पाकिस्तानचे माजी कर्णधार सईद अहमद यांचं निधन झालं आहे. 86 वर्षीय अहमद यांनी लाहोरमध्ये अखेरचा श्वास घेतला. पाकिस्तानकडून खेळताना अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची कामगिरी उत्कृष्ट होती. त्यांनी पाकिस्तानसाठी 41 कसोटी सामने खेळले. या दरम्यान त्यांनी आपल्या दमदार खेळानं संघाला अनेक सामन्यांमध्ये संस्मरणीय विजय मिळवून दिले.
सईद अहमद यांनी 1958 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांनी पाकिस्तानकडून खेळलेल्या 41 कसोटी सामन्यांमध्ये 2,991 धावा केल्या आहेत. फलंदाजीसोबतच सईद यांनी गोलंदाजीतही संघासाठी चांगली कामगिरी केली. त्यांच्या नावे कसोटीमध्ये 22 विकेट्स आहेत. सईद अहमद यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केलं होतं. त्यांनी अखेरचा सामना 1973 साली खेळला.
सईद अहमद यांच्याकडे 1969 साली पाकिस्तान संघाची कमान सोपवण्यात आली होती. इंग्लंड दौऱ्याच्या मध्यावर सईद यांना हनिफ मोहम्मदच्या जागी पाकिस्तानचं कर्णधार बनवण्यात आलं होतं. मात्र, त्यांना कर्णधार म्हणून आपली प्रतिभा दाखवण्याची फारशी संधी मिळाली नाही. त्यांनी केवळ तीन सामन्यांत संघाची धुरा सांभाळली. सईद अहमद यांच्या निधनाच्या वृत्तावर पीसीबीनं (पाकिस्तान क्रिकेट बोर्ड) शोक व्यक्त केला आहे.
सईद अहमद यांचा जन्म 1937 मध्ये तत्कालीन ब्रिटिश भारतातील जालंधर येथे झाला होता. सध्या हे शहर भारतातील पंजाबमध्ये आहे. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या वेळी सईद अहमद यांचं वय अवघ्या 20 वर्षांचं होतं. पहिल्याच सामन्यात त्यांनी हनिफ मोहम्मदसोबत तिसऱ्या विकेटसाठी 154 धावांची भागीदारी केली होती. या सामन्यात सईद यांनी ६५ धावांची शानदार खेळी केली. मात्र, सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला. सईद अहमद यांनी आपल्या दमदार फलंदाजीमुळे अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला. कारकिर्दीच्या अखेरीस त्यांची सरासरी 40.01 एवढी होती.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सईद अहमद खेळापासून दूर झाले. ते गेली अनेक वर्ष लाहोरमध्ये एकटेच राहत होते. तब्येत बिघडल्यानं त्यांना वारंवार रुग्णालयात जावं लागायचं. बुधवारी (20 मार्च) दुपारी त्यांना रुग्णालयात नेलं असता काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. सईद अहमद यांच्या पश्चात त्यांची दोन मुलं, एक मुलगी आणि सावत्र भाऊ युनूस अहमद असा परिवार आहे. युनूस अहमद पाकिस्तानकडून चार कसोटी सामने खेळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जेष्ठ राष्ट्रीय खेळाडू वसंत ढवण यांचे वृद्धापकाळाने निधन
IPL 2024 मधून आणखी एक बडा खेळाडू बाहेर, ‘वैयक्तिक कारणांमुळे’ घेतली माघार
भारतात संधी मिळाली नाही म्हणून ‘हा’ स्टार क्रिकेटपटू इंग्लंडला रवाना, आता तिथे खेळताना दिसणार