नुकताच यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. ही स्पर्धा झाल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टी -२० मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत जोरदार विजय मिळवला आहे. या सामन्यात देखील भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने चांगली सुरुवात करून दिली होती.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यूएईच्या खेळपट्टीवर फ्लॉप ठरला होता. संथ खेळपट्टीवर त्याला गती आणि स्विंग मिळत नव्हता. परंतु, भारतातील खेळपट्टीवर गती आणि स्विंग उपलब्ध आहे. त्यामुळे सामन्याच्या पहिल्याच षटकातील तिसरा आणि आपला पहिलाच चेंडू खेळणाऱ्या डॅरील मिशेलला त्याने त्रिफळाचित केले आणि माघारी धाडले.
फलंदाजाला त्याच्या पहिल्याच चेंडूवर फलंदाजाला बाद करणे हे भुवनेश्वर कुमारसाठी काही नवीन नाहीये. हे काम त्याने यापूर्वी देखील केले आहे. डॅरील मिशेलला गोल्डन डकवर बाद करण्यापूर्वी भुवनेश्वर कुमारने २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात आरोन फिंचला देखील पहिल्याच षटकात त्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद केले होते. तर २०२१ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात जोस बटलरला देखील पहिल्याच षटकात तो पहिला चेंडूचा सामना करत असताना बाद करत माघारी धाडले होते.
त्यामुळे, आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये तीन वेळा डावाच्या पहिल्या षटकात फलंदाजाला गोल्डन डकवर बाद करणारा भुवनेश्वर पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे.
तसेच या सामन्याबाबत बोलायचं झालं तर, भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, तर न्यूझीलंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना मार्टिन गप्टीलने सर्वाधिक ७० तर मार्क चॅपमनने ६३ धावांचे योगदान दिले.या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला २० षटक अखेर ६ बाद १६४ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली. तर रोहित शर्माने ४८ धावांचे योगदान देत भारतीय संघाला हा सामना ५ गडी राखून जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
बोल्टचे आभार मानत सूर्यकुमारने पत्नीला दिली वाढदिवशी खास भेट
लयीत परतला भुवनेश्वर कुमार! वेगवान चेंडूवर उडवला न्यूझीलंडच्या सलामीवीराचा त्रिफळा, पाहा व्हिडिओ
टी२० विश्वचषकानंतर आयसीसी क्रमवारीत मोठे फेरबदल; केएल राहुल टॉप फाइव्हमधून बाहेर, तर विराट या स्थानी