– वरद सहस्रबुद्धे
१९९९ वर्ल्डकप नंतर बांग्लादेश हा संघ अनेक जणांना पाकिस्तान सारख्या संघाला पराभूत केल्याने माहिती झाला होता. आज जवळपास २१ वर्षांनी बांग्लादेश क्रिकेटनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये क्वार्टर/ सेमी फायनल गाठलीये. तिकडे युवा संघाने तर बांग्लादेशला १९ वर्षांखालील वर्ल्डकप जिंकून दिलाय.
ही प्रगती काही एका झटक्यात झालेली नाही. या प्रगतीत, स्थित्यंतरांमध्ये अनेक खेळाडुंनी कर्णधारांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. १९९९ नंतर बांग्लादेशने एक अनपेक्षित निकाल नोंदवणारी टीम म्हणून लौकिक मिळवला होता, पण हा लौकीक त्यांना २००३ वर्ल्डकप मध्ये राखता आला नाही आणि ते पहिल्याच फेरीतून बाद झाले. अगदी त्यांना कॅनडाने देखील हरवलं होतं.
२००३ वर्ल्डकप संपल्यावर काही काळातच खालिद महमूदने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अशा खेळाडूकडे कर्णधारपद सोपवण्यात आले ज्याने बांग्लादेश क्रिकेटला एक उंची प्राप्त करून दिली, अनेक मोठ्या संघांना पराभूत करण्याची क्षमता माझ्या टीममध्ये आहे दाखवून दिले तो कर्णधार म्हणजे हाबिबूल बाशर. ह्याचा फोटो आजच्या तारखेला कोणाला दाखवला तर पटकन लक्षातही येणार नाही.
जशी दोन फलंदाजात असते, दोन गोलंदाजांत भागीदारी असते कधी कधी गोलंदाज आणि यष्टीरक्षक सुध्दा चांगली पार्टनरशीप होऊ शकते. त्याचप्राणे कर्णधार प्रशिक्षक हे सुध्दा संघाच्या विजयात आपल्या पार्टनरशीपने प्रभाव पाडु शकतात. प्रशिक्षिक व्हॉटमोर आणि कर्णधार बाशर अशीच एक जोडी.
हाबिबूल बाशर हा बांगलादेशमध्ये गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकापासूननच माहिती झाला होता. एक बेस्ट स्ट्रोक प्लेयर म्हणून त्याची ओळख प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये होती. कामगिरीत असलेल्या सातत्याच्या अभावामुळे त्याला ९९ वर्ल्डकप स्पर्धेस मुकावे लागले.
२००० साली बांग्लादेशला कसोटी दर्जा मिळाला. सुरूवातीला त्याला संघात निवडले नव्हते. परंतु त्याला वगळण्यामूळे अनेक वाद रंगले, चर्चा रंगल्या,.पत्रकार परिषद झाल्या आणि त्याला न्याय मिळाला आणि त्याचा भारताविरुद्ध कसोटीत समावेश केला. आपल्या पहिल्याच कसोटीत त्याने ७० धावा काढुन समर्थकांचा शब्द खाली पडून दिला नाही. कसोटीमध्ये ३००० धावा करणारा बाशर पहिला बांगलादेशी खेळाडू. बाशरच्या करिअरमध्ये ५० ला १०० मध्ये कन्व्हर्ट करणं हा मुख्यअडथळा होता. एक टॉप ऑर्डरचा फलंदाज असूनही त्याने फक्त तीनच शतकं मारली आहेत आणि अडतीस अर्धशतक केली आहेत. यामुळेच क्रिकेटमध्ये त्याला ‘मिस्टर फिफ्टी’ हे नाव पडलंय.
२००० नंतर बहुतांश संघ संक्रमणाच्या फेजमधून जात होते. बांग्लादेश संघ याला अपवाद नव्हता. त्यांच्यासाठी एखादा विजय हा कपिलापष्ठी योगासारखा होता. त्याकाळात, तीन वर्षात बाशरने उत्तम संघबाधणी केली. सध्याचे बांग्लादेश क्रिकेटचे मुख्य आधारस्तंभ तमिम इक्बाल, शाकिब अल हसन आणि मुशफिकर रहीम यांनी बाशरच्या नेतृत्वात पदार्पण केलंय. इंग्लंडच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाला हरवण्याची कामगिरी कोण विसरेल. त्याकाळी असलेल्या ऑस्ट्रेलियाला, ज्यांच्यासाठी पराभव हा कपिलापष्ठीचा योग होता. त्याच्याच नेतृत्वाच्या काळात बांग्लादेशने पहिल्यांदा वनडे आणि कसोटी सिरीज जिंकण्याची कामगिरी फत्ते केली. २००७ वर्ल्डकपमध्ये भारत आणि द. आफ्रिकेला हरवत बांग्लादेशने आपलं नाव घ्यायला भाग पाडले ते ह्याच्यामुळेच. तो उत्कृष्ट फलंदाज नव्हता किंवा धुर्त कप्तान देखील नव्हता. त्याला आपल्या टीमला जगज्जेता बनवायचे नव्हते. त्याला आपल्या मर्यादा माहिती होत्या. त्या मर्यादांवर ‘शांतपणे’काम केलं. आजच्या बांगलादेशच्या यशात बाशरला विसरून चालणार नाही. अक्रम खानने बांगलादेश क्रिकेटचं भूमिपूजन केलं असेल तर निर्विवादपणे त्याचा पाया बाशरनेच रचलाय.






