बेंगलोर | भारतात क्रिकेटवर सट्टा लावने कायद्याने गुन्हा आहे. पोलीस प्रशासन याबाबत वारंवार सूचनाही देतात. पोलिसांच्या सूचनेला न जुमानताही बेंगलोरमध्ये सट्टेबाजी सुरु होती. त्यामुळे क्रिकेटमधील सट्टेबाजीच्या विविध प्रकरणात 3 लोकांना अटक करण्यात आली आहे.
राजस्थान आणि हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात केली सट्टेबाजी
बेंगलोर पोलिसांनी मंगळवारी (27 ऑक्टोबर) सांगितले की, “सोमवारी (26 ऑक्टोबर) मल्लेश्वरम भागातून 2 जणांना अटक करण्यात आली आहे. राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या (22 ऑक्टोबर) सामन्यावर या दोघांनी सट्टा लावला होता.”
लोटसबुक अॅपचा झाला वापर
आयपीएल क्रिकेट सामन्यात 48 वर्षीय होयसला गौडा आणि कोडनारामपुरा येथील नरसिंहमूर्ती उर्फ मूर्ती (38) यांनी लोटसबुक 9.आईओ या अॅपचा वापर केल्याचा आरोप आहे.
याबद्दल बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “त्यांनी गूगल पे सारख्या ऑनलाईन सुविधांचा वापर करून गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले. दोघांनीही त्यांच्या फोनवर लोटसबुक 9.आयओ अॅप डाउनलोड केले होते. सामन्यादरम्यान सट्टा लावण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींकडून तेच अॅप डाउनलोड केले गेले. सट्टा लावण्यासाठी किमान रक्कम 5000 रुपये होती.”
पुढे बोलताना पोलीस म्हणाले की, “सट्ट्यात पराभूत झालेल्या लोकांकडून हे दोघेही पैसे वसुल करत होते. सट्टा जिंकणाऱ्या लोकांना ते पैसे देत होते. आम्ही त्यांच्याकडून 13.5 लाख रुपये जप्त केले आहेत.”
दुसऱ्या प्रकरणात 85 हजार रुपये जप्त
दुसर्या एका प्रकरणात, लोकांना क्रिकेटमध्ये सट्टा लावण्यास प्रोत्साहित केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 85 हजार रुपये जप्त केले आहेत.
यावर्षी आयपीएल सट्टेबाजीची ही पहिली घटना नाही. युएईमध्ये हंगाम सुरू झाल्यापासून, देशभरातील अनेक बुकी सक्रिय झाले आहेत. पोलिसांनी कडक कारवाहीदेखील केली आहे. ते आरोपींवर शिक्कामोर्तब करत आहेत. पोलीस सर्व प्रयत्न करूनही अद्यापही गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण झालेली नाही.