भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी आक्रमण सध्या जगातील सर्वोत्तम आक्रमणांमध्ये गणले जाते. संघाचे गोलंदाजी आक्रमण असे आहे की, ते कुठल्याही खेळपट्टीवर जाऊन फलंदाजांना अडचणीत आणू शकते. मुख्य गोलंदाजांव्यतिरिक्त, संघाचे राखीव गोलंदाज देखील खूप मजबूत आहे आणि संघाकडे असे गोलंदाज आहेत जे मुख्य गोलंदाजांच्या अनुपस्थितीत चांगला खेळ दाखवू शकतात. याचे उदाहरण ऑस्ट्रेलियात पाहायला मिळाले होते. याचे बरेच श्रेय माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांना जाते. २०१७ पासून ते रवी शास्त्री यांच्या नेतृत्वाखालील सपोर्ट स्टाफचा भाग होते. भरत अरुण यांना त्यांच्या काळात वेगवान गोलंदाज म्हणून भारतीय संघात स्थान मिळाले होते. त्यांनी भारतासाठी दोन कसोटी आणि चार वनडे सामने खेळले आहेत. त्यांनी कसोटीत चार आणि वनडे सामन्यात एक बळी मिळवला. भरत अरुण यांचे एक विधान सध्या खूप चर्चेत आहे.
भरत अरुण हे भारतीय संघाला एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज देण्यासाठी ओळखले जातात. परंतु भरत यांच्या एका विधानाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकापेक्षा आपण चांगले फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक असल्याचे भरत यांनी म्हटले आहे. भरत यांनी सांगितले की, “मी वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकापेक्षा चांगला फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक आहे. तुम्हाला माहिती आहे, लोक असे म्हणतात की मी सर्वोत्तम वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक आहे. पण मला असे वाटत नाही. अर्थात मी स्वतः वेगवान गोलंदाज राहिलो आहे. मात्र, फिरकी गोलंदाजीवरही मी खूप काम केलेय. मला फिरकीपटूंसोबत अँगल्स आणि लाईन यावर चर्चा करायला आवडते.”
जेव्हा भरत यांना भारतीय संघासोबत प्रशिक्षक म्हणून, त्यांच्या सर्वात मोठ्या यशाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ये म्हणाले, ‘ प्रामाणिकपणे सांगायचे तर, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. जसप्रीत बुमराहला कसोटी गोलंदाज बनवणे. सध्या तो आता जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. भारतीय क्रिकेटमध्ये घडलेल्या आश्चर्यकारक गोष्टींपैकी ही एक आहे. ऑस्ट्रेलियात जिंकणे आणि प्रत्येक वेळी २० विकेट मिळवणे ही मोठी कामगिरी आहे. ह्या अशा गोष्टी आहेत ज्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.”
ते पुढे म्हणाले, ”सध्या या संघात खूप आत्मविश्वास आहे. प्रत्येक गोलंदाजाला तो किती सक्षम आहे हे माहीत आहे आणि प्रत्येकाला सर्वोत्तम व्हायचे आहे. सर्वांमध्ये खूप चांगले सामंजस्य आहे. तसेच, अश्विनने त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये पुनरागमन केल्याने, आम्ही एक उत्कृष्ट गोलंदाजी युनिट तयार करण्यात यशस्वी झालो आहोत.” विश्वचषकानंतर अरूण यांनी भारतीय संघाची साथ सोडली आहे.