सध्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2023चा घाट घातला जात आहे. भारताच्या महिला क्रिकेट संघाने या स्पर्धेत पहिल्यांदाच सुवर्ण पदक आपल्या नावावर केले आहे. आता भारतीय पुरुष क्रिकेट संघही या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी युवा खेळाडू ऋतुराज गायकवाड याच्या खांद्यावर आहे. भारतीय संघ मंगळवारी (दि. 03 ऑक्टोबर) रोजी उपांत्यपूर्व सामन्यात नेपाळविरुद्ध भिडणार आहे. या सामन्यापूर्वी कर्णधार ऋतुराज एमएस धोनीविषयी जे बोलला, त्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आयपीएल (IPL) स्पर्धेत एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाकडून खेळतो. त्याने धोनीविषयी बोलताना म्हटले, “मी धोनीकडून खूप काही शिकलो आहे. मात्र, प्रत्येक व्यक्तीची आपली शैली असते. त्यांची शैली वेगळी आहे. त्यांचे आणि माझे व्यक्तिमत्त्व वेगळे आहे.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “मी त्यांच्याप्रमाणे काही करण्याऐवजी आपल्या शैलीने खेळेल. परिस्थितीचा सामना करणे आणि सामन्यादरम्यान खेळाडूंचा योग्य वापर करण्याबाबत त्यांच्याकडून जे शिकलो, ते मी नक्कीच अंमलात आणेल.”
“क्रिकेटमध्ये विश्वचषक आहे, आयपीएल आहे आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आहेत. आम्हाला त्याप्रकारची स्थिती आणि वातावरणाची सवय आहे. मात्र, इथे राहणे, इतर खेळाडू आणि त्यांच्या संघर्षाबाबत जाणून घेण्याचा अनुभव वेगळा आहे. त्याला त्यांना 2 ते 3 वर्षांमध्ये खेळण्याची संधी मिळते. आम्हाला इथला दौरा करून खूप चांगले वाटले,” असेही ऋतुराज म्हणाला.
याव्यतिरिक्त भारतीय प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाले की, चीनमध्ये क्रिकेट खेळण्याचा अनुभव वेगळा असेल. ते म्हणाले, “इथे खूपच वेगळे आहे. आम्ही कधीच विचार केला नव्हता की, चीनमध्ये क्रिकेट खेळू. संपूर्ण संघासाठी ही शानदार संधी आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणे अभिमानाची बाब आहे.”
अशात ऋतुराजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मंगळवारी नेपाळविरुद्ध कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (captain ruturaj gaikwad big statement about ms dhoni captaincy ahead of india vs nepal asian games 2023)
हेही वाचा-
विश्वचषकापूर्वी माजी दिग्गजाचा अश्विनवर निशाणा! म्हणाला, ‘भारतात त्याच्यासाठी खेळपट्ट्या…’
‘भारताविरुद्ध खेळताना पाकिस्तानी खेळाडू घाबरतात…’, PAK दिग्गजाचे त्याच्याच देशाबद्दल खळबळजनक विधान