22 मार्चपासून सुरू होत असलेल्या आयपीएलच्या 17 व्या हंगामातून एकामागोमाग एक अनेक बडे खेळाडू बाहेर पडत आहेत. काहींना दुखापत झाली आहे, तर काही वैयक्तिक कारणांमुळे माघार घेत आहेत. आतापर्यंत, मोहम्मद शमी, जेसन रॉय आणि प्रसिद्ध कृष्णासह अनेक मोठे खेळाडू या स्पर्धेतून बाहेर झाले आहेत.
दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सच्या संघातून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीनं वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल 2024 मधून आपलं नाव मागे घेतलं. लखनऊचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी डेव्हिड विली आयपीएल 2024 मधून बाहेर पडला असल्याची पुष्टी केली आहे.
प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, “मार्क वुड आधीच स्पर्धेबाहेर आहे. आता डेव्हिड विली देखील खेळू शकणार नाही. याचा अर्थ आमच्याकडे गोलंदाजीतील अनुभवाची कमतरता असेल. मात्र आमच्याकडे प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाही. संघातील काही खेळाडू जखमी झाले होते. परंतु सध्या सर्वजण पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. सर्व खेळाडू निरोगी आहेत आणि त्यांना खेळण्याची ओढ आहे. त्यांनी आपली फिटनेस योग्य ठेवायला हवी, जेणेकरुन आम्ही केवळ सुरुवातीच्या सामन्यांमध्येच नव्हे तर संपूर्ण हंगामात चांगली कामगिरी करू शकू.”
डेव्हिड विलीच्या आधी इंग्लंडच्या मार्क वुडसह अनेक खेळाडूंनी ‘वैयक्तिक कारणांमुळे’ आयपीएल 2024 मधून आपली नावं मागे घेतली आहेत. या आधी डेव्हिड विली पीएसएलमध्ये (पाकिस्तान सुपर लीग) खेळताना दिसला होता. त्यानं मुलतान सुलतानला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाचं योगदान दिलं होतं. संपूर्ण स्पर्धेत त्यानं 11 सामन्यात 15 बळी घेतले. पीएसएलमध्ये खेळल्यानंतर डेव्हिड थकला होता आणि त्याला विश्रांती घ्यायची होती, त्यामुळे त्यानं आयपीएलमधून माघार घेतली असंही बोललं जातंय. डेव्हिड विलीला एलएसजीनं लिलावात 2 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2024 च्या उद्घाटन समारंभात कोणते स्टार्स परफॉर्म करणार? कसा असेल कार्यक्रम? जाणून घ्या सर्वकाही
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! IPL 2024 पूर्वी विराट कोहलीनं सुरू केला सराव, व्हिडिओ व्हायरल
आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू भारतात दाखल, तब्बल 9 वर्षांनी करतोय पुनरागमन!