क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यामध्ये कोणताही क्रिकेटपटू जास्तीत जास्त वयाच्या चाळिशीपर्यंत क्रिकेट खेळतो. त्यानंतर, प्रशिक्षक किंवा समालोचक म्हणून क्रिकेटशी जोडून राहतात. याव्यतिरिक्त, काही खेळाडू व्यवसाय अथवा क्रिकेट खेळताना मिळालेली नोकरी सुरू ठेवतात. याच प्रमाणे काही भारतीय खेळाडूंनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीनंतर चंदेरी दुनियेत देखील पदार्पण केले. क्रिकेटपटूंना सिनेसृष्टीत मात्र तितकेसे यश लाभले नाही.
आज आपण अशाच माजी भारतीय क्रिकेटपटूंविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी चित्रपटांद्वारे आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला.
१) सुनील गावसकर
भारताचे सर्वकालीन महान सलामीवीर सुनील गावसकर यांनी आपल्या कारकीर्दीत जगातील प्रत्येक क्रिकेट मैदान गाजवले. क्रिकेटला अलविदा म्हटल्यानंतर त्यांनी चित्रपटांकडे मोर्चा वळवला. मराठी चित्रपट सावली व १९८८ मध्ये हिंदी चित्रपट मालामाल मध्ये त्यांनी अभिनय केला.
२) अजय जडेजा
भारताचा माजी आक्रमक फलंदाज अजय जडेजा यानेदेखील चित्रपटांमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. १९९२ ते २०००या काळात भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या जडेजाने ‘पल पल दिल के पास’ व ‘खेल’ या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत, अमित साद व राजकुमार राव अभिनित ‘काय पो छे’ या चित्रपटात त्याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.
३) सलील अंकोला
सचिन तेंडुलकर सोबत आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या सलील अंकोलाने वयाच्या २८ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला रामराम ठोकला होता. त्याने त्यानंतर बराच काळ सिनेसृष्टीत घालवला. प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त यांच्यासोबत ‘कुरुक्षेत्र’ या चित्रपटातून त्याने अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यापाठोपाठ ‘पिता’ व ‘चुरा लिया है तुमने’ या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारल्या. त्यानंतरही अनेक टेलिव्हिजन शोमध्ये त्याने सहभाग नोंदवला होता.
४) योगराज सिंग
भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याचे वडील व माजी भारतीय क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी देखील चित्रपटात भूमिका केल्या आहेत. योगराज यांनी काही हिंदी व पंजाबी चित्रपटांमध्ये अभिनयाची चुणूक दाखवली. भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात त्यांनी मिल्खा सिंग यांच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती.
५) विनोद कांबळी
भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला विनोद कांबळी हा देखील अभिनय क्षेत्रात उतरला होता. यशस्वी क्रिकेट कारकिर्दीनंतर विनोदने ‘अनर्थ’ चित्रपटात प्रथमता काम केले. त्यानंतर ‘पल पल दिल के पास’ हा आणखी एक हिंदी चित्रपट त्याने केला. ‘बेट्टानगारे’ या दक्षिणात्य चित्रपटात देखील त्याने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती.
६) कपिल देव
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. आपली दीर्घ आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द संपल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्राकडे मोर्चा वळवला. ‘इक्बाल’, ‘मुझसे शादी करोगी’ तसेच ‘चैन कुली की मैन कुली’ या चित्रपटांमध्ये त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका बजावली. कपिल देव यांच्या जीवनावर आधारित ‘८३’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारेल.
७) सदागोपन रमेश
भारताचा माजी सलामीवीर सदागोपन रमेश हेदेखील दक्षिणात्य चित्रपटातील एक प्रमुख नाव बनले होते. निवृत्तीनंतर त्यांनी, तमिळ चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. २००८ त्यांचा पहिला चित्रपट ‘संतोष सुब्रमण्यम’ प्रदर्शित झाला. त्यानंतर पुन्हा, ‘पोट्टापोट्टी’ या चित्रपटात प्रमुख भूमिका निभावली. २०१९ मध्ये ‘स्वरस म्युझिक’ या कंपनीत त्यांनी गुंतवणूक केली आहे.
८) इरफान पठाण
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण हा देखील आता रुपेरी पडद्यावर पदार्पणास सज्ज झाला आहे. ३६ वर्षीय इरफान तमिळ चित्रपट ‘कोब्रा’ मधून अभिनयाचे गुण दाखवेल. या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे. इरफान या चित्रपटात एका टर्किश अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसेल. या चित्रपटात दक्षिणेचा सुपरस्टार विक्रम प्रमुख भूमिकेत आहे. तर, जगप्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.
महत्वाच्या बातम्या:
कदाचित भारत ३-० किंवा ४-० फरकाने इंग्लंडला पराभूत करेल, इंग्लंडच्या दिग्गजाची भविष्यवाणी
ऑस्ट्रेलियन भूमीवरील भारताचा विजय अतुलनीय! पाहा कोणी केलंय कौतुक
इंग्लिश गोलंदाजांचा सामना करण्यासाठी किंग कोहलीची जय्यत तयारी, पाहा व्हिडिओ