्तम फलंदाज असल्याचे सिद्ध केले. सध्या रोहितने आंतरराष्ट्रीय स्तरावर ३८ कसोटी, २२७ वनडे आणि १११ टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ७ शतकांसह २६१५ धावा केल्या आहेत. तसेच वनडेत त्याने २९ शतकांसह ९२०५ धावा केल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये त्याने सर्वाधिक ४ शतके करताना २८६४ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीसोबतच्या फोटोंना भन्नाट कॅप्शन देत जड्डूने जिंकली चाहत्यांची मने
डिव्हिलियर्सने निवडली आयपीएलची ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन, कोहली नाही तर ‘या’ खेळाडूला केले कर्णधार
वर्ल्डकप विजयानंतर धोनीने का केले होते मुंडण? तत्कालीन टीम मॅनेजरने उलगडले कारण