-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund)
आज पृथ्वी शॉचं नाव माहित नसलेला भारतीय माणूस सापडणं मुश्किल आहे. त्याने कर्तबगारीच अशी दाखवली आहे की प्रत्येक क्रिकेटरसिकाला त्याची दखल घेणे भाग पडले. रणजी, दुलिप पाठोपाठ आता त्याने आपल्या पहिल्या कसोटी सामन्यातही शतक झळकावले. आपल्या पहिल्याच कसोटी मालिकेत त्याने मालिकावीराचा पुरस्कारही मिळवला. पृथ्वीच्या आजवरच्या यशस्वी प्रवासात अनेकांचा वाटा आहे. या अनेकांपैकी एक आहे भारताचा माजी क्रिकेटपटू. त्याने पृथ्वीची गुणवत्ता त्याच्या वयाच्या ११ व्या वर्षीच हेरली. स्वतःच्या कंपनीमार्फत त्याने पृथ्वीला करारबद्ध केले आणि तिथून सुरू झाला पृथ्वीचा यशस्वी प्रवास.
कधी काळी तो मुंबई क्रिकेटचा अविभाज्य घटक होता. कसोटीमध्ये आपल्या पहिल्याच चेंडूवर बळी नोंदवत त्याने स्वतःचे नाव विक्रमांच्या पुस्तकात लिहिले. ही एकच बाब आज त्याची ओळख म्हणून कायम आहे. तो खेळाडू आहे निलेश मोरेश्वर कुलकर्णी. आजही भारताकडून कसोटी खेळलेल्या खेळाडूंमध्ये कारकिर्दीतल्या पहिल्याच चेंडूवर बळी मिळवणारा तो एकमेव खेळाडू आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आजवर हा पराक्रम केवळ २० जणांना जमला आहे.
कारकिर्दीची सुरुवात स्वप्नवत झाली तरी हा सामना निलेशसाठी आणि भारतासाठी एक नकोशी आठवण ठरला. निलेशने या सामन्यात ७० षटके टाकून १९५ धावा देत फक्त १ बळी मिळवला.
या सामन्यात अनिल कुंबळेसारख्या गोलंदाजाला २२३ धावात १ बळी मिळाला होता म्हणजे विचार करा. गंमत म्हणजे गांगुलीने या दोघांपेक्षा चांगली गोलंदाजी करत ९ षटकांत ५३ धावा देत २ बळी मिळवले. या सामन्यात श्रीलंकेच्या फलंदाजांनी विश्वविक्रम करत ९५२ धावांचा डोंगर उभारला.
कसोटीमधील आपला पुढचा बळी मिळविण्यासाठी निलेशला जवळजवळ तीन वर्षे थांबावे लागले. भारत दौऱ्यावर आलेल्या (२००१) ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीमध्ये त्याने आपला दुसरा आणि शेवटचा बळी मिळवला. भारतासाठी खेळलेल्या ३ कसोटी सामन्यांत ३३२ धावा देत निलेशने २ बळी मिळवले.
कसोटीप्रमाणेच निलेशची एकदिवसीय कारकीर्ददेखील फारशी आठवणीत राहण्याजोगी नाही. भारताकडून खेळलेल्या १० एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ११ बळी मिळवले. यात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मिळवलेले तीन बळी अजूनही काहीजणांच्या लक्षात असतील. भारत हा सामना हरला मात्र निलेशची गोलंदाजी आजही लक्षात आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याने केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे भारतात परतल्यानंतर डोंबिवलीमध्ये त्याचा मोठा सत्कारही झाला असे काहीजण सांगतात.
आंतरराष्ट्रीय पातळीवर फारसा चमकू न शकलेला निलेश देशांतर्गत स्पर्धांमध्ये बरीच वर्षे मुंबईकडून खेळला. निलेश हा फिरकी गोलंदाज असला तरी आपण चेंडू फारसा वळवत नसे हे त्यानेच सांगितले. चेंडूला उसळी देऊन फलंदाजाला चकविण्याचे कसब त्याच्याकडे होते. त्याने त्याचा उत्तम उपयोग करून घेतला. रणजीच्या आपल्या पहिल्याच हंगामात निलेशने मुंबईकडून सर्वाधिक बळी मिळवत स्वतःला सिद्ध केले. मुंबईकडून १९९४ ते २००७ मध्ये १०१ प्रथम श्रेणी सामने खेळताना दर २४ धावांमागे एक बळीची सरासरी राखत त्याने ३५७ बळी मिळवले. कसोटीमध्ये एका बळीमागे १६६ धावांची सरासरी असणाऱ्या निलेशची देशांतर्गत स्पर्धांमधली सरासरी त्याहून अनेक पटींनी चांगली आहे. मार्क टेलरच्या नेतृत्वाखाली १९९८ साली भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाने मुंबईत एक सराव सामना खेळला होता. या सामन्यात निलेशने दोन्ही डावात पॉंटिंगला बाद करत दुसऱ्या डावात ५ बळी देखील घेतले. निलेशची ही कामगिरी आणि सचिनच्या नाबाद द्विशतकाच्या जोरावर मुंबईने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. पुढे भारताने ३ सामन्यांची ही कसोटी मालिका २-१ अशी जिंकली.
आजकाल दर दोन तीन हंगामानंतर संघ बदलणाऱ्या खेळाडूंच्या पिढीसाठी निलेश हा आदर्श ठरू शकतो. कारकिर्दीच्या शेवटपर्यंत अनेक संघानी त्यांच्यातर्फे खेळण्यासाठी विचारणा करूनही निलेशने मुंबईकडूनच खेळणे पसंत केले. मुंबई क्रिकेट वर्तुळात अनेक वर्षे आपले स्थान राखून असलेल्या कांगा लीगमध्येदेखील तो अगदी अलीकडेपर्यंत आपला जुना क्लब नॅशनल क्रिकेट क्लबकडून खेळत असे.
कालपरत्वे अनेक नवोदित गोलंदाज मुंबईच्या संघाचे दरवाजे ठोठावू लागले. संघातील आपले स्थान टिकवणे निलेशला अवघड जाऊ लागले. अखेरीस ती वेळ आली आणि २००६-०७ च्या रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात त्याला संघातून वगळण्यात आले. त्या हंगामात निलेशने मुंबईकडून सर्वाधिक बळी मिळवलेले असूनही त्याच्याऐवजी विल्किन मोटा या नवोदित गोलंदाजाला संघात जागा देण्यात आली.
याच दरम्यान झी ने सुरु केलेल्या इंडियन क्रिकेट लीगमध्ये (ICL) निलेश सहभागी झाला. यामुळेच कदाचित २००७-०८ च्या रणजी हंगामात मुंबईच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी निलेशऐवजी १७ वर्षीय इकबाल अब्दुल्ला या डावखुऱ्या फिरकीपटूला संघात स्थान दिले गेले. अब्दुल्लाकडून चांगली कामगिरी न झाल्याने अखेरीस मुंबईने पुन्हा अनुभवी निलेशला संघात पाचारण केले. या दरम्यान निवड समिती आणि निलेश यांच्यात काय वाद झाले हे फारसे पुढे आले नाही. पण निलेश नक्की काय करतो हे फक्त त्याला आणि देवालाच माहित असते असे वक्तव्य मुंबई क्रिकेट निवड समितीच्या एका सदस्याने त्यावेळी केले होते. मुंबई संघात पुनरागमन झाल्यानंतर ‘जे घडले तो भूतकाळ आहे’ असे म्हणत निलेशनेही त्यावर फारसे भाष्य केले नाही. डिसेंबर २००७ मध्ये सौराष्ट्राविरुध्द खेळलेला रणजी सामना त्याचा अखेरचा ठरला.
@vinodkambli349 @sachin_rt @imAagarkar @SGanguly99 @VVSLaxman281 #rahuldravid #atulranade #NileshKulkarni @amolmuzumdar11 #FriendshipDay2018
-A post from @sachin_rt pakistani fan page pic.twitter.com/cJnqBk1Aha
— Sachin's Legacy (Pakistani fan page) (@LegacyOfSachin) August 5, 2018
मुख्य प्रवाहातून बाहेर गेलेल्या निलेशने मग आपल्या आयुष्यातली दुसरी खेळी खेळायला सुरुवात केली. भावी पिढीला मार्गदर्शन म्हणून क्रीडा व्यवस्थापन क्षेत्रात काहीतरी करावे यासाठी निलेशने २०१० साली इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटची (IISM) स्थापना केली. ही घोषणा करत असतानाच त्याने आपण आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत असल्याचे जाहीर केले. आपण यशाच्या शिखरावर असताना निवृत्त व्हावे किंवा किमान खेळत असताना निवृत्त व्हावे अशी प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. निलेशची देखील होती. आपली निवृत्ती जाहीर करताना आपल्या मनातली ही खंत त्याने बोलून दाखवली. गेली सात आठ वर्षे IISM च्या माध्यमातून निलेश क्रीडा व्यवस्थापनाचे धडे देत आहे. मुंबईच्या क्रिकेटच्या निवड समितीचा सदस्य म्हणूनही तो २०१७ पासून काम करत आहे.
IISM Founder Director Nilesh Kulkarni addressing Jai Hind College students at Sports Day on the importance of Sports for self development pic.twitter.com/jp9Lxr6jke
— info_iism (@info_iism) January 18, 2017
दर वर्षी भारतातील चित्रपट अभिनेत्यांची सेलेब्रिटी क्रिकेट लीग पार पडते. या लीगमध्ये रितेश देशमुख मालक असलेल्या वीर मराठा संघाचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काही काळ निलेशने काम केले. जानेवारी २०१६ मध्ये आपल्या संस्थेच्या माध्यमातून तेंडुलकर, गावसकर, सानिया मिर्झा, गगन नारंग अशा खेळाडूंना एकत्र आणत निलेशने त्यांच्याकडून भारताचे राष्ट्रगीत गाऊन घेतले. युट्युबवर हा व्हिडिओ पहायला मिळतो.
Our Founder-Director @NileshMKulkarni being felicitated by @MumbaiCricAssoc on the occassion of 500th Ranji Match. #NileshKulkarni #Sports #Cricket #Mumbai #IISM pic.twitter.com/46JkukUyYD
— info_iism (@info_iism) November 12, 2017
कारकिर्दीच्या सुरुवातीलाच विक्रमांच्या पुस्तकामध्ये कायमचे स्थान मिळवणारा निलेश आंतरराष्ट्रीय पातळीवर फारशी चमक दाखवू शकला नाही. अनिल कुंबळेसारखा महान गोलंदाज आणि अगदी नवखा हरभजन सिंग यांच्याशी स्पर्धा करणाऱ्या निलेशमध्ये तो स्पार्क नव्हता की काय असे राहून राहून वाटत राहते. मर्वान अटापट्टूचा एक बळी सोडला तर भारतीय क्रिकेटरसिकांना निलेशबद्दल आजही फारसं काही आठवत नाही. इतकं की अगदी स्कुपव्हूपसारख्या वेबसाईटने निलेशच्या वाढदिवसानिमित्त लेख लिहिला तेव्हा त्याच्या ऐवजी त्यांनी पारस म्हाम्ब्रेचा फोटो वापरला.
निलेशची क्रिकेट कारकीर्द
कसोटी
सामने – ३ बळी – ३
एकदिवसीय
सामने – १० बळी – ११
प्रथम श्रेणी
सामने – १०१ बळी – ३५७
या लेखावरील आपल्या प्रतिक्रीया आपण @Maha_Sports या ट्विटर हॅडलवर तसेच 9860265261 या वाॅट्सअॅप क्रमांकावर नोंदवु शकता.
क्रिकेटवरील “भारतीय क्रिकेटचे शापीत शिलेदार” लेखमालिकेतील काही खास लेख-
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १० – विस्मृतीत गेलेला अजय रात्रा
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ९ – तिसरा गोलंदाज
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ८ – आठवावा लागणारा निखिल चोप्रा
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले!
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते!!
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर