– आदित्य गुंड ([email protected])
हो खरंय. अनेकांना निखिल चोप्रा हे नाव ऐकून डोकं खाजवावं लागेल. हा भारताकडून क्रिकेट खेळला का? असा प्रश्नही अनेकांना पडेल. त्या प्रश्नाचं उत्तर ‘होय’ असे आहे. निखिल चोप्रा नामक खेळाडूने भारताकडून १ कसोटी आणि ३९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. उत्तरप्रदेशमधील अलाहाबादमध्ये जन्मलेला निखिल खरं तर चांगलं टेनिस खेळायचा. त्याने टेनिसमध्ये उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्वदेखील केले. मात्र कुटूंब दिल्लीला आल्यावर त्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. आपल्या आई वडिलांच्या इच्छेखातर धोपटमार्ग स्वीकारून आपले शिक्षण पूर्ण करणारी बरीच मुले आपल्याला दिसतात. निखिलच्या बाबतीत नेमके उलटे घडले. अभ्यासात हुशार असलेल्या निखिलने व्हॉलीबॉलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या आपल्या वडिलांच्या इच्छेखातर क्रिकेटमध्ये कारकीर्द करण्याचे ठरवून आपल्या एकातरी पाल्याने खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करावे ही आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण केली.
ऐंशीच्या दशकात कपिल देवची बुस्टची जाहिरात येत असे. या जाहिरातीमध्ये त्याच्याबरोबर एक लहान मुलगाही असे. अनेकजणांना हा मुलगा म्हणजे निखिल चोप्रा आहे असे वाटते. निखिलबरोबर बोलताना त्याला याबद्दल विचारले असता तो मुलगा आपण नसल्याचे त्याने सांगितले. या जाहिरातीच्या काही काळ आधी बुस्टचीच अजून एक जाहिरात होती. त्यात असलेला लहान मुलगा आपण आहोत असे सांगून निखिलने इतक्या वर्षानंतर या प्रश्नावर पडदा पाडला.
दिल्लीकडून निखिल १५, १७ आणि १९ वर्षाखालील क्रिकेट खेळला. दिल्लीच्या १९ वर्षाखालील संघाकडून १९९२-९३ च्या हंगामात निखिलने ३६-३७ बळी आणि ४०० च्या आसपास धावा अशी भरीव कामगिरी केली होती. यानंतर निखिल दंतवैद्यकीय शिक्षणासाठी भारताबाहेर जाणार होता. मात्र त्याचवेळी त्याची दिल्लीच्या रणजी संघामध्ये निवड झाली. त्या हंगामातल्या एकमेव सामन्यात त्याने २९ धावा आणि १ बळी अशी कामगिरी केली. त्यानंतर ३-४ वर्षे निखिल दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत राहिला.
रणजी करंडकाच्या इतिहासात प्रथमच १९९६-९७ चा अंतिम सामना ग्वाल्हेरला दिवसरात्र खेळवला गेला. निखिलबरोबर झालेल्या गप्पांमध्ये मुंबई आणि दिल्लीमध्ये झालेल्या या सामन्याचा विषय निघाला तेव्हा तो भरभरून बोलला. तोपर्यंत फक्त आपल्या राज्याकडून पांढऱ्या कपड्यात क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी एकदिवसीय सामन्याप्रमाणे रंगीत कपडे घालून खेळण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. या सामन्यात नेहमीच्या लाल चेंडूऐवजी पांढरा चेंडू वापरला गेला होता. गोलंदाजी करणारा संघ ४० षटकानंतर नवा चेंडू घेऊ शकायचा आणि ५० षटकांनंतर नवा चेंडू घेणे बंधनकारक होते. या नियमांमुळे फिरकी गोलंदाजांना गोलंदाजीसाठी जुना चेंडू मिळणे अवघड होते आणि परिणामी चेंडू वळवणेदेखील अवघड होते. दिल्लीला या सामन्यात मुंबईकडून हार पत्करावी लागली तरी वसिम जाफर आणि विनोद कांबळी यांचे बळी मिळवल्याचे आठवते असे निखिल सांगतो. या संपूर्ण हंगामात निखिलने ३५७ धावा (३ अर्धशतके) आणि २१ बळी अशी भरीव कामगिरी केली. या कामगिरीमुळेच त्याची भारतीय संघात निवड झाली.
केनियाविरुद्ध १९९८ मध्ये निखिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हा सामना मात्र निखिलसाठी नकोशी आठवण ठरला. त्याने टाकलेल्या १० षटकांत ६५ धावा फटकावल्या गेल्या आणि भारत हा सामना हारला. यानंतर काही महिन्यांनी शारजामध्ये झालेल्या कोका कोला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये निखिलने चांगली कामगिरी केली. या चषकातील पाच सामन्यांमध्ये आपण एकदाही ३५ हुन जास्त धावा दिल्या नाहीत हे निखिलने आवर्जून मला सांगितले.
इंग्लंडमध्ये १९९९ साली झालेल्या विश्वकरंडकासाठीच्या भारतीय संघामध्ये निखिलची निवड झाली. मात्र या स्पर्धेमध्ये निखिल केवळ एका सामन्यात खेळला. ह्या सामन्यात सचिनच्या १४० धावांच्या जोरावर भारताने केनियाचा पराभव केला. विश्वकरंडकामधील आपल्या एकमेव सामन्यात निखिलने १० षटकांत ३३ धावा देत जम बसलेल्या केनेडी ओटीएनोला बाद केले. विश्वकरंडकात एका सामन्यात का होईना भारताकडून खेळलो हे माझे भाग्य आहे असे निखिलला वाटते. भारताकडून विश्वकरंडक खेळताना इतरांप्रमाणेच माझाही ऊर अभिमानाने भरून आला असे त्याने सांगितले.
एक गोलंदाज असलेल्या निखिलने १९९९ साली सिंगापूरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ६० चेंडूत ६१ धावांची खेळी केली. याच सामन्यात ब्रायन लाराचा त्रिफाळा उडवल्याचे निखिलला आजही आठवते. यानंतर लगेचच टोरांटोमध्ये झालेल्या एका स्पर्धेत त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध ६.२ षटकांत २१ धावा देत ५ बळी मिळवले. यात ब्रायन लारा, जिमी अॅडम्स आणि रिकार्डो पॉवेल अशा तीन महत्वाच्या मोहऱ्यांचा समावेश होता. नैरोबीमध्ये १९९९ साली झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात निखिलने ८.३ षटकांत ३३ धावा देत ४ बळी मिळवले. यामध्ये असलेला अँडी फ्लॉवरचा बळी आणि वेस्ट इंडिजविरुद्ध दोनदा मिळवलेला ब्रायन लाराचा बळी हे आपल्या संस्मरणीय बळींमध्ये असल्याचे निखिलने सांगतो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सतत चांगली कामगिरी केल्यामुळे २००० साली ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या कार्लटन अँड युनायटेड या एकदिवसीय चषकासाठी निखिलची संघात निवड झाली. या मालिकेत भारताने ८ सामने खेळून फक्त १ विजय मिळवला. या ८ पैकी एकाही सामन्यात निखिलला खेळवले नाही याबद्दल अनेकांना त्यावेळी आश्चर्य वाटले. त्यानंतर भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निखिलची भारतीय संघात निवड झाली. आपल्या कारकिर्दीतील या एकमेव कसोटी सामन्यात निखिलला एकही बळी मिळवता आला नाही.
२००० साली संपूर्ण क्रिकेटविश्व हादरवून सोडलेल्या सामनानिश्चिती प्रकरणात निखिलचे नाव आले. त्याच्या घरावर आयकर विभागाची धाडदेखील पडली होती. यावेळी निखिल इंग्लंडमध्ये होता. आयकर विभागाच्या या चौकशीमधून फारसे काही निष्पन्न न झाल्याने ५-७ दिवसात निखिलची निर्दोष मुक्तता झाली. सामनानिश्चिती प्रकरणात नाव आल्याने संघाबाहेर गेलेला निखिल यानंतर मात्र भारतीय संघामध्ये परत येऊ शकला नाही. या प्रकरणात नाव आले नसते तर कदाचित तो अजूनही काही वर्षे भारताकडून क्रिकेट खेळू शकला असता.आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत निखिलने ३९ सामन्यांत ४६ बळी मिळवले. गंभीर चेहऱ्याचा निखिल गोलदांजीही तितकीच विचाराने करत असे. त्याने खेळलेल्या जवळजवळ प्रत्येक सामन्यात एक दोन बळी मिळवत त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली होती.
देशांतर्गत स्पर्धांमध्येही दिल्लीच्या संघात स्थान मिळवणे अवघड असल्याने त्याने उत्तर प्रदेशकडून खेळणे पसंत केले.आपल्या २० वर्षांच्या प्रथमश्रेणी कारकिर्दीत निखिलने ६१ सामन्यांत १५१ बळी मिळवले. तुझ्यावेळी टी २० क्रिकेट असते तर तुझा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असता असे विचारले असता, आपल्या वेळी टी २० क्रिकेट असते तर स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची एक चांगली संधी आपल्याला मिळाली असती. मी इंग्लंडमध्ये असताना भरपूर टी२० क्रिकेट खेळलो त्यामुळे भारतात खेळायला मला निश्चित आवडले असते असे तो म्हणाला.
अमेरिकेन उद्योजक कल्पेश पटेल याने २००४ मध्ये आयोजित केलेल्या प्रो क्रिकेट लीगमध्ये भाग घेण्यासाठी निखिल अमेरिकेत गेला. आयसीसीची परवानगी नसल्याने ही स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली. बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्यापासून मज्जाव केला होता असे वृत्त होते. मात्र बीसीसीआयने आपल्यावर असे कोणतेही बंधन घातले नव्हते असे निखिलने बोलताना सांगितले. प्रो क्रिकेट लीगची संकल्पना चांगली होती मात्र ती लोकांना पसंत पडली नाही असे निखिलला वाटते. या स्पर्धेचे नंतर काय झाले याचीही फारशी माहिती उपलब्ध नाही.
बरेच क्रिकेटपटू निवृत्तीनंतर प्रशिक्षक म्हणून काम करतात. निखिलनेदेखील बीसीसीआयच्या एनसीएमध्ये १९ वर्षाखालील क्रिकेटपटूंसाठी दोन वर्षे प्रशिक्षणाचे काम केले. स्वतःची प्रशिक्षण अकादमी सुरु करण्यासाठी मात्र निखिल अजून तयार नाही. टीव्हीवरील आपल्या करारांमुळे आपण व्यस्त असल्याने प्रशिक्षण अकादमीला वेळ देणे अवघड जाते असे तो सांगतो. आपल्या नावाची अकादमी सुरु करून तिथे आपल्या ऐवजी इतरच लोक दिसणार हे काही त्याला पटत नाही. आपला मुलगा निखिल चोप्राच्या अकादमीमध्ये क्रिकेट शिकायला जातो म्हणून पालक आपल्या महिन्याच्या पगारातून पैसे बाजूला काढून त्याला तिथे पाठवणार आणि तिथे निखिल चोप्राच नसेल तर ती बेईमानी आहे असे तो मानतो.
क्रिकेट सोडून अजूनही बऱ्याच गोष्टींमध्ये निखिलचे नाव अधूनमधून येत राहिले. कलर्स वाहिनीवर २००८ साली झालेल्या ‘एक खिलाडी एक हसिना’ या कार्यक्रमामध्ये निखिलचा सहभाग होता. या कार्यक्रमामध्ये त्याच्याबरोबर हरभजन, विनोद कांबळी, श्रीशांत असेही खेळाडू होते. या कार्यक्रमाबद्दल त्याला विचारले असता डान्स केल्यानंतरही शरीरातले स्नायू दुखावू शकतात हे लक्षात आले असे हसत हसत त्याने सांगितले. अलीकडे निखिल एक गोल्फपटू म्हणून आपले नशिब आजमावतो आहे. येणाऱ्या काळात एखाद्या हौशी गोल्फ स्पर्धेमध्ये आपले नशिब अजमावण्याची त्याची इच्छा आहे. निखिलने काही काळ दिल्ली क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीवर देखील काम केले होते.
बऱ्याचदा विविध वाहिन्यांवर क्रिकेट विश्लेषक म्हणून काम करतानाही तो दिसतो. यावर्षीच्या आयपीएलमध्ये हिंदी समालोचक म्हणूनदेखील तो काम करतो आहे. चेहऱ्याने गंभीर दिसत असला तरी निखिलला हलकीफुलकी, उडत्या चालीची गाणी आवडतात. हिंदीमध्ये आशा भोसले तर इंग्रजीत पिंक फ्लॉइड आणि द डोअर्स हे त्याचे आवडते बँड आहेत.
निखिलची क्रिकेट कारकीर्द
एकदिवसीय
सामने – ३९ बळी – ४६
कसोटी
सामने – १ बळी – ०
प्रथम श्रेणी
सामने ६१ बळी – १५१
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार अन्य भाग-
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले!
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते!!
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर