आयसीसी विश्वचषक 2023 चा 17 वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या सलामीच्या फलंदाजांनी हा निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचे सिद्ध केले. तन्झिद हसन आणि लिटन दास या जोडीने भारतीय गोलंदाजांविरुद्ध चांगली खेळी करत 93 धावांची भागीदारी केली, आणि बांगलादेशसाठी एकदिवसीय विश्वचषकात सर्वात मोठ्या सलामीच्या भागीदारीचा विक्रम रचला.
तन्झिद हसन (Tanzid Hasan) आणि लिटन दास (Litan Das) यांनी पहिल्या पाच षटकांमध्ये अत्यंत सावध खेळ करत केवळ 10 धावा केल्या. मात्र, पुढच्या पाच षटकांत त्यांनी त्याची भरपाई केली आणि 53 धावा कुटल्या. बांगलादेशने पहिल्या पॉवरप्लेमध्ये एकही विकेट्स न गमावता 63 धावा केल्या.
यानंतर, या जोडीने 12 व्या षटकात 70 धावांची भागीदारी करताच, त्यांनी वनडे विश्वचषकातील आपल्या संघाची सर्वात मोठी सलामीची भागीदारी करण्याचा विक्रम देखील नोंदवला. ही जोडी 15व्या षटकात कुलदीप यादवने तन्झिद हसनला 51 धावांवर बाद करून फोडली.
यापूर्वी 1999 च्या विश्वचषकात बांगलादेशसाठी सर्वात मोठी सलामी भागीदारीचा विक्रम शहरयार हुसेन आणि मेहराब हुसैन यांच्या नावावर होता. या दोघांनी पाकिस्तानविरुद्ध पहिल्या विकेट्ससाठी 69 धावांची भागीदारी केली होती. या भागीदारीत मेहराबने केवळ 9 धावांचे योगदान दिले होते. या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा 62 धावांनी पराभव केला होता.
त्यानंतर, वनडे विश्वचषकात बांगलादेशसाठी तिसरी सर्वात मोठी भागीदारी सौम्या सरकार (Soumya Sarkar) आणि तमीम इक्बाल (Tamim Iqbal) यांनी केली आहे. या दोघांनी 2019 विश्वचषकामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 60 धावा जोडल्या होत्या. या सामन्यातही बांगलादेशने २१ धावांनी विजय मिळवला होता. (Big feat by Bangladeshi openers against India broke 24-year-old record)