न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेमुळे दोन्ही संघ सरावात व्यस्त आहे. त्यासाठी दोन्ही संघात पाच सामन्याची टी२० मालिका सूरू आहे. यातील पहिले तिन्ही सामने जिंकत यजमान संघाने मालिका जिंकली असली तरी न्यूझीलंडचा चौथ्या सामन्यातील कामगिरीचा आलेख पाहता ते ही काही कमी नाही, असे दिसून येते. आता त्यांच्या संघात आणखी एका खेळाडूचा प्रवेश झाला असून त्यांची ताकद वाढली असे म्हणता येईल.
न्यूझीलंडने आगामी टी२० विश्वचषकासाठी संघ जाहीर केला होता, मात्र ऍडम मिल्नेमुळे त्यांना संघात बदल करावा लागला. मिल्ने दुखापतग्रस्त असून तो वेळेत विश्वचषकासाठी तयार होऊ शकत नसल्याने न्यूझीलंडने त्याच्या जागी कायले जेमिसनला मुख्य संघात घेतले. जेमिसनची राखीव संंघात निवड झाली होती, आता तो मुख्य संघात आल्याने त्याची जागा कोण घेणार हे आता किवींनी सांगितले आहे.
वेगवान गोलंदाज बेन सियर्स याची टी20 विश्वचषक 2026साठी न्यूझीलंड संघात निवड झाली आहे. त्याला ट्रॅव्हल रिजर्व म्हणून संघात निवडले आहे. यामुळे न्यूझीलंड संघात बदल झाला आहे.
सियर्स मुंबईमध्ये येत्या रविवारी संघासोबत जोडला जाणार आहे. न्यूझीलंडचे प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी सियर्सबाबत बोलताना म्हटले, “तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संघाच्या बाहेर होता. त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करत संघपुनरागमन केले आहे.”
सियर्सने न्यूझीलंडकडून २२ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २३ विकेट्स घेतल्या आहेत.
त्याने स्थानिक स्पर्धा सुपर स्मॅशममध्ये वेलिंग्टनकडून खेळताना १३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या या कामगिरीचाच फायदा म्हणून त्याची राष्ट्रीय संघात निवड झाली.
या स्पर्धेत न्यूझीलंड अमेरिकेविरुद्ध ६ फेब्रुवारीला सराव सामना खेळणार आहे. त्यानंतर स्पर्धेतील पहिला सामना ८ फेब्रुवारीला अफगानिस्तान विरुद्ध चेन्नईमध्ये खेळणार आहे.
टी२० विश्वचषक २०२६साठी न्यूझीलंडचा संघ- मिशेल सॅंटनर (कर्णधार), फिन ऍलन, मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेवॉन कॉनवे, जकॉब डफी, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, कायले जॅमिसन, डॅरिल मिचेल, जेम्स निशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र, टीम सिफर्ट, इश सोधी. बेन सियर्स (ट्रॅव्हलिंग रिजर्व)






