राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने २००१ मध्ये ईडन गार्डनवर केलेला भीमपराक्रम आजही क्रिकेटरसिकांच्या मनात ताजा आहे. सामन्याचा संपूर्ण चौथा दिवस या दोघांनी खेळून काढत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची दमछाक केली. हे दोघे जेव्हा आपली भागीदारी रचत होते तेव्हा त्यांना पाणी, नवे ग्लोव्हज, हेल्मेट या सगळ्या गोष्टी एकच खेळाडू नेऊन देत होता. एकदा तर द्रविडने त्याला सांगितले,
“तूही आना.और किसीको भेजना मत.”
याच सामन्यात त्याने पहिल्या डावात मॅथ्यू हेडनचा ९७ वर तर दुसऱ्या डावात स्टीव्ह वॉचा झेल घेत राखीव भारताच्या विजयाला हातभार लावला. या दोन झेलांपेक्षा ज्या दोन वीरांनी भारताला हा सामना जिंकून दिला त्यांना पाणी देण्याच्या कृतीने का होईना, आपला भारताच्या विजयाला हातभार लागला अशी त्या खेळाडूची भावना होती. तो खेळाडू होता हेमांग बदानी.
अझर आणि अजय जडेजा या दोघांना २००० मध्ये झालेल्या मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे भारतीय संघातील आपले स्थान गमवावे लागले. याचाच फायदा हेमांगला झाला. मधल्या फळीतील उपयुक्त फलंदाज आणि एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याची भारतीय एकदिवसीय संघात निवड झाली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुण्यात केलेले शतक बऱ्याच जणांना आठवत असेल. या सामन्यात ३ बाद ६० वर खेळायला येऊन हेमांगने भारताला २४८ धावांची मजल मारून दिली. ऑस्ट्रेलियाकडून मार्क वॉने शतक करत त्यांना विजय मिळवून दिला. यावेळी हेमांगची फलंदाजीची सरासरी ५० च्या घरात होती. मात्र लवकरच हेमांगचा फॉर्म हरपला आणि अनियमित कामगिरीमुळे त्याची भारतीय संघातून हकालपट्टी झाली.
भारताकडून खेळलेल्या ४० एकदिवसीय सामन्यात हेमांगने ३३ धावांच्या सरासरीने ८६७ धावा काढल्या. तामिळनाडूचे खेळाडू भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी भरपूर मेहनत करतात मात्र भारतीय संघातील आपले स्थान टिकवण्यासाठी ते त्यानंतर तेवढीच मेहनत घेत नाहीत. त्यामुळे भारताकडून प्रदीर्घ काळ खेळलेले तामिळ खेळाडू मोजकेच आहेत असे एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितले होते.
एकदिवसीय संघात पदार्पण केल्यानंतर १ वर्षाने २००१ साली हेमांगने भारताच्या कसोटीसंघातही स्थान मिळवले. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याला डावाची सुरुवात करावी लागली. आपल्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत त्याअगोदर एकदाही त्याने डावाची सुरुवात केली नव्हती. साहजिकच दडपण येऊन तो फक्त २ धावा करून बाद झाला. या कसोटीनंतरही ३ सामन्यांत त्याला संधी मिळाली परंतु तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही. भारताकडून खेळलेल्या ४ कसोटी सामन्यांत हेमांगने ९४ धावा केल्या होत्या. त्यानंतर मात्र तो भारताकडून कसोटीमध्ये खेळू शकला नाही.
भारतीय संघात स्थान नसले तरी हेमांग तामिळनाडूकडून देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळत राहिला.तामिळनाडूकडून १३ वर्षे खेळल्यानंतर त्याने विदर्भाकडून काही वर्षे देशांतर्गत क्रिकेट खेळले. विदर्भाकडून २०१३ साली हेमांग आपला शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळला. प्रथम श्रेणी कारकिर्दीत खेळलेल्या १२१ सामन्यांमध्ये त्याने ४५ धावांच्या सरासरीने ६५७८ धावा काढल्या. यात १५ शतके आणि ४५ अर्धशतकांचा समावेश होता.
निवृत्तीनंतर लगेचच ऑक्टोबर २०१४ मध्ये त्याने दक्षिण विभागाच्या दुलीप करंडकाच्या संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले. सध्या तो तामिळनाडू प्रिमियर लीगमध्ये तो चेपॉक सुपरगीलीज संघाचा प्रशिक्षक म्हूणन काम करतो.त्याच्या मार्गदर्शनाखाली या संघाने टीएनपीएलचे २०१७ चे विजेतेपदही मिळवले. गेल्या वर्षी भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने अध्यक्षीय संघाविरुद्ध सराव सामना खेळला होता. त्या संघाचा प्रशिक्षक म्हणून हेमांगने काम केले होते. अलीकडेच स्टार स्पोर्ट्सने सुरु केलेल्या तामिळ वाहिनीवर आयपील तसेच भारताच्या सामान्यांचा समालोचक म्हणूनही हेमांग काम करत असतो. काही क्रिकेट वेबसाईट्ससाठी तो स्तंभलेखक म्हणूनही काम करतो.
या लेखावरील आपल्या प्रतिक्रीया आपण @Maha_Sports या ट्विटर हॅडलवर तसेच 9860265261 या वाॅट्सअॅप क्रमांकावर नोंदवु शकता. क्रिकेटवरील “भारतीय क्रिकेटचे शापीत शिलेदार” लेखमालिकेतील काही खास लेख-
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १२- शापितांचा शापित
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग ११- पृथ्वी शॉ नावाचा हिरा शोधणारा जवाहिरी..
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १० – विस्मृतीत गेलेला अजय रात्रा
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ९ – तिसरा गोलंदाज
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ८ – आठवावा लागणारा निखिल चोप्रा
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले!
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते!!
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर