भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या शुक्रवारपासून बेपत्ता असणाऱ्या आजोबांचा मृतदेह अहमदाबादच्या अग्निशामक आणि आपत्कालीन दलाला साबरमती नदीत आढळून आला आहे.
सन्तोक सिंग (वय ८४ वर्षे), हे बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबाने वस्त्रापुर पोलिसांकडे केली होती. सन्तोक हे उत्तराखंडहून अहमदाबादला बुमराहला त्याच्या वाढदिवसानिमित्त भेटण्यासाठी आले होते. बुमराहचा ६ डिसेंबरला वाढदिवस असतो. परंतु त्यावेळी तो घरी नसल्याने त्यांना तो भेटला नाही.
त्यानंतर ते त्याच्या आईला दलजित कौर यांना भेटण्यासाठी त्यांच्या शाळेत गेले होते परंतु दलजित यांनी त्यांना भेटण्यास नकार दिला. ते १ डिसेंबरला त्यांच्या मुलीच्या घरीही गेले पण त्या कुटुंबाने दुर्लक्ष केले होते.
त्यांच्या बेपत्ता असल्याच्या तक्रारीत म्हटले आहे की ” त्यांना त्यांच्या नातवाला त्याच्या वाढदिवसानिमित्त भेटण्याची इच्छा होती. पण त्यांना त्याला जसप्रीतला भेटता आले नाही. ८ डिसेंबरला त्यांनी त्यांचा मुलगा बालवीर सिंग यांना फोन केला होता. ते झारखंडमध्ये राहतात. त्यांना सन्तोक यांनी सांगितले की ते त्यांच्या स्वर्गवासी पत्नीला भेटण्यास चालले आहेत.”
ते बेपत्ता असल्याची तक्रार करणारी त्यांची मुलगी राजिंदर कौर बुमराह म्हणाली ” आम्ही जेव्हा जसप्रीतच्या आई दलजित कौर यांना भेटण्यासाठी त्या जिथे शिक्षिका म्हणून काम करतात त्या शाळेत होतो. पण त्यांनी जसप्रीतशी कोणताही संपर्क साधण्यास माझ्या वडिलांना नकार दिला. त्यांनी जसप्रीतचा फोन नंबर देण्यासही नकार दिला. जेणेकरून माझे वडील त्याच्याशी बोलतील. माझ्या वडिलांना यामुळे खूप दुःख झाले. त्यांनी शुक्रवारी दुपारी घर सोडले आणि त्यानंतर ते परत आलेच नाहीत.”
सध्या बुमराह भारतीय संघातून श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळत आहे.