क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. जगभरातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित टी20 लीगपैकी एक असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या फ्रँचायझीशी संबंधित ही बातमी आहे. आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्स संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड हा संघापासून वेगळा झाला आहे. मुंबईचा गोलंदाजी प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय लीग टी20मधील एमआय अमिराती संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून शेन बाँडचा कार्यकाळ 9 वर्षांनंतर संपुष्टात आला आहे. याची माहिती स्वत: संघाने सोशल मीडियावरून दिली आहे.
मुंबई इंडियन्सने दिली माहिती
बुधवारी (दि. 18 ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेन बाँड याचा कार्यकाळ संपल्याची माहिती दिली. त्यांनी निवेदनात म्हटले की, “मुंबई इंडियन्स घोषित करते की, 2015 मध्ये सुरू झालेला शेन बाँडचा यशस्वी कार्यकाळ संघासोबत प्रदीर्घ 9 वर्षांनंतर संपला आहे. त्याच्या मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून 4 आयपीएल ट्रॉफी आणि आंतरराष्ट्रीय लीग टी20मध्ये एमआय अमिरातीचा मुख्य प्रशिक्षक म्हणून केलेल्या शानदार कारकीर्दीवर पडदा पडला आहे.”
Mumbai Indians Bowling Coach and MI Emirates Head Coach Shane Bond moves on from the MI #OneFamily
Read more ➡️ https://t.co/eFLsQBUiRH pic.twitter.com/PtQXpy4JkC
— Mumbai Indians (@mipaltan) October 18, 2023
बाँड काय म्हणाला?
न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बाँड (Shane Bond) याने आपला कार्यकाळ संपल्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “गेल्या नऊ हंगामात एमआय वन फॅमिलीचा भाग बनण्याची संधी मिळाल्याबद्दल मी अंबानी कुटुंबाचे आभार मानू इच्छितो. मैदानावर आणि मैदानाबाहेर अनेक छान आठवणी असलेला हा एक अविश्वसनीय अनुभव आहे. खेळाडू आणि कर्मचारी अशा अनेक महान लोकांसोबत काम करण्यास आणि त्यांच्याशी मजबूत संबंध ठेवल्याबद्दल मी भाग्यवान आहे. मला त्या सर्वांची आठवण येईल. तसेच, मी त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो. अखेर त्यांच्या पाठिंब्याबद्दल एमआय पलटणचेही आभार.”
बाँडची मुंबईसोबत कारकीर्द
जेम्स बाँड हा 2015मध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मुंबई इंडियन्स संघात जोडला गेला होता. तो 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये मुंबईच्या किताबी विजयांमध्ये फ्रँचायझीच्या इतिहासातील सर्वात सुशोभित आणि प्रसिद्ध प्रशिक्षकांपैकी एक बनला होता. तसेच, त्याने आयएलटी20 लीगच्या उद्घाटनाच्या हंगामात एमआय अमिराती (MI Emirates) संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणूनही कामकाज पाहिले होते. (Big News Mumbai Indians part ways with bowling coach Shane Bond)
हेही वाचा-
सलग दोन पराभवांचं तोंड पाहिलेल्या बांगलादेशपुढे रोहितसेनेचं आव्हान, पुण्यातही खणकणार का टीम इंडियाचं नाणं?
सलग 3 सामने जिंकणाऱ्या न्यूझीलंडला रोखणार का अफगाणी सेना? जाणून घ्या आजच्या सामन्याची माहिती