कोलकाता मधील नेताजी सुभाषचंद्र बोस इनडोअर स्टेडियममध्ये बंगाल लेगचा शेवटचा सामना दिल्ली आणि बंगाल यांच्यात झाला. या सामन्यत दोन्ही संघ पहिल्या मिनिटापासून सामान पातळीचे खेळ करत होते आणि शेवटी हा सामना बरोबरीतच सुटला. रेडींगमध्ये बंगालकडून मनिंदर सिंगने १३ गुण मिळवले तर दिल्लीकडून मुळचा महाराष्ट्राचा असलेल्या अनंत पाटीलने ९ गुण मिळवले.
पहिल्या सत्रापासूनच सामना अटीतटीचा ठरला दोनही संघाकडे काही काळापूर्ती २, ३ गुणांची बढत असायची पण दुसरा संघ लगेचच सामन्यात पुनरागमन करत असे. १२ व्या मिनिटात दिल्ली ऑल-आऊट झाली खरी पण अनंत पाटीलच्या सलग ४ बोनस गुणांमुळे बंगालची बढत फक्त २ गुणांची राहिली. पहिल्या सत्रा अखेर दोनही संघ १२-१२ असे बरोबरीत होते.
त्यानंतर पुढील १० मिनिट सामन्यात बंगाल आणि बंगालच्या रेडर्सचा दबदबा राहिला, त्यांनी २६ व्या मिनिटाला पुन्हा दिल्लीला ऑल-आऊट केले पण पाटीलने रेडींगमध्ये चांगली कामगिरी करून पुन्हा दिल्लीला सामन्यात परत आणले. सामन्याच्या ३३ व्या मिनिटाला मणिंदर सिंगने आपले सुपर १० पूर्ण केले. त्यानंतर दिल्लीच्या कर्णधार मेराज शेखने सुपर रेड करून बंगालला ऑल-आऊट केले, पण असे करताना त्याला स्वतःला दुखापत झाली आणि तो संघाबाहेर गेला.
शेवटच्या मिनिटामध्ये जेव्हा बंगालकडे १ गुणाची आघाडी होती तेव्हा दिल्लीच्या डिफेन्सने मणिंदरला वॉकलाइनही पार करून दिली नाही व दिल्लीच्या सुनीलने मणिंदरची पकड केली. हा क्षण या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला.