आयपीएल 2025 स्पर्धेला सुरुवात होण्यास अवघा एक दिवस राहिलेला आहे. पहिल्याच सामन्यात ज्या संघाला अजून आयपीएल स्पर्धेची एकही ट्रॉफी मिळालेली नाही म्हणजे आरसीबी आणि गत विजेता संघ केकेआर यांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी या सामन्याआधी आरसिबीची खिल्ली उडवणे सुरू केले आहे. आरसीबीला नेहमीच ट्रॉफी न जिंकल्यामुळे ट्रोल केले जाते. पण यावेळी चेन्नईच्या माजी खेळाडूने इंस्टाग्रामवर एक रील शेअर करत आरसीबीच्या चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
आरसीबी संघ शानदार प्रदर्शन करत आयपीएल ट्रॉफीच्या जवळ पोहोचतो. पण मागच्या 17 वर्षात संघाने एकही ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे आयपीएलच्या प्रत्येक स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच या संघावर विरोधक शिंतोडे उडवण्यास सुरू करतात. सीएसके चा माजी खेळाडू एस बद्रीनाथ याने अशाच प्रकारे एक रील बनवला आहे आणि तो इंस्टाग्राम वर शेअर करत आरसीबीचा अपमान केलेला आहे.
एस बद्रीनाथने आरसीबीची एका वेगळ्या प्रकारे खिल्ली उडवली आहे. त्याने स्वतःवर सीएसके लिहिले आणि समोर 9 संघ म्हणजेच 9 माणसे उभी आहेत. त्याने प्रत्येक संघाशी हात मिळवला आणि मिठी देखील मारली. पण त्याने आरसीबीला बघितले सुद्धा नाही. बद्रीनाथचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.
आरसीबीसाठी 18 वा हंगाम महत्त्वाचा ठरू शकतो. तसेच संघाकडे आयपीएल स्पर्धा जिंकण्याची मोठी संधी आहे. 22 मार्च रोजी संघाचा पहिला सामना केकेआर विरुद्ध होणार आहे आणि संघ जिंकूनच स्पर्धेची सुरुवात करण्याच्या तयारीने उतरेल. या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असणार आहेत.






