पॅरिस| पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत अनुभवी भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णा पराभूत झाल्यानंतर फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील भारतीय आव्हान संपुष्टात आले आहे. बोपन्ना आणि कॅनडाचा टेनिसपटू डेनिस शापोवालोव्ह या जोडीचा कॅनडाच्या वसेक पोसपसिल आणि अमेरिकेच्या जस सॉक या जोडीने पराभव केला.
51 मिनिटे चाललेल्या सामन्यात 2-6, 2-6 अशा सरळ सेटमध्ये बोपण्णा आणि शापोवालोव्ह यांची जोडी पराभूत झाली. बोपण्णा आणि शापोवालोव्ह यांना दोन्ही सेटमध्ये एकदा ब्रेकपॉईंट मिळाला पण त्यांना त्याचा फायदा घेता आला नाही. तर प्रतिस्पर्धी जोडीने दोन्ही सेटमध्ये दोन-दोन ब्रेक पॉईंट्स घेतले.
शापोवालोव्हला पाच सेटमध्ये चाललेल्या एकेरी सामन्यात स्पेनच्या रॉबर्टो कार्बालेस बिएनाकडून 7-5, 6-7 (5/7), 6-3, 3-6, 8-6, ने पराभूत झाल्यानंतर दुहेरी सामना खेळावा लागला. या पराभवाचा परिणाम दुहेरी सामन्यातही दिसला. एकेरीनंतर दुहेरी सामना आयोजित केल्याबद्दल या खेळाडूने आयोजकांना चांगलेच फटकारले.
तो म्हणाला, “पाच तास एकेरी सामना खेळल्यानंतर मी दुहेरी सामना खेळण्यासाठी मैदानात कसा उतरू शकतो?, तोही पहिल्या फेरीचा सामना. आयोजकांनी वेळापत्रक नीट तयार केले नाही. मला हे मान्य नाही, असा माझ्या म्हणण्याचा उद्देश नाही.”
तत्पूर्वी, दुसरा भारतीय टेनिसपटू दिविज शरण आणि त्याचा दक्षिण कोरियाचा सहकारी क्वेन सून वू या जोडीचा बुधवारी (30 सप्टेंबर) क्रोएशियाच्या फ्रँको स्कुगोर आणि अमेरिकेच्या ऑस्टिन क्रिझिक यांच्याकडून 2-6, 6-4, 4-6 ने पराभव झाला.