आजच्या काळात क्रिकेट हा राजांचा खेळ राहिला नसून सामान्य माणसाचा खेळ झाला आहे. रणजी ट्रॉफी खेळलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत काही मंत्र्यांचीही नावे सुद्धा आहेत. त्यापैकी एक म्हणजे मनोज तिवारी हे आहेत. मनोज हे देशातील पहिले क्रिकेटपटू ठरले आहेत, ज्यांनी मंत्री म्हणून प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला. १७ फेब्रुवारी रोजी कटक येथील बाराबती स्टेडियमवर बडोद्याविरुद्ध सामना खेळण्यासाठी मैदानात उतरताच त्यांनी हा विक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारे ते पहिले क्रिकेटपटू ठरले.
मनोज हे रणजी क्रिकेटमध्ये पहिल्यापासूनच ओळखीचे नाव आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक रणजी करंडक हंगाम खेळले आहेत. मनोज यांनी आतापर्यंत १०० रणजी सामन्यांसह १२५ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी ५०.३६ च्या सरासरीने ८,९६५ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये २७ शतकांचा आणि ३७ अर्धशतकांचा समावेश आहे. ३०३ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे.
मनोज तिवारी बंगाल रणजी संघाचे महत्त्वाचे सदस्य आहेत. आतापर्यंत त्यांनी फक्त क्रिकेटपटू म्हणून रणजी सामने खेळले होते, पण आतापासून ते एक मंत्री म्हणून क्रिकेट खेळतांना दिसणार आहेत. ते मागील वर्षी बंगाल राज्याचे क्रीडा मंत्री झाले आहेत. त्यांनी ममता बॅनर्जी सरकारमध्ये मंत्रिपद स्वीकारले आहे.
रणजी खेळणारे मनोज बंगालमधील पहिले क्रीडा राज्यमंत्री नसून, यापूर्वी लक्ष्मी रतन शुक्ला यांनीही रणजी खेळली आहे. मात्र, मंत्री होण्यापूर्वी शुक्ला यांनी रणजी ट्रॉफी खेळली होती. मंत्री होण्याअगोदरच त्यांनी क्रिकेटला रामराम केला होता. पण मनोज हे एकमेव असे आहेत ज्यांनी क्रिकेटसह राजकारणात सुद्धा आपली खेळी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर देखील रणजी खेळले आहेत. अनुराग ठाकूर यांनी २०००-२००१ च्या हंगामात हिमाचल प्रदेशकडून जम्मू आणि काश्मीर विरुद्ध एक रणजी सामना खेळला होता. त्या सामन्यात त्यांना कर्णधारपदही भूषवण्याची संधी सुद्धा लाभली होती. त्यावेळी ते हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. तसेच, बीसीसीआयमधील काही अधिकाऱ्यांनी सुद्धा रणजी ट्रॉफी खेळली आहे त्यामध्ये अमेय खुरासिया आणि जोगिंदर शर्मा यांचा समावेश आहे. अनेक राजकारण्यांनी रणजी ट्रॉफी खेळली आहे त्यामध्ये नवज्योतसिंग सिद्धू, मुहम्मद अझरुद्दीन, गौतम गंभीर, कीर्ती आझाद, अशोक दिंडा यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
नवी आयसीसी क्रमवारी| विराट-बाबरसह हेजलवूडही ‘त्या’ खास यादीत सामील (mahasports.in)
रवी बिश्नोईसाठी टी२० पदार्पण राहिले खास! सामनावीर ठरल्यावर दिली मोठी प्रतिक्रिया (mahasports.in)