IND vs SL, First ODI :- भारत विरुद्ध श्रीलंका संघात कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेला पहिला वनडे सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात नवनिर्वाचीत प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी काही प्रयोगही करून पाहिले. त्यांच्या प्रयोगाचा एक भाग म्हणजे, सलामीवीर आणि उपकर्णधार शुबमन गिल याला गोलंदाजी करायला सांगणे. मुख्य प्रशिक्षक गंभीरच्या या निर्णयावर आता गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले यांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी स्पष्ट केले आहे की, भारतीय संघ वरच्या फळीतील फलंदाजांना गोलंदाजीची संधी देत राहील.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात गिलला गोलंदाजीची संधी दिली गेली होती. या सलामीवीराने सामन्यात एक षटक टाकले ज्यात त्याने 14 धावा दिल्या. परंतु बहुतुले यांना विश्वास आहे की हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे. याआधी सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांनी तिसऱ्या टी20 सामन्यात गोलंदाजी केली होती. श्रीलंकेनेही ही रणनीती अवलंबली. त्यांचा कर्णधार आणि मुख्य फलंदाज चरिथ असलंकाने 8.5 षटके टाकली आणि 30 धावांत तीन बळी घेतले, त्यात शिवम दुबे आणि अर्शदीप सिंग यांच्या सलग चेंडूंवर विकेट घेतल्याने त्यांचा संघ सामना बरोबरीत सोडण्यात यशस्वी झाला.
‘आमचे फलंदाजही चांगले गोलंदाज आहेत’
याबाबत बहुतुले म्हणाले, “प्रामाणिकपणे सांगायचे तर मला वाटते आमचे फलंदाजही चांगले गोलंदाज आहेत. तुम्हाला माहित आहे की त्यांचे मुख्य कौशल्य फलंदाजी आहे, त्यामुळे कधीकधी ते त्यांच्या गोलंदाजीवर जास्त लक्ष देत नाहीत. पण त्यांच्याकडे गोलंदाजीचे कौशल्यही आहे. तुम्ही टी20 मालिकेत पाहिलं असेल. त्यात रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यादव यांनी गोलंदाजी केली. तसेच गिलला वनडेत संधी देण्यात आली. आगामी काळात या खेळात अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व वाढणार आहे.”
“अशा परिस्थितीत वरच्या फळीतील एक-दोन फलंदाज गोलंदाजी करू शकले तर त्याचा संघाला नक्कीच फायदा होईल. हे खेळपट्टीची स्थिती आणि परिस्थितीवर अवलंबून असेल. याशिवाय फलंदाज गोलंदाजी करू शकला तर विरोधी संघासाठी ते आश्चर्यकारक ठरेल. त्यामुळे भविष्यात फलंदाजांनाही गोलंदाजी करण्याची मुबलक संधी उपलब्ध होणार आहे,” असे यावेळी बहुतुले यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा –
पृथ्वी शॉ बॅटनं आग ओकतोय, पुन्हा ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा; गौतम गंभीरच्या संघात संधी मिळेल का?
क्रिकेटचा थरार होणार डबल! भारतातील या शहरात बांधण्यात येणार आणखी एक आंतरराष्ट्रीय स्टेडियम
भारतानं दोनच वनडे विश्वचषक जिंकले, मग जर्सीवर तीन स्टार्स कसे?