सध्या इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. तर दुसरीकडे रणजी ट्रॉफी स्पर्धेचा थरार देखील पहायला मिळत आहे. तसेच रणजी ट्रॉफी स्पर्धेत अजिंक्य रहाणे मुंबई संघाचे कर्णधार पद संभाळत आहे. तर या सामन्यात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आसामचे फलंदाज पहिल्या डावात फ्लॉप ठरले आणि संपूर्ण संघ 84 धावांत आटोक्यात आला होता. यानंतर मुंबईचा संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा मैदानावर वेगळाच ड्रामा पाहायला मिळाला आहे.
आसाम आणि मुंबई यांच्यात सुरू असलेल्या रणजी सामन्यादरम्यान, अजिंक्य रहाणेला त्याच्या 16 वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल आऊट देण्यात आले होते. मात्र, काही वेळाने आसाम संघाने अपील मागे घेतल्यानंतर रहाणेने पुन्हा फलंदाजी सुरू केली आहे. त्याआधी मुंबईचा संघ चार गडी गमावून 102 धावा करून खेळत होता आणि रहाणे18 धावांवरती खेळत होता.
यानंतर त्याने चेंडू मिड-ऑनच्या दिशेने वळवून सिंगल घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा साथीदार शिवम दुबेने धाव घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर रहाणे बराच पुढे आला होता आणि आसामचा कर्णधार दानिश दासने चेंडू उचलून कीपरच्या दिशेने फेकत असताना तो चेंडू रहाणेला लागला होता. यानंतर आसामच्या सर्व खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल आऊटची अपील केली होती.
आसामच्या सर्व खेळाडूंनी अपील केली असता रहानेला बाद दिले होते. त्यानंतर तो तो पॅव्हेलियनच्या दिशेने जात होता. मात्र मैदानाबाहेर जात असताना आसामच्या खेळाडूंनी आपल्या कर्णधारासोबत चर्चा केली आणि आपली अपील मागे घेतली होती. त्यामुळे अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी मैदानावर परतला. त्यामुळे आसामच्या खेळाडूंचं चहूबाजूंनी कौतुक केलं जात आहे.
दरम्यान, नियमांनुसार, पुढील चेंडू टाकण्यापूर्वी बाद करण्याचे अपील मागे घ्यावे लागते आणि अंपायर जेव्हा ते स्वीकारतील तेव्हाच फलंदाज फलंदाजीला परत येऊ शकतो. सुदैवाने रहाणे बाद झाल्यानंतर चहापानाचा ब्रेक घेण्यात आला आणि त्याच दरम्यान आसाम संघाने आपला निर्णय बदलला. परिणामी, 20 मिनिटांनी रहाणे पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात आला. मात्र, रहाणेला या जीवदानाचा फायदा उठवता आला नाही आणि केवळ चार धावा जोडल्यानंतर २२ धावांवर तो बाद झाला आहे.
महत्वाच्या बातम्या –