भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने अफगाणिस्तानविरुद्ध जबरदस्त खेळी केली. त्याने 84 चेंडूत 5 षटकार आणि 16 चौकारांच्या मदतीने 131 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे आख्खा सामना भारताच्या बाजूने झुकला. रोहित शर्मा क्रिकेट विश्वचषकात सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनला आहे. त्याने आतापर्यंत विश्वचषकात 7 शतके केली आहेत. त्याचबरोबर त्याने सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडीत काढला आहे. रोहितच्या या खेळीमुळे भारताला गुणतालिकेतही चांगला फायदा झाला आहे.
काय म्हणाले दिग्गज?
रोहितच्या या खेळीबद्दल भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, “रोहित शर्मा (Rohit Sharma) रिस्क घेऊन खेळणारा खेळाडू आहे. बऱ्याचवेळा तो शतकाच्या जवळ येऊन बाद झाला आहे. त्यामुळे त्याचे हे शतक बघून खूप भारी वाटले.”
सामना संपल्यानंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गावसकर रोहितबद्दल म्हणाले, “मी खूप खुश आहे. कारण रोहित शर्मा शतक करण्यात यशस्वी ठरला आहे. तो बऱ्याचवेळा शतकाच्या जवळ येऊन बाद झाला आहे. रोहित हा असा खेळाडू आहे, जो खूप रिस्क घेऊन खेळत असतो. त्यामुळे तो बऱ्याचवेळा 60-70 धावा करून बाद झाला आहे. बऱ्याचवेळा त्याने संघाला चांगली सुरुवात करुन दिली आहे, पण त्याचा त्याला तोटाही झाला आहे. परंतु त्याच्या आक्रमकपणामुळे संघाला बऱ्याचवेळा फायदा झाला आहे. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे अफगाणिस्तानविरुद्धचा सामना.”
सामन्याचा आढावा
या सामन्यात अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमावत 272 धावा केल्या होत्या. यावेळी भारताकडून जसप्रीत बुमराह याने 10 षटके गोलंदाजी करताना फक्त 39 धावा खर्चून सर्वाधिक 4 विकेट्स नावावर केल्या. त्यानंतर भारतीय संघाने या आव्हानाचा पाठलाग करताना अवघ्या 35 षटकात 2 विकेट्स गमावत 273 धावा केल्या आणि सामना 8 विकेट्सने खिशात घातला. यावेळी भारताकडून रोहितव्यतिरिक्त (131) विराट कोहली (नाबाद 55), इशान किशन (47) आणि श्रेयस अय्यर (नाबाद 25) यांनीही मोलाचे योगदान दिले. (Big statement of former legendary player about Rohit Sharma know more)
हेही वाचा-
शतक ठोकलं रोहितनं, पण विराटला झाला सर्वाधिक आनंद; सर्वत्र होतंय कौतुक
बाहशाह बुमराह! वर्ल्डकपमधील दर्जा कामगिरी सुरूच, असा आहे आजवरचा रेकॉर्ड