वर्तमान क्रिकेटजगतात सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू कोण? असा प्रश्न विचारला असता सर्व क्रिकेटप्रेमी एका सुरात इंग्लंडच्या बेन स्टोक्सचे नाव घेतील. इंग्लंड क्रिकेटमध्ये झालेल्या बदलात स्टोक्सचा सर्वात मोठा वाटा आहे. २०१५ विश्वचषकात साखळी फेरीतून माघारी परतल्यानंतर इंग्लंडने पुढचा विश्वचषक आपल्या नावे केला. या विश्वचषक विजयाचा नायकही बेन स्टोक्सच होता. आज स्टोक्स वयाच्या एकतिशीत प्रवेश करतोय. ‘स्टोक्सी’ नावाने ओळखला जाणाऱ्या स्टोक्सच्या आजवरच्या कारकिर्दीचा आपण आढावा घेऊया.
न्यूझीलंड टू इंग्लंड
स्टोक्स मूळता न्यूझीलंडचा रहिवासी. त्याचे वडिल जेरार्ड हे रग्बी खेळाडू आणि प्रशिक्षक होते. मात्र, स्टोक्सची आई इंग्लिश होती. जेरार्ड हे वर्किंगटाऊन रग्बी संघाचे प्रशिक्षक झाल्यानंतर हे सर्व जण बेन १२ वर्षाचा असताना इंग्लंडमधील कॉकरमाऊथ भागातील कुंब्रियन येथे स्थायिक झाले. बेन कॉकरमाऊथ क्रिकेट क्लबमध्ये प्रशिक्षण घेऊन लागला. त्याने २००६ मध्ये १५ वर्षाचा असताना नॉर्थ लॅंकाशायरसोबत कुंब्रिया सेकंड डिवीजनचे विजेतेपद पटकावले.
स्पर्धात्मक क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात
सन २००९ मध्ये स्टोक्सने डरहॅमसाठी लिस्ट ए पदार्पण केले. आपल्या तिसऱ्याच चेंडूवर त्याने त्यावेळेचा प्रमुख इंग्लिश फलंदाज मार्क रामप्रकाश याला बाद केले. २०१० च्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात इंग्लंडसाठी खेळताना त्याने भारताविरुद्ध दमदार शतक ठोकले. पुढे, प्रथमश्रेणी क्रिकेट गाजवल्याने त्याला २०१०-२०११ च्या ऍशेस मालिकेसाठी संघात स्थान दिले गेले. मात्र, त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.
आंतरराष्ट्रीय कारकीर्दीच्या सुरुवातीचे दिवस
स्टोक्सने २०११ मध्ये आयर्लंडविरुद्ध वनडे तर, वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० पदार्पण केले. मिळालेल्या काही सामन्यांत त्याची कामगिरी सरासरी राहिली. दुखापती, फॉर्म व बेशिस्त वर्तन या कारणांमुळे तो लवकरच संघाबाहेर गेला. २०१३-२०१४ ची ऍशेस त्याच्यासाठी लाभदायी ठरली. या मालिकेत त्याने अफलातून अशी नाही, परंतु, लक्षवेधी कामगिरी नक्कीच केली. त्यानंतरच बेन स्टोक्स हे नाव खर्या अर्थाने चमकायला सुरुवात झाली.
खलनायक ते नायक
सन २०१५-२०१६ या काळात स्टोक्स भविष्यातील मोठा खेळाडू होणार अशी सुरू चर्चा झालेली. मात्र, २०१६ टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरच्या षटकात इंग्लंडला बचावासाठी १९ धावांची गरज असताना स्टोक्स ‘खलनायक’ ठरला. वेस्ट इंडीजच्या कार्लोस ब्रेथवेटने त्याला सलग ४ षटकार खेचून विश्वचषक ओढून आणला. त्यानंतर, ढसाढसा रडणारा स्टोक्स सर्वांनी पाहिला.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात झालेली घटना विसरून स्टोक्स पुढे वाटचाल करू लागला. २०१७ आयपीएलमध्ये जबरदस्त अष्टपैलू कामगिरी करत त्याने रायझिंग पुणे सुपरजायंट संघाला अंतिम फेरीत पोहचवले. तसेच, तो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.
क्रिकेटचे जन्मदाते म्हटल्या जाणाऱ्या इंग्लंडने कधीही वनडे विश्वचषक जिंकला नव्हता. २०१९ मध्ये इंग्लंडमध्ये आयोजित स्पर्धेत स्टोक्स चमकला. न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात त्याने एकाकी झुंज देत आधी सामना बरोबरीत रोखला व सुपर ओव्हरमध्येही धावा बनवून संघाला विश्वचषकावर नाव कोरून दिले. अंतिम सामन्याचा मानकरी अर्थातच स्टोक्स होता.
सध्या स्टोक्सचे नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज अष्टपैलू असलेल्या सर इयान बोथम, कपिल देव व इम्रान खान यांच्या बरोबरीने घेतले जाते. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये तो इंग्लंडचा हुकमी एक्का आहे. बेन स्टोक्स हे नाव आणखी ६-७ वर्ष क्रिकेटविश्वात धूमाकूळ घालणार हे मात्र नक्की आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रीडाविश्वात खळबळ! भारताच्या आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूचा पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ‘अशी’ असेल भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन