भारतीय क्रिकेटमधील अव्वल पाच वेगवान गोलंदाजांची यादी करायची म्हटलं तर कपिल देव, जहीर खान, जवागल श्रीनाथ यांच्यासोबत एक नाव त्या यादीत निश्चित असेल ते म्हणजे वेंकटेश प्रसाद याचे. 90च्या दशकाचा उत्तरार्ध गाजवणाऱ्या या खेळाडूचा आज जन्मदिवस. त्यानिमित्ताने आपण प्रसादविषयी जाणून घेऊयात…
कर्नाटक मधील म्हैसूर येथे 5 ऑगस्ट 1969 मध्ये वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) याचा जन्म झाला. त्याचे पूर्ण नाव बापू कृष्णराव वेंकटेश प्रसाद असे आहे. प्रसादला लहानपणापासून क्रिकेट प्रति खास ओढ होती. त्यावेळी, मुंबई पाठोपाठ उच्च दर्जाचे क्रिकेट सर्वात जास्त कोठे खेळले जात असेल ते म्हणजे, बंगळुरूला. प्रसाद आपले क्रिकेटमधील भवितव्य शोधण्यासाठी बेंगळुरूला दाखल झाला.
स्थानिक स्पर्धांमध्ये दिवसेंदिवस चांगली कामगिरी केल्याने, खूप अधिक स्पर्धा असलेल्या कर्नाटक संघात 1991च्या रणजी सत्रासाठी त्याची निवड झाली. त्याच वर्षी, कर्नाटकचाच जवागल श्रीनाथ याला भारतीय संघात निवडल्याने त्या रिक्त जागेवर प्रसादला संधी मिळाली होती. श्रीनाथ प्रमाणेच 6 फूट 3 इंच अशी उंची लाभलेल्या प्रसादला प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून जबाबदारी मिळाली.
तीन वर्ष रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी यांसारख्या देशांतर्गत स्पर्धात धुमाकूळ घालत प्रसादची 1994 मध्ये राष्ट्रीय संघात निवड झाली. महान कपिल देव हे त्या वर्षी निवृत्त झाल्याने, श्रीनाथ-प्रसाद या दुकलीने भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.
भारतीय संघात एकदा जागा मिळाल्यावर त्याने मागे वळून पाहिले नाही. सामन्यागणिक तो आपली कामगिरी उंचावत गेला. प्रसाद तसा थोडा शांत स्वभावाचा होता. पण, 1996 क्रिकेट विश्वचषकादरम्यान त्याच्यातील ‘अँग्री यंग मॅन’ समस्त क्रिकेटविश्वाने पहिला.
भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील विश्वचषकातील सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु होता. भारताने पाकिस्तानसमोर 288 धावांचे आव्हान ठेवले होते. पाकिस्तानची सलामी जोडी आमीर सोहेल व सईद अन्वर यांनी दहा षटकामध्येच 80 धावा करून भारताच्या गोटात खळबळ माजवली. श्रीनाथने अन्वरला 48 धावांवर बाद केले. मात्र, आमीर सोहेल थांबायचे नाव घेत नव्हता.
कर्णधार अझरुद्दीनने चेंडू प्रसादच्या हाती सोपवला. आधीच आपल्या दोन षटकात प्रसादने मनसोक्त धावा दिल्या होत्या. षटकाची सुरुवात करताना सोहेलने एक सणसणीत चौकार मारला. चौकार मारल्यावर सोहेलने प्रसादला इशाऱ्याने म्हटले की, ” आता तुला कव्हर्समधून चौकार मारतो.” आणि सोहेलने सीमारेषाकडे बोट दाखवले. पुढचा चेंडू प्रसादने आपले खास अस्त्र असलेला ‘ स्लोअर बॉल ‘ टाकला. सोहेलने त्वेषाने बॅट फिरवली. मात्र,चेंडू त्याच्या बॅटला न लागता सरळ स्टंपवर जाऊन धडकला. प्रसादने पूर्ण जोशात सोहेलला बाहेर जाण्याचा इशारा केला. त्या या एका बळीमुळे सामना फिरला. पाकिस्तान सहज जिंकेल, असा वाटणारा सामना पाकिस्तानने गमावला.
Happy birthday to one of India's finest fast bowlers, Venkatesh Prasad 🎉
How many of you remember his face-off with Aamer Sohail in the 1996 Men's CWC? pic.twitter.com/Xp3yhNbnW2
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) August 5, 2020
प्रसादने 1996 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर कसोटी पदार्पण केले होते. आपल्या दुसऱ्याच सामन्यात ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर पाच बळी घेत, आपले नाव ऑनर्स बोर्डवर लावले. त्याचवर्षी, द. आफ्रिका दौऱ्यावर डर्बन कसोटीत त्याने एका सामन्यात 10 बळी मिळवले. द. आफ्रिकेत अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू होता. 15 कसोटीत 55 व 30 वनडेमध्ये 48 बळी मिळवत, 1996-97 यावर्षीचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार प्रसादने आपल्या नावे केला होता. 2000 साली भारत सरकारने पद्मश्री हा नागरी पुरस्कार देऊन त्याचा सन्मान केला.
सन 2001 मध्ये सततच्या दुखापतीमुळे त्याची कामगिरी ढासळत गेली. श्रीलंका दौऱ्यावर खेळल्यानंतर त्याला भारतीय संघातून डच्चू दिला गेला. त्याने, दोन वेळा भारतीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी होऊ शकला नाही. अखेर, 2005 मध्ये त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.
प्रसादने 33 कसोटी व 161 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे 96 आणि 196 बळी मिळवले. 1991-2003 या काळात त्याने कर्नाटकला दोन वेळा रणजी विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, प्रसादला 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले. त्याच्या मार्गदर्शनाखाली, संघाने 2006 युवा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. 2007 क्रिकेट विश्वचषकातील सुमार कामगिरी नंतर, भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून प्रसादची निवड झाली. 2009 मध्ये बीसीसीआयने प्रसाद व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रॉबिन सिंग यांना कारणे न देता करारातून मुक्त केले. आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब व रॉयल चॅलेंजर बेंगळुरू या संघांना प्रशिक्षक म्हणून प्रसादने सेवा दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मुछे हो तो नत्थूलाल जैसी अन् क्रिकेटर असावा तर लालाजींसारखा, ब्रॅडमन यांना केलेलं हिटविकेट
Lala Amarnath: 89 वर्षांपूर्वी लालाजींनी भारतीयांना दाखवलेला ‘तो’ ऐतिहासिक क्षण, वाचून अभिमानच वाटेल