भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाज पटेलने जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने या सामन्याच्या पहिल्याच डावात भारतीय संघाच्या सर्व (१०) विकेट्स घेतल्या. एजाजव्यतिरिक्त न्यूझीलंड संघाच्या एकाही गोलंदाजाला भारताची एकही विकेट घेता आली नाही. एजाजने या सामन्यात अनेक विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवलेले. एजाज भारतात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणारा विदेशी गोलंदाज देखील ठरला आहे.
एजाज पटेलने या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघासाठी पहिल्या चार क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या महत्वाच्या फलंदाजांना बाद केले. तर दुसऱ्या दिवशी देखील त्याचे उत्कृष्ट प्रदर्शन कायम ठेवत राहिलेल्या सहा विकेट्स देखील घेतल्या. एजाजने घेतलेल्या या १० विकेट्सच्या जोरावर तो आता भारतात सर्वोत्कृष्ट कसोटी प्रदर्शन केलेला पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात पहिल्या डावात ११९ धावा खर्च केल्या आणि १० विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनला त्याने मागे टाकले आहे.
भारतात कसोटी सामना खेळताना सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या गोलंदाजांचा विचार केला, तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा लायन आहे. त्याने २०१७ साली भारताविरुद्ध बेंगलोरमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या एका डावात ५० धावा देऊन ८ विकेट्स घेतल्या होत्या. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण अफ्रिकेचे लान्स क्लुसनर आहेत. त्यांनी १९९६ मध्ये कोलकाता येथे खेळताना एका डावात ६४ धावा देत ८ विकेट्स घेतल्या होत्या. पाकिस्तानचे सिकंदर बट हे या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी दिल्लीमध्ये खेळताता १९७९ साली ६९ धावा देऊन ८ विकेट्स घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा जेसन क्रेझा या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. ज्याने २००८ साली नागपूरमध्ये खेळताना २१५ धावा खर्च करून भारताच्या ८ विकेट्स घेतल्या होत्या.
दरम्यान, एजाज पटेलने दुसऱ्या दिवशी देखील त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले आणि भारतीय संघाला मर्यादित धावसंख्येवर रोखले. भारताने पहिल्या डावात ३२५ धावा केल्या. भारतासाठी मयंक अगरवाने सर्वाधिक १५० धावांची खेळी केली. यामध्ये त्याच्या १७ चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. तसेच अक्षर पटेलने देखील ५२ धावांचे मोलाचे योगदान दिले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी देखील नेत्रदीपक गोलंदाजी केली आणि न्यूझीलंड संघाचा पहिला डाव अवघ्या ६२ धावांवर गुंडाळला.