आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 3 दिवसांआधी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. खरं तर, अफगाणिस्तान क्रिकेटने भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू अजय जडेजा याला वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी संघाचा मेंटॉर (मार्गदर्शक) बनवले आहे. अफगाणिस्तान संघाने 2015 आणि 2019च्या विश्वचषकात खूपच खराब प्रदर्शन केले होते. त्यामुळेच या विश्वचषकात बोर्डाकडून हा मोठा निर्णय घेतला गेला आहे. आता जडेजा अफगाणिस्तानला चॅम्पियन बनवण्यासाठी मार्गदर्शन करत आहे.
अफगाणिस्तान बोर्डाने दिली माहिती
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (Afghanistan Cricket) त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून अजय जडेजा (Ajay Jadeja) याला मेंटॉर बनवल्याची माहिती दिली आहे. बोर्डाने सोमवारी (दि. 02 ऑक्टोबर) ट्वीट करत लिहिले की, “एसीबीने भारतीय माजी कर्णधार आणि मधल्या फळीतील माजी फलंदाज अजय जडेजा याला आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी अफगाणिस्तानचा मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले आहे.”
https://twitter.com/ACBofficials/status/1708783931544232041
अफगाणिस्तानने 2019मध्ये गमावलेले सर्व सामने, 2015मध्ये फक्त एक विजय
अफगाणिस्तान क्रिकेट संघाने 2019च्या वनडे विश्वचषकात सर्व सामने गमावले होते. संघाने 9 सामने खेळले होते. त्यातील एकही सामना जिंकण्यात संघ यशस्वी ठरला नव्हता. तसेच, यापूर्वी 2015च्या वनडे विश्वचषकातही अफगाणिस्तान संघाने एकूण 6 सामने खेळले होते. संघाने यातील 5 सामने गमावले होते. त्यांना फक्त 1 सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. अशात आगामी विश्वचषक स्पर्धेत चांगले प्रदर्शन करण्याकडे संघाचे लक्ष असेल.
विश्वचषकाची सुरुवात
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळला जाणार आहे. तसेच, अफगाणिस्तान संघ 7 ऑक्टोबर रोजी धरमशाला येथे बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने विश्वचषकातील अभियानाला सुरुवात करेल. तसेच, संघाचा दुसरा सामना 11 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे भारतीय संघाविरुद्ध खेळला जाईल.
अजय जडेजाविषयी थोडक्यात
भारताचा माजी खेळाडू अजय जडेजा 1996 विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होता. अशात विश्वचषकात अफगाणिस्तान संघासाठी तो महत्त्वाची भूमिका बजावताना दिसणार आहे. त्याने 1992 ते 2000 दरम्यान भारताकडून 15 कसोटी आणि 196 वनडे सामने खेळले आहेत. कसोटीच्या 24 डावात त्याने 576 धावा केल्या आहेत. त्यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त वनडेतील 179 डावात त्याने 6 शतके आणि 30 अर्धशतकांच्या मदतीने 5359 धावा केल्या आहेत. (big news ajay jadeja appointed as mentor for afghanistan cricket team during the icc world cup 2023)
हेही वाचा-
‘धोनीकडून खूप काही शिकलो, पण…’, नेपाळविरुद्धच्या क्वार्टर फायनलपूर्वी ऋतुराजचे लक्षवेधी भाष्य
World Cup ची होणार रंगारंग सुरुवात! 4 ऑक्टोबरला ओपनिंग सेरेमनीत बॉलिवूडचा तडका






