मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील चौथा सामना वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात झाला. मोठ्या धावसंख्येच्या या सामन्यात फलंदाजांचा दबदबा दिसून आला आहे. दरम्यान, पंजाब किंग्स फलंदाजी करत असताना राजस्थानच्या क्षेत्ररक्षकांनी काही डोळे दिपवून टाकणारे झेलही घेतले. यात ख्रिस गेलचा बेन स्टोक्सने घेतलेल्या झेलाचाही समावेश आहे.
स्टोक्सने घेतला अप्रतिम झेल
या सामन्यात पंजाबने सलामीवीर मयंक अगरवालची विकेट तिसऱ्या षटकात गमावली. त्यानंतर ख्रिस गेल केएल राहुलसह फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. गेलने त्याच्या नेहमीच्या अंदाजात फलंदाजी करत २८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारासंह ४० धावांची वादळी खेळी केली. त्याने राहुलसह ६७ धावांची भागीदारी केली. त्यांची भागीदारी रंगत असतानाच अखेर युवा रियान परागच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात गेलने स्टोक्सकडे झेल दिला.
झाले असे की डावाचे १० वे षटक रियान पराग टाकत होता. त्याच्या ५ व्या चेंडूवर गेलने मोठा फटका खेळला. तो चेंडू झेलण्यासाठी लाँग-ऑनला क्षेत्ररक्षण करत असलेला बेन स्टोक्स धावत आला आणि त्याने पुढे झेपावत हा झेल घेतला. त्यामुळे गेलला माघारी परतावे लागले.
— Cricsphere (@Cricsphere) April 12, 2021
पंजाबचा २२१ धावांचा डोंगर
या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकत पंजाबला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. या आमंत्रणाचा स्विकार करत पंजाबच्या फलंदाजांना राजस्थाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केल्याचे पाहायला मिळाले. पंजाबने २० षटकांत ६ बाद २२१ धावा केल्या होत्या.
त्यांच्याकडून कर्णधार केएल राहुलने ७ चौकार आणि ५ षटकारांसह ५० चेंडूत ९१ धावांची खेळी केली. तसेच दिपक हुडाने २८ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याचबरोबर ख्रिस गेलने ४० धावांची खेळी केली. त्यामुळे पंजबाला २२१ धावा करता आल्या.
राजस्थानकडून चेतन सकारियाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर ख्रिस मॉरीसने २ आणि परागने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
मोईन अली-तस्लिमा नसरीन प्रकरणानंतर इंग्लिश खेळाडूंचे मोठे पाऊल, सोशल मीडियाचाच करणार बहिष्कार?
अरे व्वा! ‘हा’ भारतीय क्रिकेटपटू इंग्लंडच्या ‘द हंड्रेड लीग’मध्ये करणार समालोचन