fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

यन्ना रास्कला! भारतीय सुपरस्टार क्रिकेटर करतोय तामिळ चित्रपटात काम

मुंबई । ‘टर्बनेटर’ या नावाने प्रसिद्ध असलेला भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने आपल्या कारकिर्दीत फिरकीच्या जोरावर भल्याभल्या गोलंदाजाला नाचविले आहे. वाढतं वय, सातत्याने येणारे प्रतिभावान युवा क्रिकेटपटू यावर त्याला मात करता न आल्याने तो गेल्या चार वर्षांपासून संघाबाहेर आहे. क्रिकेटच्या खेळपट्टीवर धमाल करणारा 39 वर्षीय हरभजन सिंग आता चित्रपटात आपले नशीब आजमावत आहे.

‘दुसरा’ चेंडू टाकून फलंदाजांना चकवणाऱ्या हरभजन सिंगने नुकताच सोशल मीडियावर तो भूमिका करत असलेल्या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. तमिळ भाषेत असलेल्या ‘फ्रेंडशिप’ नावाच्या चित्रपटात तो आपले नशीब आजमावत आहे. हा चित्रपट ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. तसेच हिंदी आणि पंजाबी भाषेत देखील या चित्रपटाचे डबिंग करून ‘रिलीज’ करण्यात येणार आहे.

जॉन पॉल राज आणि श्याम सूर्या हे दिग्दर्शित करीत असलेल्या या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता अर्जुन देखील भूमिका करत आहे. या चित्रपटात हरभजन सिंगची काय भूमिका आहे हे अद्याप कळू शकले नाही. पण पोस्टरवर त्याचे चित्र असल्याने कदाचित त्याला देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका मिळाली असावी असा अंदाज बांधला जात आहे.

सध्या हरभजन तामिळनाडूच्या आयपीएल (चेन्नई सुपर किंग्ज) टीममध्ये खेळत असून याचा त्याला फायदा झाला आहे. संघात राहून त्याने तमिळ भाषादेखील शिकली. त्याने आपल्या चित्रपटाविषयी पोस्ट तमिळ भाषेतच केले. सोशल मीडियामध्ये या चित्रपटाचं प्रमोशन जोरदार पद्धतीने केल्याने तामिळनाडू राज्यात हरभजन सिंगचे खूप सारे फॅन झाले आहेत.

हरभजनपूर्वी अनेक माजी क्रिकेटपटूंनी चित्रपटात नशीब आजमावले आहे. वेगवान गोलंदाज एस श्रीशांत, सलील अंकोला, अष्टपैलू खेळाडू कपिल देव, यष्टिरक्षक सय्यद किरमाणी, योगराज सिंग, प्रशिक्षक संदीप पाटील, महान फलंदाज सुनील गावस्कर, माजी फलंदाज अजय जडेजा यांनी देखील चित्रपटात नशीब आजमावले आहे.

You might also like