न्यूझीलंड क्रिकेट संपूर्ण क्रिकेट जगतात आपल्या खिलाडूवृत्ती व वादविवाद न करण्यासाठी म्हणून ओळखले जाते. क्रिकेटच्या कोणत्याही स्तरावर न्युझीलंडसारखा सभ्य संघ कोणताच नाही हे प्रत्येक क्रिकेटचा चाहता जाणतो. मात्र एक असा खेळाडू होऊन गेला, ज्याने न्यूझीलंड क्रिकेटची ही प्रतिमा काही अंशी डागळवली. तो खेळाडू म्हणजे न्यूझीलंडचा माजी सलामीवीर जेसी रायडर.
६ ऑगस्ट १९८४ रोजी जन्मलेल्या रायडरने, लहानपणापासून अनेक अशा घटनांचा सामना केला, ज्यामुळे तो मानसिकरित्या काहीसा कमजोर झाला व वाईट सवयींच्या आहारी गेला. ८ व्या वर्षी पालकांचा घटस्फोट व १४ व्या वर्षी वडिल त्याला सोडून ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्याने रायडरवर त्याचा मोठा परिणाम झाला. अगदी कमी वयात तो मद्यपानाच्या आहारी गेला. पार्टी करणे व झोपणे इतकेच तो वर्षभर करत होता. शेवटी मित्रांच्या सल्ल्याने त्यात काहीशी सुधारणा झाली.
तो १६ वर्षांचा होता तेव्हा, सेंट्रल डिस्ट्रिक्ट संघाकडून १७ वर्षाखालील संघात खेळला. तो सातत्याने आंतरराष्ट्रीय अकादमी चॅलेंज २००२ मध्ये टाउनसविले येथे खेळला. वयाच्या १८ व्या वर्षी न्यूझीलंड अकादमीकडून, रायडरने ऑस्ट्रेलिया अकादमीविरुद्ध १८१ धावांची तुफानी खेळी केली. २००२ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघात त्याची निवड केली गेली. त्या संघात रॉस टेलर, नील ब्रुम, पीटर बोरेन, रॉब निकोल यांचा समावेश होता. रायडरने या स्पर्धेत न्यूझीलंडकडून पाच डावांमध्ये सर्वाधिक १८८ धावा केल्या.
न्युझीलंड अ संघाकडून चमकदार कामगिरी करूनही त्याची राष्ट्रीय संघात निवड झाली नाही. त्यामुळे त्याने इंग्लंडचा रस्ता धरला. तेथे, आयर्लंड क्रिकेट संघाने त्याला १००० युरो प्रति सामना देण्याचे कबूल केले. मात्र, मात्र, रायडर वेळेवर विमानतळावर न पोहोचल्याने, डब्लिनला जाणारे विमान निघून गेले होते. रायडर हजर न झाल्याने आयर्लंडने तो करार रद्द केला.
आयर्लंड सोबतचा करार रद्द झाल्याने रायडरने इंग्लिश काउंटीवर लक्ष केंद्रित केले. तेथे तुफान कामगिरी करत इंग्लंड राष्ट्रीय संघासाठी खेळण्याचे ठरवले. त्याचे आजोबा इंग्लिश असल्याने तो राष्ट्रीय संघासाठी पात्र ठरू शकला असता. त्या दिशेने त्याने आपले प्रयत्न सुरू केले.
शेवटी, फेब्रुवारी २००८ मध्ये त्याला आपलाच मायदेश न्युझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने प्रथम न्यूझीलंडची जर्सी परिधान केली. आपल्या दुसऱ्या सामन्यात प्रभाव पाडत ६२ चेंडूत ७९ धावांची खेळी त्याने केली.
पहिल्याच मालिकेनंतर तो प्रथमता विवादात सापडला. बारमध्ये भांडण झाल्याने त्याच्या हाताला दुखापत झाली. उपचारासाठी दवाखान्यात दाखल झाल्यावर देखील त्याने रुग्णालय कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली होती. या प्रकरणामुळे त्याच्यावर तीन महिन्यांची बंदी घातली गेली. जानेवारी २००९ मध्ये पुन्हा वेस्टइंडीज दौऱ्यावर रात्री उशिरापर्यंत मद्यपान केल्यामुळे टीम मिटींगला हजर राहू शकला नाही. दुसऱ्या दिवशीसुद्धा तो सराव सत्रात आला नव्हता. कारवाई म्हणून त्याला त्या मालिकेतील उरलेल्या सामन्यातून बाहेर ठेवण्यात आले.
२००९ मध्ये भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला असता, भारताने वनडे व कसोटीत वर्चस्व गाजवले होते. मात्र, न्युझीलंडकडून जेसी रायडर कमालीचा यशस्वी ठरला होता. एकदिवसीय मालिकेत ५६.२५ च्या सरासरी व १०७ च्या स्ट्राईक रेटने २२५ धावा कुटल्या होत्या. कसोटी मालिकेत देखील एक शतक आणि एक द्विशतक झळकावत ३२७ धावा जमवल्या होत्या. २००९ साली न्युझीलंड क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून त्याची निवड झाली.
यशाच्या शिखरावर असताना, रायडरने अचानक क्रिकेटमधून काही कालावधीसाठी थांबत असल्याचे जाहीर केले. दुखापती, मैदानाबाहेरील वर्तन या गोष्टीमुळे त्याने हा निर्णय घेतला होता. २८ मार्च २०१३ रोजी बारमध्ये भांडणे झाल्यावर काही लोकांनी त्याला जबर मारहाण केली होती. या घटनेत त्याच्या डोक्याच्या कवटीला गंभीर इजा झाली होती. तो काही काळ कोमात राहिला. २०१५ मध्ये त्याच्यावर हल्ला करणाऱ्या लोकांना न्यायालयामार्फत सजा दिली गेली.
रायडरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बॉक्सिंग डे दिवशी वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय सामन्याद्वारे पुनरागमन केले. पण पहिल्याच सामन्यात तो शून्यावर बाद झाला. पुढच्या सामन्यात मात्र, २०१४ या वर्षाचे त्याने दणक्यात स्वागत केले. कोरी अँडरसनने त्या सामन्यात ३६ चेंडूत शतक करत, विश्वविक्रम प्रस्थापित केला. दुसऱ्या बाजूने रायडरने देखील ४६ चेंडूत शतक झळकावले होते. दोघांनी अवघ्या ७५ चेंडूत १९१ धावांची भागीदारी रचलेली.
२०१४ मध्ये तो पुन्हा एकदा संघ सहकारी जिमि नीशामसोबत बारमध्ये एका इसमाला मारहाण केली. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाल्याने दोघांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. याच महिन्यात भारत दौऱ्यासाठीच्या संघात रॉस टेलरचा बदली खेळाडू म्हणून त्याची निवड झाली होती. यावेळी, सहकारी डग ब्रेसवेलसोबत रात्री दोन वाजेपर्यंत बारमध्ये पार्टी करताना दिसला. या घटनेमुळे, त्याला त्या कसोटी मालिकेतून व पुढील महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषक संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर, रायडर पुन्हा कधीच न्यूझीलंडसाठी खेळला नाही.
रायडर हा जगातील प्रसिद्ध क्रिकेटपटूपैकी एक होता. न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरी म्हटला होता,
” जेसी रायडर हा जगात सर्वात प्रसिद्ध असलेला न्युझीलंड क्रिकेटपटू आहे. ” याच सोबत, रायडर पार्टी मेॅन म्हणून देखील प्रसिद्ध होता. त्याच्याकडे गाण्यांचा मोठा खजिना असत. ड्रेसिंग रूममध्ये डीजे म्हणून त्याला सहकारी हाक मारत.
तडाखेबंद फलंदाजी सोबतच तो उत्कृष्ट मध्यमगती गोलंदाजी देखील करत. १३१ प्रथम श्रेणी सामन्यात त्याच्या नावे १५५ बळींची नोंद आहे. एक उमदा अष्टपैलू खेळाडू होण्याची नक्कीच त्याची क्षमता होती.
आयपीएलमध्ये देखील, रायडरने आपली कला दाखवली होती. २००९ साली आरसीबी व २०११ मध्ये पुणे वॉरियर्स इंडिया संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले. २०१३ मध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात निवडला गेला. मात्र, दुखापतीमुळे त्याला बाहेर जावे लागले होते. २०१७ साली अखेरच्यावेळी तो कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसला.
वाईट सवयी व शिस्तपालन न केल्याने क्रिकेटविश्वाने निश्चितच एक सुपरस्टार गमावला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंका संघाने तब्बल २७१ ओव्हर्स खेळल्या होत्या व भारतीय गोलंदाज फक्त रडायचे बाकी होते