क्रिकेटच्या मैदानावर जर तुम्हाला सर्वाधिक कोणता खेळाडू व्यस्त दिसत असेल, तर तो खेळाडू इतर कोणी नसून संघाचा कर्णधार असतो. संघाच्या कर्णधारावर सर्वाधिक दबाव असतो. क्रिकेटचा कोणताही प्रकार असो कसोटी, वनडे किंवा टी२०, त्या सामन्यादरम्यान कर्णधाराला एका नव्या रणनीतीनेच मैदानावर उतरावे लागते. जेव्हा एखादा संघ तो सामना जिंकतो, तेव्हा त्याचे सर्व श्रेय कर्णधाराबरोबरच संपूर्ण संघाला दिले जाते. परंतु जेव्हा संघ पराभूत होतो, तेव्हा त्या पराभवाचे खापर संघाच्या कर्णधारावर फोडले जाते.
क्रिकेट इतिहासात आतापर्यंत अनेक दिग्गज खेळाडू झाले आहेत, ज्यांनी एक कर्णधार आणि एक चांगला फलंदाज अशी दोहोंची भूमिका उत्तमरीत्या पार पाडली आहे. सध्याच्या काळात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. कर्णधार म्हणून तुमची संघाबद्दल जबाबदारी आणखी वाढत असते.
या लेखात आपण त्या ५ कर्णधारांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी वनडे सामन्यात सर्वाधिक धावा ठोकल्या आहेत.
वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणारे ५ कर्णधार- Biggest One Day Innings by 5 Batsman Being a Captain
५. सर विवियन रिचर्ड्स (१८१ विरुद्ध श्रीलंका)
वेस्ट इंडीजचे दिग्गज माजी खेळाडू आणि कर्णधार विवियन रिचर्ड्स (Sir Vivian Richards) हे वनडेत सर्वाधिक सामन्यांमध्ये (१०५) नेतृत्व करणारे विंडीजचे दुसरे कर्णधार आहेत. रिचर्ड्स यांनी श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यात केलेल्या १८१ धावांची खेळी या यादीत ५व्या क्रमांकावर आहे. ही खेळी त्यांनी १९८७ साली रिलायन्स विश्वचषकादरम्यान कराची येथे केली होती.
त्यामध्ये त्यांनी १२५ चेंडूंचा सामना केला होता. त्यात ७ गगनचुंबी षटकारांचा आणि १६ चौकारांचा समावेश होता. रिचर्ड्स यांच्या खेळीमुळे त्या सामन्यात विंडीजने श्रीलंकेला १९१ धावांनी पराभूत केले होते.
४. सचिन तेंडुलकर (नाबाद १८६ विरुद्ध न्यूझीलंड)
भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर अनेक विक्रम आहेत. सचिनने भारताकडून ७३ वनडे सामन्यांमध्ये नेतृत्व केले होते. त्यादरम्यान त्याने आपल्या वनडे कारकीर्दीत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावांची खेळी केली होती. त्याने १९९९ मध्ये हैद्राबाद येथे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात १५० चेंडूंचा सामना करताना नाबाद १८६ धावांची धडाकेबाज खेळी केली होती. त्यात ३ षटकार आणि २० चौकारांचा समावेश होता. भारतीय संघाने तो सामना १७४ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता.
३. सनथ जयसूर्या (१८९ विरुद्ध भारत)
श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज सनथ जयसूर्याने (Sanath Jayasuriya) १९९८-२००३ दरम्यान श्रीलंका संघाचे नेतृत्व केले होते. त्यादरम्यान त्याने ११८ सामन्यांमध्ये श्रीलंकेचे नेतृत्व केले. ऑक्टोबर २०१०मध्ये शारजाहच्या मैदानावर जयसूर्याने भारताविरुद्ध १८९ धावांची चमकदार खेळी केली होती. त्यात त्याने ४ षटकार आणि २१ चौकार ठोकले होते. त्या सामन्यात श्रीलंकेने निर्धारित ५० षटकांमध्ये ५ बाद २९९ धावांची खेळी केली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ ५४ धावांवर सर्वबाद झाला होता. अशाप्रकारे श्रीलंकेने २४५ धावांच्या मोठ्या फरकाने भारतीय संघाला नमविले होते.
२. रोहित शर्मा (नाबाद २०८ विरुद्ध श्रीलंका)
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर वनडेत ३ द्विशतक आहेत. यांपैकी एक द्विशतक त्याने भारतीय संघाचे नेतृत्व करताना ठोकले होते. रोहितने डिसेंबर, २०१७ मध्ये मोहाली येथे श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यात खेळताना १५३ चेंडूत नाबाद २०८ धावांची द्विशतकी खेळी केली होती.
आपल्या या खेळीत त्याने तब्बल १२ षटकार आणि १३ चौकार ठोकले होते. त्या सामन्यात भारतीय संघाने रोहितच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर ४ बाद तब्बल ३९२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघाला ८ बाद २५१ धावाच करता आल्या होत्या. अशाप्रकारे भारतीय संघाने तो सामना १४१ धावांच्या फरकाने जिंकला होता. रोहितने १० सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. त्यात त्याने ५४३ धावा केल्या आहेत. त्यामध्ये २ अर्धशतकांचा आणि २ शतकांचा समावेश आहे.
१. विरेंद्र सेहवाग (२१९ विरुद्ध वेस्ट इंडीज)
भारतीय संघाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) हा नेहमीच एक विस्फोटक फलंदाज राहिला आहे. जो प्रत्येक सामन्यात चौकार ठोकून आपल्या खेळीची सुरवात करण्यासाठी ओळखला जात होता. वनडे क्रिकेटमध्ये नेतृत्व करताना केलेली सर्वाधिक धावांचा विक्रमही सेहवागच्याच नावावर आहे. त्या सामन्यात त्याने कर्णधार म्हणून डिसेंबर, २०११मध्ये इंदोर येथे वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे सामन्यात १४९ चेंडूत २१९ धावांची द्विशतकी खेळी केली होती. त्यात ७ षटकार आणि २५ चौकारांचा समावेश होता.
सेहवागने केलेल्या खेळीच्या मदतीने भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांमध्ये ५ बाद ४१८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना विंडीज संघ २६५ धावांवरच संपुष्टात आला होता. अशाप्रकारे तो सामना भारताने १५३ धावांनी आपल्या खिशात घातला होता. सेहवागने भारताकडून १२ सामन्यांंमध्ये नेतृत्व केले होते. त्यात त्याला ७ सामन्यांमध्ये विजय तर ५ सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागला होता.
वाचनीय लेख-
-एकेवेळी ३ बाऊंसर हेल्मेटला लागल्यामुळे रडणारा खेळाडू ते भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे
-अविश्वसणीय! वनडेत १०००० धावा, १०० विकेट्स व १०० झेल घेणारे ५ खेळाडू
-१२ धावांवर बोल्ड झालेल्या लाराने पुढे केल्या होत्या नाबाद ५०१ धावा