---Advertisement---

MPL 2025: एमपीएल‌ 2024 मध्ये यांच्या गोलंदाजीने माजवली दहशत, फलंदाज झाले टाय टाय फिस

On: बुधवार, मे 28, 2025 4:14 PM
---Advertisement---

MPL 2025: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2025) स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात 4 जून रोजी होईल. महाराष्ट्रातील युवा क्रिकेटपटूंना आपला खेळ दाखवण्यासाठी एमसीए सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन करत आहे. आज आपण स्पर्धेच्या दुसऱ्या यशस्वी हंगामात सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या तीन गोलंदाजांबाबत जाणून घेणार आहोत. (Most wickets in MPL 2024)

एमपीएल 2024 मध्ये रत्नागिरी जेट्स संघाने ट्रॉफी उंचावली. सलग दुसऱ्या वर्षी ते विजेतेपदाचा मान घेण्यात यशस्वी ठरले. त्यांच्या या यशात अनुभवी फिरकीपटू सत्यजित बच्छाव (Satyajit Bachhav) याचे सर्वात मोठे योगदान राहिले. त्याने स्पर्धेत 12 सामने खेळताना सर्वाधिक 25 बळी मिळवले. विशेष म्हणजे क्वालिफायर 1 व अंतिम सामना या दोन्ही सामन्यात तो सामन्याचा मानकरी होता. स्पर्धेत दोन वेळा चार बळी तर एकदा पाच बळी घेण्याचा कारनामा त्याने केला.

ईगल नाशिक टायटन्स संघाचा आयकॉन खेळाडू असलेल्या मुकेश चौधरी (Mukesh Chaudhary) याने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले. डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज असलेल्या मुकेशने आपल्या अनुभवाचा फायदा घेत 12 सामन्यात 21 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्या हंगामाला मुकल्यानंतर मुकेशची ही कामगिरी कौतुकास्पद होती.

पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाचा फिरकीपटू श्रेयस चव्हाण (Shreyas Chavan) हा पहिला हंगामात आपल्या जादुई फिरकीने चर्चेचा विषय ठरला होता. त्याने दुसऱ्या हंगामातही तीच कामगिरी पुन्हा करून दाखवली. श्रेयसने या हंगामात बारा सामने खेळले. यामध्ये त्याला 20 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवण्यात यश आले. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट हा केवळ 7.9 इतका जबरदस्त होता.

रायगड रॉयल्सचा युवा गोलंदाज तनय संघवी (Tanay Sanghavi) याची एमपीएल 2024 मध्ये मोठी चर्चा झाली होती. त्याने रायगड संघासाठी केवळ आठ सामने खेळले. मात्र, त्यामध्ये तो तब्बल 19 फलंदाजांना बाद करण्यात यशस्वी ठरला होता. तर, रायगडचाच अनुभवी वेगवान गोलंदाज मनोज इंगळे याने 10 सामन्यांमध्ये 16 फलंदाज माघारी धाडलेले.

एमसीए अध्यक्ष आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या कल्पनेने सुरू झालेल्या या स्पर्धेचा तिसरा हंगाम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गहुंजे, पुणे येथे 4 जून ते 22 जून या काळात सहा संघांदरम्यान रंगणार आहे. यासोबतच वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेचा देखील पहिला हंगाम खेळला जाईल. या दोन्ही स्पर्धांचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioHotstar या ओटीपी प्लॅटफॉर्मवर तसेच Star Sports 2 या टीव्ही चॅनेलवर केले जाईल. तसेच, या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---