-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund)
विनोद कांबळीने त्याचे नाव रावण ठेवले, मोहंमद कैफ त्याला ‘ब्लॅक गॅटींग’ म्हणून हाक मारी. मुंबईने तामिळनाडूला पराभूत करत २००३ चा रणजी करंडक जिंकला. ह्या विजयात मुंबईसाठी त्याने विशेष कामगिरी केली. त्या हंगामात त्याने गोलंदाज म्हणून २० बळी तर मिळवलेच पण फलंदाजीत तब्बल ५१४ धावा केल्या. ही कामगिरी ‘खास’ यासाठी की त्याने ह्या सगळ्या धावा सातव्या क्रमांकावर किंवा त्यापेक्षा खाली फलंदाजीला येत केल्या. त्या हंगामात मुंबईकडून फक्त वसीम जाफरने त्याच्यापेक्षा जास्त (६६६) धावा केल्या होत्या. एक गोलंदाज असूनही अशी कामगिरी केल्यामुळे तो खेळाडू विशेष लक्षात राहिला. आपल्या गोलंदाजीने त्याने देशांतर्गत स्पर्धांमध्ये अनेक फलंदाजांना त्रास दिला. ह्यात अगदी राहुल द्रविडचाही समावेश आहे. एकदा तर राहुलने त्याला विचारलेसुद्धा,
“बाबा रे, मी काय केलं तर मला तुझे चेंडू खेळता येतील?”
आपल्याला मिळालेली ही सर्वात मोठी दाद आहे असे तो मानतो. तो खेळाडू म्हणजे सध्या चर्चेच्या धुराळ्यात असणारा रमेश पोवार.
परिचारक म्हणून काम करणारे वडील आणि शिवणकाम करणारी आई असे पालक असल्याने रमेशच्या घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे रमेशला क्रिकेटची बॅट किंवा बॉल घेणे परवडले नाही. लहानपणी अगदी कापडी बॉल आणि नारळाच्या फांदीची बॅट करून तो क्रिकेट खेळत असे. कापडी चेंडूवर खेळताना तो जोरात मारावा लागे. त्यामुळेच आपल्याला पुढे फायदा झाला असे रमेश मानतो. वयाच्या दहाव्या वर्षी रमेशची आई हे जग सोडून गेली. आईनंतर आपली बहीण गीता हिनेच आपल्याला सांभाळून घेतले असे रमेश आवर्जून सांगतो.
रमेशची गोलंदाजीमधील गुणवत्ता त्याचा भाऊ किरणने जोखली. तो त्याला घेऊन आचरेकरांकडे गेला. रमेशची गोलंदाजी पाहून आचरेकर सरांनी त्याला अजून दोन वर्षे थांबण्याचा सल्ला दिला. त्या दरम्यान रमेशला प्रशिक्षण मिळावे तसेच स्पर्धात्मक क्रिकेटचा सराव मिळावा म्हणून त्यांनी त्याला आपल्या एका मित्राकडे पाठवले. दोन वर्षांनी आचरेकरांनी स्वतः रमेशचे वडील आणि भावाला बोलावून घेतले आणि रमेशला शारदाश्रममध्ये घेण्याची वेळ आली आहे असे सांगितले. अनेकदा आचरेकर सर त्याला घरून घेऊन मैदानावर जात आणि फलंदाजीचा सराव देत.
रमेश सुरुवातीला एक फलंदाज म्हणूनच खेळत असे. कनिष्ठ पातळीवर क्रिकेट खेळताना रमेश खरं तर एक बदली गोलंदाज म्हणून गोलंदाजी करत असे. वेंगसरकर अकादमीकडून एका सामन्यात बदली गोलंदाज म्हणून गोलंदाजी करताना रमेशने एक दोन बळी घेतले. त्या दिवशीची त्याची गोलंदाजी पाहून स्वतः वेंगसरकर आणि वासू परांजपे यांनी रमेशला गोलंदाजीबद्दल गांभीर्याने विचार करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवसापासून रमेशने फलंदाजीबरोबरच गोलंदाजीवरसुद्धा लक्ष देण्यास सुरुवात केली. वासू परांजपे सरांनी सांगितले नसते तर आपण कधीही फिरकी गोलंदाज झालो नसतो असे रमेश मानतो. त्याबद्दल तो त्यांचा आजही ऋणी आहे.
रमेशचा मुंबईच्या रणजी संघात प्रवेशही नाट्यमयरित्या झाला. त्यावेळी रणजी संघात निवडीकरता पोलीस शिल्ड नावाची स्पर्धा होत असे. रमेश एमसीए कोल्ट्स संघाकडून खेळणार होता. मात्र ऐन वेळी त्याला संघातून बाहेर बसवले गेले. अचानक झालेल्या ह्या निर्णयाने रमेश संतापला. आपण चांगली कामगिरी करत असूनही संघात संधी न मिळाल्याचा तो राग होता. कोल्ट्स रमेशला संधी देत नाहीये हे समजलेल्या मुंबई पोलीस संघाने रमेशशी संपर्क साधला आणि आपल्या संघाकडून खेळण्याचे निमंत्रण दिले. मिळालेली संधी दोन्ही हातांनी स्वीकारत रमेश मुंबई पोलीस संघाकडून खेळला. रागात घेतलेला निर्णय अंगलट आला तर रमेशची कारकीर्द धोक्यात येऊ शकते याची कल्पना त्याच्या भावाला होती. त्याने रमेशला बोलावून घेतले.
“तू रागात निर्णय तर घेतला आहेस. आता तो निर्णय योग्य ठरवण्याची जबाबदारी तुझीच आहे हे विसरू नकोस.” असे सांगत त्याने रमेशला जबाबदारीची जाणीव करून दिली.
रमेशने देखील आपण घेतलेला निर्णय योग्य ठरवला. पुढच्या सामन्यात ज्या कोल्ट्स संघाने त्याला संघाबाहेर बसवले त्यांच्याविरुद्धच त्याने पाच बळी मिळवले. त्या स्पर्धेत १६ बळी, १३१ धावा, एक सामनावीर आणि मालिकावीर असे पुरस्कार मिळवत त्याने थाटात मुंबई रणजी संघात प्रवेश मिळवला.
रमेशने मुंबईकडून १९९९-२००० च्या हंगामात पदार्पण केले. त्यावेळी मुंबईची बहुतुले आणि कुलकर्णी ही फिरकी जोडगोळी जोरात असे. त्या दोघांच्या छायेत रहात रमेशने आपल्या गोलंदाजीने लक्ष वेधून घेतले. पहिल्याच हंगामात त्याने तीन सामन्यांत १३ बळी मिळवले. त्यानंतर सतत मुंबईकडून चांगली कामगिरी करत तो मुंबईच्या संघात टिकून राहिला. यात अनेकदा त्याने मुंबईची फलंदाजीत झालेली पडझडदेखील रोखली आहे. अमेरिकेत संकटकाळी जसे ९११ नंबरला फोन लावतात तसेच काहीसे नाते मुंबईचा संघ आणि रमेशचे होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
मुंबई आणि शेष भारत दरम्यान सप्टेंबर २००३ मध्ये झालेल्या इराणी करंडकाच्या सामन्यात रमेशने चार बळी मिळवले. या चार बळींमध्ये राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि युवराज सिंग यांचा समावेश होता. याच सामन्यात त्याने चौथ्या डावात अर्धशतकदेखील केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्याने रमेशला २००४ साली पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात स्थान मिळाले. या दौऱ्यात फारशी चांगली कामगिरी करता आली नसली तरी रावळपिंडीच्या सामन्यात खेळताना त्याने आफ्रिदी आणि अख्तरच्या गोलंदाजीवर केलेला हल्ला अनेकांना लक्षात आहे. या सामन्यात त्याने बालाजीच्या साथीने भारताला विजयाच्या समीप आणून ठेवले होते. भारताने हा सामना १२ धावांनी गमावला. या मालिकेनंतर भारतीय संघातून बाहेर पडलेल्या रमेशने २००४-०५ च्या रणजी हंगामात मुंबईकडून सर्वाधिक ३२ बळी मिळवले. पुढच्या वर्षीच्या हंगामात ५४ बळी आणि २००५-०६ च्या हंगामात ६३ बळी मिळवत रमेशने पुन्हा एकदा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावले. चांगल्या कामगिरीच्या आधारे त्याची भारतीय संघात निवडही झाली. पुढच्या एक दीड वर्षात रमेशने भारताकडून ३१ एकदिवसीय सामने खेळत ३४ बळी मिळवले. यात कराचीला इंझमामला आपल्या गोलंदाजीवर दिलेला त्रास, फ्लिंटॉफ आणि पिटरसन बरोबरची त्याची जुगलबंदी लक्षात राहिली. चॅपेल प्रशिक्षक असताना रमेश भारतीय संघाचा नियमित सदस्य होता. विंडीजमध्ये झालेल्या २००७ च्या विश्वचषकाच्या अगोदरपर्यंत रमेशने दर सहा षटकांमागे एक बळी मिळवला होता. त्याच कालावधीत हरभजन सिंगने दर आठ षटकांमागे एक बळी मिळवला होता.असे असूनही या विश्वचषकात त्याची निवड झाली नाही. या विश्वचषकात भारताचे पानिपत झाल्यावर रमेशला पुन्हा एकदा भारतीय संघात संधी मिळाली. भारतीय संघाच्या २००७ सालच्या इंग्लंड दौऱ्यात रमेशने सहा सामन्यांत सहा बळी मिळवले. या दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही त्याला संधी मिळाली. मात्र चांगली कामगिरी करता न आल्याने त्याला भारतीय संघातून डच्चू मिळाला. त्यानंतर मात्र रमेशला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. याच दरम्यान भारताकडून त्याने दोन कसोटी सामने देखील खेळले.
दरम्यान मुंबईकडून देशांतर्गत स्पर्धांमध्ये तो खेळत राहिला. मुंबईने २००९ आणि २०१० मध्ये मिळवलेल्या रणजी विजेत्या संघाचा रमेश सदस्य होता. या हंगामांतही अनेकदा त्याने मुंबईला संकटातून बाहेर काढले. दोन वर्षांनी २०१२ च्या हंगामात मुंबईने पुन्हा एकदा रणजी विजेतेपद मिळवले. या हंगामात रमेशची कामगिरी फारशी चांगली नव्हती. पाच सामन्यात त्याने सहा बळी मिळवले. चौदा वर्षे मुंबईकडून क्रिकेट खेळल्यानंतर २०१३ साली रमेश राजस्थानकडून खेळला. त्याला कारणही तसेच होते. कामगिरी चांगली होत नसेल तर तुमच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उभे केले जाते. रमेशच्या बाबतीत हेच झाले. मुंबईच्या एका निवड समिती सदस्याने रमेशच्या फिटनेस वर प्रश्नचिन्ह उभे करत त्याला फिटनेस कॅंपला बोलावले. रमेश स्वतःचा वेगळा असा फिटनेस प्रोग्रॅम वापरत होता. त्याची कल्पना मुंबईचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना होती. असे असूनही त्या निवड समिती सदस्याने आपल्याला फिटनेस कँपला बोलावले ही गोष्ट रमेशला पटली नाही. लहानपणापासून गरम डोक्याचा असलेल्या रमेशने मग राजस्थानचा रस्ता धरला. राजस्थानकडून खेळण्याआधी रमेशने स्वतःमध्ये एक मोठा बदल केला. आपले वजन त्याने ९८ किलोवरून ८२ किलोवर आणले. त्यासाठी आपला अतिशय प्रिय असा वडापाव देखील त्याने सोडला. ह्या सगळ्याचा कामगिरी सुधारण्यात मात्र त्याला फारसा फायदा झाला नाही. राजस्थानकडून खेळताना तो केवळ १० बळी मिळवू शकला. पुढच्या वर्षी राजस्थान क्रिकेट संघटनेवर बंदी आल्याने पुढच्या वर्षीचा हंगाम तो गुजरातकडून खेळला. नोव्हेंबर २०१५ मध्ये रमेशने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
देशांतर्गत क्रिकेटबरोबरच रमेश आयपीएलमध्ये देखील खेळला. आयपीएलच्या पहिल्या तीन हंगामात तो पंजाबच्या संघाकडून खेळला. त्यावेळी आपल्या पहिल्याच षटकात त्याने बळी मिळवला होता. तीन हंगाम पंजाबकडून खेळल्यानंतर आयपीएलचा चौथा हंगाम त्याने कोची टस्कर्स संघाकडून खेळला. पुढच्या हंगामात तो पुन्हा आपला पहिला संघ पंजबाकडे परतला.
निवृत्तीनंतर रमेशने प्रशिक्षक म्हणून आपली दुसरी इनिंग सुरु केली. मुंबई क्रिकेट असोसिएशन साठी त्याने फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले. मात्र इथेही त्याच्या बेधडक स्वभावाने त्याचा घात केला. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कारभारावर टीका करत त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पुढे मुंबई संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज करूनही त्याचा त्या पदासाठी विचार झाला नाही. त्यानंतर रमेशने भारतीय महिला संघाचा प्रशिक्षक म्हणून काम केले. नुकत्याच झालेल्या महिला विश्वचषकात भारतीय संघाचा उपांत्य सामन्यात पराभव झाला. या पराभवानंतर ज्येष्ठ खेळाडू मिताली राज हिने रमेशवर केलेल्या आरोपांमुळे रमेशला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. आपल्याकडे अनेकदा प्रशिक्षकपदावर असलेल्या व्यक्तीची योग्यता ही त्याने त्याच्या काळात किती क्रिकेट खेळले यावरून जोखली जाते. त्यामुळेच रमेशला ट्विटरवर अनेक ट्रोल्सचा धनी व्हावे लागले. वास्तविक पाहता एखाद्या व्यक्तीची क्रिकेट कारकीर्द आणि प्रशिक्षणाची कारकीर्द याचा खरेतर फारसा संबंध नाही. तरीही रमेशला अशा प्रकारच्या टीकेला सामोरे जावे लागले. गेला महिनाभर चाललेल्या या प्रकरणाने रमेशची प्रशिक्षकपदाची पुढची इनिंग धोक्यात आली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
मैदानावरील कामगिरीबरोबरच रमेश त्याच्या कानातले डूल आणि लाल रंगाच्या गॉगलमुळेही अनेकांच्या लक्षात आहे. आपली कारकीर्द घडवण्यात आपल्या भावाचा मोठा वाटा आहे असे रमेश मानतो. एक धाडसी फिरकी गोलंदाज म्हणून रमेशचा उल्लेख करता येऊ शकेल. दुसरा, टॉप स्पिनर अशी अस्त्रे भात्यात नसूनही चेंडूला दिलेली उंची आणि चेंडूचा कमी वेग याच्या बळावर रमेशने आपले स्थान निर्माण केले मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर तो आपला ठसा उमटवू शकला नाही.
रमेशची कारकीर्द
एकदिवसीय – सामने ३१ बळी ३४
कसोटी – सामने २ बळी ६
प्रथम श्रेणी – सामने १४८ बळी ४७० धावा ४२४५