पुणे : विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्स स्पर्धेत भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने विजेतेपद पटकावले.
वानवडी येथील ‘एस.आर.पी.एफ.’च्या मैदानावर ही स्पर्धा झाली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू परेश शिवलकर, राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू सुयोशा शेट्टी, राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू प्रसाद खटावकर, संस्थेचे सचिव जितेंद्र पितळीया, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसन्न देसाई, ज्येष्ठ आर्किटेक्ट मनोज तातूसकर, खिरीड टुरिझमचे संतोष खिरीड उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या क्रीडा संघातील तेजल अंधारे ऋषिकेश वखारे आदित्य पवार नमन पारेख यांनी आयोजनात सहभाग घेतला.
आयपीएलच्या बातम्यांसाठी आताच व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा!- इथे क्लिक करा
स्पर्धेतील मुलांच्या गटातील फुटबॉल स्पर्धेतील अंतिम लढतीत भारती विद्यापीठ संघाने ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघावर सडनडेथमध्ये ६-५ अशी मात केली. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल नोंदविण्यात अपयश आले. त्यामुळे पेनल्टी शूटआउटचा अवलंब करण्यात आला. यातही ५-५ अशी बरोबरी झाली. यात भारती विद्यापीठकडून आर्यासेन, ईसाक, रिषी, दीपककुमार, प्रियांशू यांनी गोल केले, तर ब्रिककडून अथर्व वानकडे, मनीष यादव, जयेश खैरे, शुभम अग्रवाल, अंश अग्रवाल यांनी गोल केले. सडनडेथमध्ये भारती विद्यापीठकडून दिनांको मोदकने गोल केला, तर ब्रिकच्या शिवम राठोडला गोल करण्यात अपयश आले.
फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत भानुबेन कॉलेजने पिंपरी-चिंचवडच्या एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर १-०ने मात केली. यात श्रुती वीरने दहाव्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला.
व्हॉलीबॉलमध्ये पाटील स्कूल विजेते
व्हॉलिबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात आकुर्डीच्या डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत पाटील स्कूलने सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर २५-९, २५-२७, १५-७ अशी मात करून विजेतेपद पटकावले. व्हॉलिबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात सिंहगड कॉलेजने या पराभवाची परतफेड केली. अंतिम लढतीत सिंहगड कॉलेजने डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघावर २५-१६, २५-२२ अशी मात केली.
बास्केटबॉलमध्ये पाटील स्कूलचीच बाजी
बास्केटबॉल स्पर्धेतील मुलांच्या गटात डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघानेच बाजी मारली. अंतिम लढतीत पाटील स्कूलने मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर ४५-३४ असा विजय मिळवला. मुलींच्या गटात मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत मराठवाडा कॉलेजने भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर ३२-३१ असा रोमहर्षक विजय मिळवला.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू
१. व्हॉलिबॉल मुली – कांचन (डी. वाय. पी. सी. ओ. ए., आकुर्डी).
२. व्हॉलिबॉल मुले – पुरुषोत्तम मुसमाडकर (डी. वाय. पी. सी. ओ. ए., आकुर्डी)
३. बास्केटबॉल मुली – शांभवी शिंदे (एमएमसीओए) आणि आश्लेषा नेहेरे (एमएमसीओए)
४. बास्केटबॉल मुले – सिद्धांत केंजळे (एमएमसीओए)
५. फुटबॉल मुली – समीक्षा पाटील (एसबीपीसीओए) आणि वैष्णवी निवेकर (बीएनसीए)
६. फुटबॉल मुले – अंश अग्रवाल (बीएसओए) आणि दीपक कश्यप (बीव्हीडीयू)