-आदित्य गुंड (Twitter- @adityagund)
वेस्ट इंडिजमध्ये आपल्या जायबंदी जबड्याभोवती बँडेज बांधून सलग १४ शतके टाकणारा अनिल कुंबळे आठवतोय? कुणी कल्पनाही करू शकणार नाही अशी गोष्ट त्या कसोटीत कुंबळेने केली. ही कसोटी अजून एका कारणानेही लक्षात राहिली. या कसोटीत एका विशीतल्या फलंदाजाने भारताकडून शतक काढले. हे शतक करून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकावणारा यष्टीरक्षक होण्याचा मान त्याने मिळवला. त्याचबरोबर भारताकडून परदेशात शतक ठोकणारा केवळ दुसरा यष्टीरक्षक म्हणून त्याची नोंद झाली. तो यष्टीरक्षक, फलंदाज होता अजय रात्रा.
अजय मूळचा हरयाणामधील फरिदाबादचा. सुरजनलाल रात्रा आणि त्यांची पत्नी यांना एकूण पाच मुले. त्यातला अजय चौथा. अजयच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. अगदी बेताचीच म्हणा ना. त्यामुळे अजयचे क्रिकेट खेळण्याचे लाड पुरवणे तसे जड होते. मात्र आपल्या पाल्यामध्ये गुणवत्ता असेल तर इतर पालक जे करतात तेच अजयच्या पालकांनी केले. त्यांनी अजयच्या क्रिकेटला सतत प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे आपण पुढे जाऊ शकलो हे सांगायला अजय आजही विसरत नाही.
क्रिकेटची सुरुवात नक्की कुठे झाली हे विचारले असता, इतर मुलांप्रमाणेच मीही फरिदाबादच्या गल्ल्यांमध्ये, कधी घराच्या अंगणात क्रिकेट खेळायला सुरुवात केली असे त्याने सांगितले. अजय खरं तर यष्टीरक्षक नव्हता. त्याने एक फलंदाज आणि क्षेत्ररक्षक म्हणून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. नंतर नहार क्रिकेट स्टेडियमवर सरावाला सुरुवात केल्यावर त्याने यष्टीरक्षण करायला सुरुवात केली. यष्टीरक्षकाला मैदानावरील खेळात सतत सहभागी व्हायला मिळत असल्याने आपण यष्टीरक्षक बनायचे ठरवले असे अजय सांगतो. यष्टीरक्षक म्हणून अजय ऑस्ट्रेलियाच्या इयन हिलीला आपला आदर्श मानत असे. हिलीला टीव्हीवर बघत त्याने यष्टीरक्षणाचे सुरुवातीचे धडे गिरवले.
शाळेत क्रिकेट खेळणाऱ्या अजयमधील गुणवत्ता हरयाणाचे रणजी खेळाडू सरकार तलवार यांनी हेरली. सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली अजयमधला यष्टीरक्षक आकाराला येऊ लागला. विजय मर्चंट चषक आणि कूच बिहार चषक अशा स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत अजयने वयाच्या १७ व्या वर्षी हरयाणाच्या रणजी संघात स्थान मिळवले. रणजी संघात निवड झाल्याची बातमी आली तेव्हा अजय ओएनजीसीसाठी सामना खेळत होता. दिवसाचा खेळ संपवून हॉटेलवर आल्यानंतर त्याला रणजी संघात निवड झाल्याची बातमी कळाली. अर्थातच अजयचा त्यावर विश्वास बसला नाही. त्याने तडक एसटीडी बूथ गाठला आणि हरयाणा क्रिकेट असोसिएशनच्या ऑफिसमध्ये फोन लावला. बातमी खरी आहे असे त्यांनी सांगितल्यावरच अजयचा त्यावर विश्वास बसला.
रणजी क्रिकेटच्या आपल्या पहिल्या हंगामात अजयने ४ सामन्यांत ९७ धावा केल्या आणि यष्टीमागे ८ झेलही घेतले. यात मध्यप्रदेशविरुद्ध केलेल्या अर्धशतकाचाही समावेश होता. वयाच्या १७ व्या वर्षी राजेश चौहान, मनिष मजिथिया यांसारख्या गोलंदाजांविरुद्ध अर्धशतक करणे ही मोठी गोष्ट होती. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढल्याचे अजयने सांगितले. रणजी क्रिकेटच्या आपल्या दुसऱ्या हंगामात १९९९-०० मध्ये अजयने ८ सामन्यांत २७५ धावा केल्या. यात २ अर्धशतकांचा समावेश होता. या हंगामात त्याने यष्टीमागे ११ झेल घेतले आणि ३ फलंदाज यष्टीचित केले. या हंगामात दिल्ली विरुद्धच्या सामन्याचा चौथा दिवस अजयला आजही ठळकपणे आठवतो. पहिल्या डावात १६६ धावांवर आटोपलेल्या हरयाणाला दिल्लीने ४७० धावा करून प्रत्त्युत्तर दिले. दुसऱ्या डावात चार गडी बाद असताना अजय मैदानावर आला. हरयाणाचा फलंदाज संजय दलाल बरोबर त्याने सबंध दिवस खेळून काढत सहाव्या गड्यासाठी ११५ धावांची नाबाद भागीदारी करत हरयाणाला पराभवापासून वाचवले. दिल्लीच्या संघात त्यावेळी आशिष नेहरा, निखिल चोप्रा,अमित भंडारी, अजय शर्मा यांसारखे गोलंदाज होते. अशा गोलंदाजांविरुद्ध अर्धशतक करून संघाला पराभवापासून वाचवल्यामुळे ही खेळी आजही अजयच्या स्मरणात आहे.
याचदरम्यान श्रीलंकेमध्ये होणाऱ्या १९ वर्षाखालील विश्वचषकासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली. मोहंमद कैफच्या नेतृत्वाखाली या संघात युवराज सिंग, वेणुगोपाल राव, रीतींदर सोधी असे खेळाडू देखील होते. फलंदाजीमध्ये फारशी संधी न मिळालेल्या अजयने यष्टिरक्षणात मात्र चमक दाखवत यष्टीमागे १६ झेल आणि ३ यष्टीचित अशी भरघोस कामगिरी केली. हा विश्वचषक भारताने जिंकला. या विश्वचषकात घेतलेले काही झेल आजही अजयला आठवतात. विश्वचषकात केलेल्या उत्तम कामगिरीमुळे लगेचच चॅलेंजर चषकासाठी अजय जडेजाच्या नेतृत्वाखाली भारत ब संघामध्ये अजयची निवड झाली. एक खेळाडू म्हणून आपली ओळख या स्पर्धांमुळे निर्माण झाल्याचे अजय मानतो.
पुढच्या वर्षी इंग्लंडचा १९ वर्षाखालील संघ भारत दौऱ्यावर आला. तीन सामन्यांच्या या मालिकेत अजयने अनुक्रमे १४३, ९६ आणि ४३ धावा तसेच यष्टीमागे ९ झेल आणि १ यष्टिचित अशी भरघोस कामगिरी केली. सतत चांगली कामगिरी केलेल्या अजयला बीसीसीआयने २००१ साली ज्युनियर क्रिकेटर ऑफ द इयर हा सन्मान देऊन गौरविले.
कनिष्ठ पातळीवर चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने २००० साली सुरु केलेल्या नॅशनल क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) पहिल्या तुकडीमध्ये अजयचा समावेश होता. एनसीएमध्ये रॉड मार्श, वासू परांजपे या दिग्गज लोकांचे मार्गदर्शन अजयला लाभले. आपल्या कारकिर्दीमध्ये एनसीएचे मोठे योगदान असल्याचे अजय मानतो. एक यष्टीरक्षक म्हणून स्वतःची क्षमता कळणे आणि त्यानुसार पुढे स्वतःमध्ये सुधारणा करणे ह्या सगळ्या गोष्टी एनसीएमुळे शक्य झाल्या असे त्याने सांगितले. फरिदाबादसारख्या छोट्या शहरातून आलेल्या त्याच्यासाठी एनसीएसारख्या अकादमीमधील अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा लाभणे ही फार मोठी गोष्ट होती असे अजय सांगतो.
भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी २००२ साली अजयची भारतीय संघात निवड झाली. हरियाणाकडून भारतीय संघात निवड झालेला तो केवळ दुसरा यष्टीरक्षक होता. त्याअगोदर विजय यादव हे भारताकडून यष्टीरक्षक म्हणून खेळले होते. आपल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अजय २ धावांवर धावबाद झाला आणि यष्टीमागे त्याने एक झेल घेतला. त्यानंतर लगेचच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतही तो खेळला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून चांगली कामगिरी केल्यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय कसोटी संघात अजयची निवड झाली. पहिल्या दोन कसोटी सामन्यात फारशी चांगली कामगिरी न केलेल्या अजयने तिसऱ्या कसोटीमध्ये नाबाद ११५ धावा केल्या आणि लक्ष्मणबरोबर मोठी भागीदारीही केली. या खेळीद्वारे आपण यष्टिरक्षणाबरोबरच पूरक अशी फलंदाजीही करू शकतो हे अजयने सिद्ध केले. या सामन्यात डील्लनच्या एका बाउन्सरवर कुंबळेचा जबडा फ्रॅक्चर झाला आणि त्यानंतर लगेचच तो बाद झाला. कुंबळेच्या जागी अजय फलंदाजीला गेला.आपला एक सहकारी जायबंदी होऊन गेल्यानंतर फलंदाजी करायची म्हणजे जिकिरीची गोष्ट होती. त्या परिस्थितीत धीराने फलंदाजी करत शतक केल्याचा आनंद काही औरच होता असे अजयने सांगितले. या सामन्यात त्याला सामनावीर पुरस्कार देखील मिळाला.
विंडीज दौऱ्यातील याच खेळीचे बक्षीस म्हणून जुलै २००२ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय कसोटी संघात त्याची निवड झाली. यादरम्यानच एकदिवसीय संघात राहुल द्रविड यष्टीरक्षक म्हणून जबाबदारी पार पाडू लागला होता. एक ज्यादा फलंदाज खेळवता यावा या गांगुलीच्या विचारसरणीमुळे अजयला एकदिवसीय मालिकेत संधी मिळाली नाही असे काही जणांना वाटते. या दौऱ्यातील कसोटी मालिकेच्या पहिल्या कसोटीदरम्यान दुखापत झाल्याने अजयला मायदेशी परत यावे लागले. अजयच्या जागी गुजरातच्या पार्थिव पटेलची भारतीय संघात निवड झाली. या दुखापतीमुळे त्याच्या कारकिर्दीवर परिणाम झाला असे वाटते का विचारले असता, इंग्लंडमध्ये झालेली दुखापत ऐन उमेदीच्या काळात झाल्याचे शल्य अजूनही असल्याचे त्याने सांगितले. मात्र भारताकडून आपण थोडे का होईना क्रिकेट खेळू शकलो याचे त्याला समाधान आहे. त्यानंतर अजय भारतासाठी एकच कसोटी सामना खेळला. एकदिवसीय संघातही त्याला स्थान मिळू शकले नाही. भारताकडून खेळलेल्या ६ कसोटी सामन्यांत त्याने १६३ धावा आणि १२ एकदिवसीय सामन्यांत ९० धावा केल्या. कसोटीमध्ये यष्टीमागे त्याने १३ तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १६ गडी बाद केले.
भारतीय संघाकडून संधी मिळत नसली तरी अजय देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळत राहिला. हरयाणा, गोवा आणि कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात त्रिपुराकडून खेळत २०१५ साली अजयने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. कारकिर्दीच्या शेवटी २०१० साली गोव्याकडून खेळताना राजस्थान विरुद्धच्या सामन्यात केलेलं द्विशतक अनेक वर्षे स्मरणात राहील असे अजयने सांगितले. या सामन्याअगोदर राजस्थानने हैदराबादच्या संघाला २१ धावांत बाद केले होते. त्यामुळे अशा संघाविरुद्ध द्विशतक करणे ही एक मोठी गोष्ट असल्याचे तो मानतो. आपल्या १६ वर्षांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीमध्ये अजयने ९९ सामन्यांत ४०२९ धावा केल्या. यष्टीरक्षक म्हणून त्याने २३३ झेल आणि २७ यष्टीचित अशी कामगिरी केली.
निवृत्तीनंतर अजयने २०१५ साली गोव्याच्या १९ वर्षाखालील संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले. त्यानंतर २०१७ साली त्याने पंजाबच्या रणजी संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले. युवराज सिंगने सुरु केलेल्या युवराज सिंग सेंटर ऑफ एक्सलंसमध्ये देखील सल्लागार म्हणून अजय काम करतो. प्रशिक्षणातून वेळ मिळेल तेव्हा तो एनडीटीव्हीसाठी क्रिकेट विश्लेषक म्हणून तर स्पोर्ट्सकिडा या वेबसाईटसाठी अतिथी लेखक म्हणून काम करतो. सध्या तो बीसीसीआयच्या नॅशनल क्रिकेट अकादमी अंतर्गत १६ वर्षाखालील संघाला आपला जुना सहकारी देवाशिष मोहंतीबरोबर धर्मशाला येथे मार्गदर्शन करतो आहे. आज आपण जे काही आहोत ते केवळ क्रिकेटमुळे आहोत. क्रिकेटचे आपण देणे लागतो म्हणून तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे काम मी करतो अशी अजयची भावना आहे.
नव्वदच्या दशकानंतर नयन मोंगियाची रिकामी झालेली जागा भरून काढण्यासाठी बीसीसीआयने अनेकांना यष्टीरक्षक म्हणून संधी दिली. एमएसके प्रसाद, समीर दिघे, दीप दासगुप्ता,विजय दहिया, साबा करीम, अजय रात्रा हे सगळे त्यापैकीच. त्यावेळी भारतीय संघात १६ महिन्यांत ५ यष्टीरक्षक खेळून गेले. या सगळ्यांमध्ये यष्टीरक्षक म्हणून अजय सगळ्यात चांगला होता असे अनेकांचे मत होते. अजय रात्राचं नाव घेतलं की दर्दी क्रिकेट रसिकांना त्याची वेस्ट इंडिजविरुद्धची नाबाद ११५ धावांची खेळी आठवते. आकडेवारीवरून खेळाडूचा मोठेपणा ठरविणाऱ्या भारत देशात अजयची आकडेवारी फारशी चांगली दिसत नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेटचा शिलेदार नसला तरी विस्मृतीत गेलेला एक चांगला खेळाडू म्हणून अजयची निश्चित आठवण होते.
अजयची क्रिकेट कारकीर्द
कसोटी
सामने ६ धावा १६३ बळी १३
एकदिवसीय
सामने १२ धावा ९० बळी १६
प्रथम श्रेणी
सामने ९९ धावा ४०२९ बळी २६०
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार या लेखमालेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल महास्पोर्टच्या वाचकांचे आभार. लेखमालेच्या या दहाव्या भागानंतर काही काळ विश्रांती घेतोय. पुढील लेख घेऊन लवकरच पुन्हा भेटू.
क्रिकेटवरील “भारतीय क्रिकेटचे शापीत शिलेदार” लेखमालिकेतील काही खास लेख-
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ९ – तिसरा गोलंदाज
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ८ – आठवावा लागणारा निखिल चोप्रा
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले!
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते!!
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर