आझाद मैदानावर शालेय स्पर्धेतील कुठलासा सामना सुरु आहे. आपला मुलगा फलंदाजी करतोय म्हणून एक गृहस्थ आवर्जून मैदानावर उपस्थित आहेत. अचानक काहीतरी होते आणि ते गृहस्थ गायब होतात. ते जातात ते एकदम दादरला.आपल्या एका मित्राला बरोबर घेऊन यायला. त्याला आपल्या मुलाची फलंदाजी दाखवायला. आझाद मैदान ते दादर आणि परत, तेही ऐंशीच्या दशकात म्हणजे दीड दोन तास तर नक्कीच. पण त्यांना खात्री आहे की आपण परत येईपर्यंत आपला मुलगा खेळत असणार. बापाचा विश्वास सार्थ करत तो मुलगाही खेळपट्टीवर टिकून राहिला. आपला मुलगा भारतासाठी खेळणार हे बापाचे वाक्य त्याने पुढे खरे केले. यातले ते गृहस्थ आणि तो मुलगा म्हणजे दुसरेतिसरे कुणी नाही तर भारताचे विख्यात फलंदाज विजय मांजरेकर आणि संजय मांजरेकर ही पितापुत्रद्वयी.
संजय क्रिकेटपटू का झाला याचाही एक मस्त किस्सा आहे. अकरावीत असताना त्याला एका मित्राने विचारले, “पुढे काय करणार?”
एका क्षणाचाही विलंब न लावता त्याने उत्तर दिले “क्रिकेटपटू होणार.”
मित्राने विचारले, “आणि नाही झालास तर?”
मित्राच्या ह्या प्रश्नाला संजयकडे उत्तर नव्हते. कारण आपण क्रिकेटपटू व्हायचे याशिवाय वेगळा असा काही विचार त्याने कधी केलाच नव्हता. त्याला कारणही तसेच होते. एक तर वडील नावाजलेले क्रिकेटपटू शिवाय तो दादरसारख्या क्रिकेटपंढरीत लहानाचा मोठा झाला. त्यामुळे त्याला क्रिकेट सोडून इतर काही माहीतच नव्हते. आपल्या वडिलांना एक क्रिकेटपटू म्हणून मिळालेली प्रसिद्धी, लोकांकडून त्यांना मिळालेलं प्रेम त्याने पाहिलं. गावसकर, गुंडाप्पा विश्वनाथ, रोहन कन्हायसारखे खेळाडू त्याच्या घरी येत तेव्हा लोक त्यांना पहायला घराबाहेर गर्दी करत. हे सगळं आपल्या आजूबाजूला घडत असताना कोणत्या मुलाला आपणही क्रिकेटपटू व्हावे असे वाटणार नाही? तेच त्याच्या बाबतीत झालं.
मुंबईच्या आयइएस इंग्लिश मिडीयम स्कुलमधून संजयने आपल्या स्पर्धात्मक क्रिकेट कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. संजय खरं तर शाळेच्या संघात नव्हता. विजय मांजरेकरांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहून त्याला शाळेच्या क्रिकेट संघात घ्यावे अशी विनंती केली. विजय मांजरेकरांचे पत्र म्हटल्यावर शाळेला त्याची दखल घेणे भाग पडले. त्याप्रमाणे संजयला शाळेच्या क्रिकेटच्या संघाबरोबर सराव करण्यासाठी बोलावण्यात आले. काही दिवसांनी त्याला एका सराव सामन्यात खेळण्याची संधीही मिळाली. संजयला मात्र या संधीचा फायदा उठवता आला नाही. आपण चांगले खेळू शकलो नाही याची लाज वाटून संजयने सरावाला जाणे बंद केले. त्याच्या नसण्याने शाळेच्या संघालाही फारसा फरक पडला नाही. पुढच्या वर्षी मात्र वडिलांचा वशिला न वापरता संजयने निवड चाचणीत भाग घेऊन शाळेच्या संघात स्थान मिळवले. पुढे त्याच्या कर्णधारपदाखाली शाळेच्या संघाने त्यावेळची प्रतिष्ठेची स्पर्धा जाईल्स शिल्ड जिंकली. त्यावेळी संजयचं वय होत ११ वर्षे.
शाळेनंतर महाविद्यालयीन पातळीवर खेळताना संजयने बडोद्यात पार पडलेल्या रोहिंटन बॅरिया आंतर विद्यापीठ चषकात मुंबई विद्यापीठाच्या संघाचे कर्णधारपद भूषवले. संजयबरोबर या संघात आजचा नावाजलेला पत्रकार आणि माजी क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचा मुलगा राजदीपदेखील होता. या स्पर्धेत संजयने सलग सहा शतके काढली. त्याने काढलेल्या धावा पाहून राजदीपला हे आपलं काम नाही असा साक्षात्कार झाला आणि त्याने क्रिकेट खेळणे सोडले.
या स्पर्धेतली संजयची कामगिरी पाहून १९८४-८५ च्या हंगामात त्याचा मुंबईच्या रणजी संघात समावेश करण्यात आला. हरयाणाविरुद्धच्या आपल्या पहिल्याच सामन्यात संजयने ५७ धावा काढल्या. गावसकरच्या नेतृत्वाखाली मुंबईने यावर्षीचा रणजी करंडक जिंकला. पुढच्या वर्षीच्या रणजी हंगामात संजयने ५ सामन्यांत १९१ धावा काढल्या. रणजीच्या तिसऱ्या हंगामात (१९८६-८७) संजयला सूर गवसला. मुंबईकडून खेळलेल्या ५ सामन्यांत त्याने ६३ च्या सरासरीने २५४ धावा काढल्या. यात प्रत्येकी एक शतक आणि अर्धशतकाचा समावेश होता. वैयक्तिकदृष्ट्या १९८७ चे वर्ष संजयसाठी चांगलेच लाभदायक ठरले. सप्टेंबर १९८७ मध्ये झालेल्या देवधर चषकाच्या उपांत्य सामन्यात नाबाद ९५ धावांची खेळी करत संजयने पश्चिम विभागाला अंतिम फेरीत पोहोचविण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यानतंर लगेचच ऑक्टोबरमध्ये पार पडलेल्या दुलीप करंडकात संजयने पश्चिम विभागाकडून खेळत दोन सामन्यांत ३२६ धावा काढल्या. यात उपांत्य सामन्यात मध्य विभागाविरुद्ध केलेल्या द्विशतकाचा समावेश होता. त्यानंतर लगेचच झालेल्या इराणी करंडकात शेष भारताकडून खेळताना संजयने अर्धशतक काढले. या भरीव कामगिरीचा परिणाम म्हणून त्या वर्षी भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी संजयचा भारताच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला.
आपल्या पहिल्या कसोटीतली संजयची कामगिरी फारशी प्रभावशाली नव्हती. पहिल्या डावात ५ धावांवर बाद झालेल्या संजयला दुसऱ्या डावात चेंडू लागल्याने १० धावांवर निवृत्त व्हावे लागले. वेस्ट इंडिजच्या याच दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतही संजय भारताकडून खेळला. तिथेही तो आपली छाप पाडू शकला नाही. यानंतरही संजय देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळत राहिला. त्या वर्षीच्या (१९८८) रणजी हंगामात त्याने ४ सामन्यांत एक शतक आणि २ अर्धशतके काढत ३४४ धावा केल्या.
आपला दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी संजयला एक वर्षाहून अधिक काळ वाट पहावी लागली. एप्रिल १९८९ मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात संजयला स्थान मिळाले. या दौऱ्यावरच्या दुसऱ्या कसोटीत संजयने ऐन भरातल्या माल्कम मार्शल, कर्टली अँब्रोस, इयन बिशप, कोर्टनी वॉल्श यांच्या तिखट माऱ्याला तोंड देत शतक काढले. ही मालिका भारताने ३-० अशी गमावली तरी संजयच्या फलंदाजीचे मात्र कौतुक झाले. अगदी सर विव्ह रिचर्ड्सनासुद्धा संजयने आपल्या फलंदाजीची नोंद घेणे भाग पाडले. किती? तर शेवटच्या कसोटीनंतर ते संजयची वाट पाहत पार्किंग लॉटमध्ये थांबून राहिले. तो आल्यावर त्यांनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत, “वेल प्लेड मॅन.” म्हणत दाद दिली. संजयच्या या दौऱ्यातल्या फलंदाजीने डेसमंड हेन्स यांनाही भुरळ पाडली.
संजयची पुढची कसोटी त्याच वर्षीच्या पाकिस्तान दौऱ्यात लागली. ही मालिका खरं तर सचिनच्या पदार्पणासाठी जास्त प्रसिद्ध आहे. त्यामुळे भारतीय संघातल्या इतरांची त्या दौऱ्यातली कामगिरी अनेकदा नजरेआड होते. त्या दौऱ्यात पाकिस्तानकडून इम्रान खान, अब्दुल कादिरसारखे नावाजलेले गोलंदाज खेळत होते. वासिम अक्रम आणि वकार युनूस ही जोडी त्यामानाने तरुण होती. या मालिकेतल्या पहिल्याच कसोटीत पाकिस्तानने भारतापुढे ४५३ धावांचे लक्ष्य ठेवले. संजयने सिद्धूच्या साथीने किल्ला लढवत नाबाद ११३ धावा काढत ही कसोटी अनिर्णित ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली. चार सामन्यांच्या या मालिकेत संजयने ९५ च्या सरासरीने ५६९ धावा कुटल्या.
आपल्या फलंदाजीने अनेकांची मने जिंकलेल्या, भारताचा दुसरा सुनिल गावसकर असे म्हटले गेलेल्या संजयच्या धावांच्या वेगाला पाकिस्तान दौऱ्यानंतर मात्र ओहोटी लागली. पुढील एक दोन वर्षांत भारताने केलेल्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात संजय सपशेल अपयशी ठरला. नाही म्हणायला इंग्लंड दौऱ्यात त्याने दोन अर्धशतके काढली. झिम्बाब्वेविरुद्धचे १९९२ मध्ये केलेले एक शतक सोडले तर त्यानंतर त्याला फारशा धावा करता आल्या नाहीत. भारताने केलेल्या पहिल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही संजय अपयशी ठरला. या दौऱ्यानंतर संजयला संघातून वगळण्यात आले. दरम्यान त्याने भारताकडून १९९२ आणि १९९६ चे विश्वकरंडकदेखील खेळले. एकदिवसीय क्रिकेटमध्येदेखील संजयला त्याच्या क्षमतेला साजेशी अशी छाप पाडता आली नाही. अखेरीस १९९६ मध्ये पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर संजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
भारताकडून खेळलेल्या ३७ कसोटी सामन्यांत संजयने ४ शतकांसह २०४३ धावा केल्या. तर ७४ एकदिवसीय सामन्यांत १९९४ धावा केल्या. भारतीय संघातून आत बाहेर सुरु असताना संजय मुंबईकडून देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळत राहिला. त्याच्या कर्णधारपदाखाली मुंबईने १९९७ सालचा रणजी करंडक जिंकला. संजयची प्रथम श्रेणी कारकीर्द त्यामानाने उल्लेखनीय राहिली. मुंबईकडून खेळलेल्या १४७ प्रथम श्रेणी सामन्यांत त्याने ५५ च्या सरासरीने १०२५२ धावा काढल्या. यात ३१ शतके आणि ४६ अर्धशतकांचा समावेश आहे.
निवृत्तीनंतर संजयने समालोचक म्हणून क्रिकेटमधील आपली दुसरी इनिंग सुरु केली.भारताच्या अनेक सामन्यांमध्ये तो अगदी स्टुडिओमधील विश्लेषक, पिच रिपोर्टर ते अगदी सामना संपल्यानंतर प्रेझेंटेशनही करताना दिसतो. अनेक क्रिकेटरसिकांना संजयचे समालोचन आवडत नाही. मात्र त्याच्यासारखे खेळाचे विश्लेषण करणे फार जणांना जमत नाही हेही तितकेच खरे. ‘क्रिकेटिंग ब्रेन’ जे काही म्हणतात ते संजयकडे नक्की आहे.
एखाद्या खेळाडूची गुणवत्ता जोखण्याची संजयची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. रणजी करंडकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नावावर असलेल्या वसीम जाफरचे रणजी पदार्पण संजयच्या नेतृत्वाखाली झाले. मुंबईचे निवड समिती सदस्य त्याला १९ वर्षाखालील संघातूनच खेळवावे की रणजी संघात संधी द्यावी याचा विचार करत असताना संजयने जाफरची बाजू घेत त्याला संधी दिली. पुढे काय झाले हे सर्वश्रुत आहे. टायटन कपच्या वेळी भारतीय संघ सराव करत असताना एक तरुण गोलंदाज अझरला भारी पडत होता. संजयने त्याला बरोबर हेरले आणि मुंबईच्या नेट्समध्ये गोलंदाजी करायला बोलवले. तो गोलंदाज होता झहीर खान.
लहानपणी अगदी गल्ली क्रिकेट खेळतानाही संजयला बाद होणे कधीच आवडले नाही. काहीही झालं तरी आपण बाद व्हायचे नाही अशाच निश्चयाने तो खेळत असे. त्याच्या ह्या अशा कंटाळवाण्या खेळापायी एकदा त्याचा एक मित्र सामना मध्येच सोडून रागाने निघून गेला. गोलंदाजाच्या प्रत्येक चेंडूसाठी आपल्याकडे उत्तर असले पाहिजे अशा भावनेनं संजय खेळे. एखाद्या सामन्यात शतकही काढले तरी तो नंतर आपल्या खेळीची व्हिडीओ क्लिप पाहून आपण कुठे चुकलो याबद्दल दुःख करत बसे. परिपूर्णतेचा ध्यास घेणे म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय. त्याच्या ह्या परिपूर्णतेच्या ध्यासापायी त्याची कारकीर्द धोक्यात आली किंवा आकार घेऊ शकली नाही असे अनेकजण म्हणतात. ते काही प्रमाणात खरेही आहे. संजयसुद्धा आज बोलताना ते मान्य करतो. गुणवत्ता ठासून भरलेला हा एक चांगला फलंदाज आपल्यातल्या गुणवत्तेला न्याय देऊ शकला नाही म्हणून संजयचा खेळ पाहिलेले अनेक क्रिकेटरसिक आजही हळहळतात.
संजयची कारकीर्द
कसोटी
सामने ३७ धावा २०४३
एकदिवसीय
सामने ७४ धावा १९९४
प्रथम श्रेणी
सामने १४७ धावा १०२५२
या लेखावरील आपल्या प्रतिक्रीया आपण @Maha_Sports या ट्विटर हॅडलवर तसेच 9860265261 या वाॅट्सअॅप क्रमांकावर नोंदवु शकता. क्रिकेटवरील “भारतीय क्रिकेटचे शापीत शिलेदार” लेखमालिकेतील काही खास लेख-–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १२- शापितांचा शापित