भारत विरुद्ध इंग्लंडच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना १४ मार्च रोजी खेळवला गेला. मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव स्वीकाराव्या लागलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात मात्र शानदार पुनरागमन केले. या सामन्यात भारताने सांघिक कामगिरीच्या जोरावर इंग्लंडला ७ गडी राखून मात दिली.
या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी देखील महत्वाची भूमिका बजावली. पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला त्यांनी शिस्तबद्ध मार्यासह १६४ धावांवरच रोखले. भारतीय गोलंदाजांच्या या कामगिरीचे रहस्य वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने नुकतेच उलगडले.
संघ सहकाऱ्याला दिले श्रेय
शार्दुल ठाकूरने अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारला या कामगिरीचे श्रेय दिले. भुवनेश्वरच्या अनुभवाचा फायदा इंग्लंडला रोखण्यात झाला, असे शार्दुलने स्पष्ट केले. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी स्लोअर बॉल्सचा अधिकाधिक उपयोग केला. ज्याचा फायदा त्यांना झाल्याचे सिद्ध झाले.
याबाबत बोलताना शार्दुल म्हणाला, “भुवनेश्वर कुमारने पहिले षटक टाकले होते. त्यांनतर त्याने खेळपट्टी पाहून सगळ्या गोलंदाजांना स्लोअर बॉल्स अधिक टाकण्याचा सल्ला दिला. त्याच्या मते स्लोअर बॉल्स त्या खेळपट्टीवर अधिक उपयुक्त ठरले असते. त्याच्या सल्ल्यानुसार आम्ही बदल केला आणि त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्यात अडचण आली. ज्यामुळे आम्हाला विकेट घेण्यात यश आले.”
दुसऱ्या टी२० सामन्यात गोलंदाजांनी लाजवाब कामगिरी केली. केवळ पाचच गोलंदाज घेऊन खेळत असून देखील भारताने इंग्लंडला १६४ धावांवरच रोखले. यात वाॅशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूरने २ तर भुवनेश्वर आणि युझवेंद्र चहलने १ गडी बाद केला.
त्यानंतर इंग्लंडने दिलेले १६५ धावांचे लक्ष्य भारताने पदार्पणवीर ईशान किशन आणि कर्णधार विराट कोहली यांच्या अर्धशतकांच्या बळावर सहज गाठले. तसेच या विजयासह मालिकेत १-१ अशी बरोबरी देखील साधली. मालिकेतील तिसरा सामना १६ मार्च रोजी खेळवला जाईल.
महत्वाच्या बातम्या: