भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका पुणे येथे खेळली जात आहे. मालिकेत १-० अशा आघाडीवर असलेला भारतीय संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करत आहे. मात्र, या सामन्यावेळी इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स व कर्णधार जोस बटलर यांना पंचांनी नियम मोडल्याने ताकीद दिली.
अशी घडली घटना
दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. क्षेत्ररक्षण करताना इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने आयसीसीचा प्रमुख नियम मोडला. भारतीय डावाच्या चौथ्या षटकात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिस टोप्ली गोलंदाजी करत होता. त्यावेळी स्टोक्सने चेंडूला लाळ लावून चेंडू चमकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मैदानी पंच नितीन मेनन व वीरेंद्र शर्मा यांनी त्याला तसे करण्यापासून रोखले. स्टोक्सने त्वरित माफी मागत, हे अनावधानाने घडल्याचे म्हटले. त्यानंतर दोन्ही पंचांनी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याला देखील पुन्हा असे न करण्याबाबत ताकीद दिली.
यापूर्वी देखील घडली होती अशी घटना
भारत आणि इंग्लंड यांच्यातील अहमदाबाद येथील तिसऱ्या दिवस-रात्र कसोटीत बेन स्टोक्सने असेच कृत्य केले होते. त्यावेळी डावाच्या अगदी सुरुवातीलाच त्याने चेंडूला थुंकी लावली होती. मात्र, त्यानंतर त्याने माफी मागत प्रकरण मिटविले होते.
असा आहे आयसीसीचा नियम
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कोविड-१९ या साथीच्या आजारामुळे नियमात बदल केले आहेत. आता गोलंदाजांना किंवा क्षेत्ररक्षकांना चेंडूला चकाकी आणण्यासाठी थुंकी लावता येत नाही. त्याऐवजी ते घामाने चेंडू चमकावू शकतात. एखाद्या खेळाडूने चुकीने चेंडूला थुंकी लावल्यास तो चेंडू सॅनीटाईज करण्यात येतो.
भारतीय संघाचे इंग्लंडला ३३७ धावांचे आव्हान
इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. भारतीय संघानेही याचा फायदा घेत ५० षटकात ६ बाद ३३६ धावांचा डोंगर उभा करत इंग्लंडला ३३७ धावांचे आव्हान दिले. भारताकडून केएल राहुलने १०८ धावांची शतकी खेळी केली. तर रिषभ पंतने ७ षटकारांसह आक्रमक ७७ धावांची खेळी केली. तसेच कर्णधार विराट कोहलीने ६६ धावांची अर्धशतकी खेळी केली. इंग्लंडकडून रिस टोप्ली आणि टॉम करनने सर्वाधिक प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
अन् राहुलच्या फ्लॉप शोवर पूर्णविराम! शतक केल्यानंतर पकडले कान, पाहा सेलिब्रेशनचा व्हिडिओ
पंतने चेंडू मारला सीमापार, तरीही टीम इंडियाला मिळाली नाही एकही धाव! वाचा कोणत्या नियमाचा बसलाय फटका