केंद्र सरकारने 3 सप्टेंबर रोजी जीएसटीमध्ये मोठे बदल केले आहेत. या बदलांचा परिणाम आता क्रिकेट चाहत्यांवरही दिसणार आहे. आयपीएल पाहणाऱ्या चाहत्यांना जिथे मोठा धक्का बसला आहे, तिथेच टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी (Team india’s Cricket fans) मात्र मोठी आनंदवार्ता आली आहे. आशिया कप 2025 (Asia Cup 2025) पूर्वी मोदी सरकारने भारतीय चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. आयपीएलचे सामने पाहणं आता आधीपेक्षा महाग होणार आहे, तर आंतरराष्ट्रीय सामने आधीपेक्षा स्वस्तात पाहता येणार आहेत.
सरकारने जीएसटीमध्ये केलेल्या बदलांनंतर आता आंतरराष्ट्रीय सामन्यांचे तिकिट स्वस्त झाले आहेत. आधी आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या तिकिटावर 28 टक्के जीएसटी होता, पण आता तो कमी करून 18 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामने पाहणं आता स्वस्त झालं आहे. आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 आणि महिला वनडे वर्ल्ड कप 2025 पाहणाऱ्या चाहत्यांसाठी ही खूपच चांगली बाब आहे.
याचवेळी सरकारने आयपीएलच्या तिकिटांवर जीएसटी वाढवला आहे. त्यामुळे अनेक चाहते आता आंतरराष्ट्रीय सामन्यांकडे अधिक वळतील अशी शक्यता आहे. मोदी सरकारचे मत आहे की, आयपीएल ही फक्त खेळाची स्पर्धा नसून व्यावसायिक मनोरंजन आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या तिकिटावर 28 टक्क्यांऐवजी थेट 40 टक्के जीएसटी लावला जाणार आहे. त्यामुळे आयपीएलचे तिकिट आता आधीपेक्षा अधिक महाग मिळेल. मात्र 500 रुपयांखालील तिकिटांवर अजूनही फक्त 18 टक्के जीएसटीच राहणार आहे.फक्त आयपीएलच नव्हे, तर प्रो कबड्डी लीग आणि इंडियन सुपर लीगच्या तिकिटांवरही या निर्णयाचा परिणाम होणार आहे.





