इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा हंगाम काही दिवसांपूर्वीच समाप्त झाला. कोरोना विषाणूच्या साथीमुळे आयपीएलचा हा हंगाम युएईमध्ये खेळवला गेला. ज्यात मुंबई इंडियन्सने विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद आपल्या नावे केले. आयपीएलचा तेरावा हंगाम संपल्यानंतर आता आयपीएल २०२१ कडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आयपीएल गव्हर्निंग काउंसिल आयपीएलमध्ये नवीन संघ समाविष्ट करण्याचा विचार करत आहेत. सोबतच, चौदाव्या हंगामावेळी ‘मेगा ऑक्शन’ आणि स्पर्धेच्या नियमांमध्येही काही मोठे बदल दिसू शकतात.
फ्रँचायझींना हवे आहेत पाच परदेशी खेळाडू
एका क्रिकेट संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, आयपीएलच्या काही फ्रँचायझी अंतिम अकरामध्ये ४ ऐवजी ५ परदेशी खेळाडू खेळवण्याच्या बाजूने आहेत. सध्या अंतिम अकरामध्ये केवळ चार विदेशी खेळाडू खेळवण्याची परवानगी आहे.
बीसीसीआय अधिकाऱ्याने केली पुष्टी
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “काही फ्रँचायझी बऱ्याच काळापासून आयपीएल गव्हर्निंग काउंसिलला अंतिम अकरामध्ये पाचव्या परदेशी खेळाडूला खेळवण्याची परवानगी देण्यासंबंधी विनंती करत आहेत. मात्र, बीसीसीआयने या विषयावर अजून तरी विचार केलेला नाही. काही फ्रँचायझींनी पुन्हा नव्याने या विषयाबद्दल बीसीसीआयकडे विनंती केली आहे. अशा परिस्थितीत आम्ही योग्य तो निर्णय घेऊ.”
या अधिकाऱ्यांनी पुढे बोलताना म्हटले, “लीगचा विस्तार करायचा असेल, तर काही नियम बदलावे लागतील हे नक्की आहे. तसेच स्पर्धेचे स्वरूप देखील बदलेल. याबाबत सविस्तर चर्चा करूनच निर्णय जाहीर करण्यात येईल.”
अशा प्रकारचे नवीन नियम होऊ शकतात लागू
आयपीएलच्या पुढील हंगामात स्पर्धेचा विस्तार अपेक्षित आहे. आयपीएलच्या चौदाव्या हंगामात दोन नवीन संघ सहभागी होतील, असे वृत्त आहे. दोन नवीन संघ सहभागी झाल्यास राऊंड रॉबिन पद्धत बंद होऊ शकते. त्याऐवजी, संघांना दोन गटात विभागून स्पर्धा खेळविण्यात येण्याची शक्यता आहे. सोबतच, पाच विदेशी खेळाडू अंतिम अकरामध्ये खेळवले जाऊ शकतात. बिग बॅश लीगमध्ये वापरण्यात येणारे एक्स-फॅक्टर प्लेयर आणि पावर सर्ज हे नवीन नियम आयपीएलमध्ये देखील वापरात आणले जाण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
परदेशी लीग खेळण्याची परवानगी मिळाल्यास ‘हे’ ३ भारतीय होऊ शकतात बीबीएलचे कर्णधार
नादच खुळा! महिला बीबीएलमध्ये ‘या’ खेळाडूने ठोकला अचंबित करणारा चौकार
चेन्नईने एमएस धोनीला संघातून रिलीझ करावे, माजी क्रिकेटपटूचे मोठे भाष्य