सोमवारी (१६ मे) आयपीएल २०२२ च्या ६४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जला मात दिली. दिल्लीने हा सामना १७ धावांनी जिंकला. या विजयानंतर दिल्ली प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे, तर पंजाब मात्र या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. पंजाबसाठी हा पराभव खूपच महागात पडणारा आहे, कारण पराभवानंतर प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे त्यांचे सर्व मार्ग जवळपास बंद झाले आहेत. सामना संपल्यानंतर पंजाबचा कर्णधार मयंक अगरवालने त्याची खास प्रतिक्रिया दिली आणि खेळाडूंनी केलेली चूक देखील दाखवून दिली.
मयंक अगरवाल (Mayank Agarwal) म्हणल्याप्रमाणे पंजाब किंग्जने ५ ते १० या षटकांदरम्यान अधिक विकेट्स गमावल्या आणि याच कारणास्तव संघ अडचणीत आला. सामना संपल्यानंतर मयंक म्हणाला की, “आम्ही आज चांगली फलंदाजी केली नाही. संघाने ५ ते १० या षटकांदरम्यान खूप विकेट्स गमावल्या आणि हेच आमच्या पराभवाचे कारण ठरले. ही खेळपट्टी तेवढी खराब नव्हती आणि आम्ही हे लक्ष्य गाठले पाहिजे होते. आम्हाला आमच्या रणनीतीवर पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे.”
दरम्यान, उभय संघातील हा सामना मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर खेळला गेला. पंजाबचा कर्णधार मयंक अगरवालने सर्वप्रथम नाणेफेक जिंकली आणि दिल्लीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने ७ विकेट्सच्या नुकसानावर १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ जेव्हा फलंदाजीसाठी आला, तेव्हा त्यांना हे लक्ष्य गाठता आले नाही. मर्यादित २० षटकांमध्ये पंजाब किंग्जने ९ विकेट्सच्या नुकसानावर १४२ धावा केल्या.
गुणतालिकेचा विचार केला, तर गुजरात टायटन्सकडे २० गुण आहेत आणि त्यांनी सर्वप्रथम प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. त्यानंतर राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही संघांकडे प्रत्येकी १६-१६ गुण आहेत आणि प्लऑफमध्ये त्यांची जागा जवळपास पक्की आहे.
पंजाबला मात दिल्यानंतर दिल्लीचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आला आहे आणि आरसीबी मात्र पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. दिल्ली आणि आरसीबीकडे प्रत्येकी १४-१४ गुण आहेत. दोन्ही संघाने साखळी फेरीतील प्रत्येकी अजून एक-एक सामना खेळायचा आहे, जो प्लऑफसाठी निर्णायक ठरणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘मी आत्ता केवळ २४ वर्षांचा’, असं का म्हणाला रिषभ पंत? वाचा सविस्तर
दिल्लीच्या पंजाबवरील विजयानंतर कोणाला आहे प्लेऑफसाठी सर्वाधिक चान्स? जाणून घ्या समीकरण
Video: सरफराजच्या स्कूप शॉटने जिंकली मनं, पाहा डोळ्यांचे पारणे फेडणारा फटका