रणजी करंडक स्पर्धेसाठी उत्तर प्रदेशनं आपला संघ जाहीर केला. मात्र या 22 सदस्यीय संघात अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला स्थान मिळालेलं नाही. रणजी ट्रॉफीसाठी दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर आता भुवनेश्वर कुमारच्या टीम इंडियात पुनरागमनाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.
रणजी करंडक स्पर्धेत उत्तर प्रदेश 11 ऑक्टोबरला बंगालविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल. भुवनेश्वर कुमार नुकताच तब्बल 6 वर्षांनंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये परतला. परंतु आता त्याला रणजी संघात स्थान मिळालं नाही. त्यामुळे या वेगवान गोलंदाजाची भारतासाठीची कारकीर्द संपली का? असा प्रश्न उभा राहिला आहे.
भुवनेश्वर कुमार भारतासाठी दीर्घकाळ कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. त्याचबरोबर आता त्याला रणजी ट्रॉफीसाठी घरच्या संघातून वगळण्यात आलं. यापूर्वी भारत-बांगलादेश कसोटी मालिकेसाठी यश दयालचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. त्यानंतर भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियात पुनरागमन करणं जवळपास अशक्य असल्याच्या चर्चा सातत्याने होत आहेत.
भुवनेश्वर कुमारच्या नावे 72 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 231 विकेट आहेत. तसेच, त्यानं प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 13 वेळा 5 विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. याशिवाय त्यानं फलंदाजीत 2475 धावा केल्या आहेत. यामध्ये त्यानं एका शतकासह 14 वेळा 50 धावांचा टप्पा पार केला.
भुवनेश्वर कुमारनं सहा वर्षांपूर्वी भारताकडून शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर तो कसोटी संघात स्थान मिळवू शकलेला नाही. मात्र, याआधी तो 2013 ते 2018 अशी सलग 5 वर्षे भारतीय संघाकडून खेळला होता. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमारनं भारतासाठी शेवटचा सामना 2022 मध्ये खेळला होता. त्यामुळे आता असं मानलं जात आहे की, भुवनेश्वर कुमारचं भारतीय संघात पुनरागमन सोपं नाही. यापुढे तो फक्त आयपीएल आणि इतर मर्यादित षटकांच्या स्पर्धांमध्ये दिसू शकतो.
हेही वाचा –
जो रूटचा बलाढ्य विक्रम, विराट कोहली आणि रोहित शर्मा जवळपासही नाही
जो रुटचा धमाका! एका झटक्यात मोडले कसोटीतील 3 मोठे रेकॉर्ड
ॲलिस्टर कुकला मागे टाकत, जो रूट आता टाॅपवर; इंग्लंडसाठी अशी कामगिरी करणारा इतिहासात पहिलाचं