मंगळवारी (9 एप्रिल) आयपीएल 2024 च्या 23 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जचे संघ आमनेसामने होते. मुल्लानपूरच्या स्टेडियमवर खेळल्या गेलल्या या सामन्यात सनरायझर्सचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
34 वर्षीय भुवनेश्वर कुमारनं पंजाब किंग्जविरुद्ध आपल्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये 32 धावा देत 2 बळी घेतले. यासह तो रविचंद्रन अश्विनला मागे टाकत आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. भुवनेश्वरनं आधी प्रभसिमरन सिंग आणि त्यानंतर पंजाबचा कर्णधार शिखर धवनला माघारी पाठवलं. शिखर धवन भुवनेश्वरच्या गोलंदाजीत अनोख्या पद्धतीनं बाद झाला. विकेटकीपर हेनरिक क्लासेननं त्याला यष्टीचीत केलं.
आयपीएलच्या इतिहासात असं नवव्यांदा घडलंय जेव्हा एखादा फलंदाज वेगवान गोलंदाजाच्या गोलंदाजीत यष्टीचीत झाला. आयपीएलच्या इतिहासात आधी असं केवळ आठ वेळा घडलं होतं. यासह भुवनेश्वर कुमारनं आपलं नाव इतिहासाच्या पुस्तकात नोंदवलं आहे. तो आयपीएलमध्ये दोन फलंदाजांना यष्टीचीत करणारा पहिला वेगवान गोलंदाज बनलाय.
आयपीएलमध्ये स्टंपिंगद्वारे विकेट घेणारे वेगवान गोलंदाज
बी अखिल, फलंदाज रॉबिन उथप्पा, 2008
शॉन पोलॉक, फलंदाज ग्रॅम स्मिथ, 2008
चामिंडा वास, फलंदाज एल काल्सडाइन, 2009
मुनाफ पटेल, फलंदाज डॉन ख्रिश्चन, 2011
भुवनेश्वर कुमार, फलंदाज मानविंदर बिसला, 2013
शेन वॉटसन, फलंदाज गौतम गंभीर, 2013
किरॉन पोलार्ड,फलंदाज सुरेश रैना, 2014
संदीप शर्मा, फलंदाज ब्रेंडन मॅक्युलम, 2016
भुवनेश्वर कुमार, फलंदाज शिखर धवन, 2024
भुवनेश्वर कुमारनं आयपीएलमध्ये 11 वर्षांनंतर एखाद्या खेळाडूला यष्टीचीत केलं आहे. या आधी 2013 मध्ये त्यानं पुणे वॉरियर्सकडून खेळताना कोलकाता नाईट रायडर्सच्या मानविंदर बिसलाला अशाप्रकारे बाद केलं होतं. भुवनेश्वर कुमारनं आयपीएलमध्ये आतापर्यंत 173 बळी घेतले आहेत, जे कोणत्याही भारतीय वेगवान गोलंदाजाद्वारे घेतलेले सर्वाधिक बळी आहेत. आयपीएलच्या या हंगामात भुवनेश्वरनं 5 सामन्यांमध्ये 3 बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बापरे! ताशी 140 किमी वेगाच्या चेंडूवर यष्टीचीत केलं! हेनरिक क्लासेनची आश्चर्यकारक कामगिरी