लखनऊ। भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात गुरुवारपासून (२४ फेब्रुवारी) ३ सामन्यांची टी२० मालिका (T20I series) सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना (1st T20I) भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ६२ धावांनी विजय मिळवला. या सामन्यादरम्यान भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
भुवनेश्वरचा मोठा विक्रम
गुरुवारी झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर २०० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेकडून पाथम निसंका आणि कामिल मिश्रा या दोन सलामीवीरांची जोडी उतरली. मात्र, श्रीलंकेच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर भुवनेश्वर कुमारने पाथम निसंकाला शून्यावर बाद केले. याबरोबरच भुवनेश्वर आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात डावाच्या पहिल्याच षटकात सर्वाधिकवेळा विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे या यादीत त्याच्या आसपासही कोणी नाही.
भुवनेश्वरने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये डावाच्या पहिल्या षटकात १० वेळा विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. या यादीत भारतीय गोलंदाजांमध्ये त्याच्यापाठोपाठ आर अश्विनचे नाव येते. त्याने ४ वेळा अशी कामगिरी केली आहे. तसेच आशिष नेहराने ३ वेळा पहिल्या षटकात विकेट्स घेतली आहे.
एवढेच नाही तर भुवनेश्वर भारताकडून आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये एका डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारताकडून टी२०मध्ये कोणीही डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली नव्हती (wicket on the first ball).
दरम्यान, गुरुवारच्या सामन्यात भुवनेश्वरने कामिल मिश्राला देखील तिसऱ्या षटकात १३ धावांवर बाद करत श्रीलंकेला दुसरा धक्का दिला होता. या दोन धक्क्यांनंतर श्रीलंकेला सावरता आले नाही. त्यांच्याकडून चरिथ असलंकाने नाबाद ५३ धावांची खेळी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. तसेच चमिका करूणारत्ने (२१) आणि दुश्मंथा चमिरा (२४*) यांनीही तळात चांगली फलंदाजी केली. मात्र त्यांचे प्रयत्न तोकडे पडले आणि श्रीलंका २० षटकात ६ बाद १३७ धावाच करता आल्या. भारताकडून भुवनेश्वरव्यतिरिक्त वेंकटेश अय्यरने २ विकेट्स घेतल्या. तसेच युजवेंद्र चहल आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
इशान-श्रेयस यांची अर्धशतके
तत्पूर्वी, या सामन्यात श्रीलंकेने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारताने या संधीचा चांगलाच फायदा घेतल्याचे दिसले. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी १११ धावांची भागीदारी केली. रोहित ४४ धावांवर बाद झाला. पण नंतर इशानने दमदार खेळ करताना ५६ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांसह ८९ धावांची खेळी केली. तसेच त्याला श्रेयस अय्यरनेही चांगली साथ दिली. श्रेयसने २८ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५७ धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटच्या डॉनने २१ वर्षांपूर्वी घेतलेला अखेरचा श्वास, वाचा त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी